आयसिसला नामशेष करावयाचे तर प्रत्यक्ष जमिनीवरील लष्करी कारवाईस पर्याय नाही. त्यास तूर्त तरी अमेरिकेची तयारी दिसत नाही आणि युरोपीय देशांची हिंमतही दिसलेली नाही. अशा स्थितीत फ्रान्स सीरियावर हवाई हल्ल्यांनी काय साधणार?
पॅरिसवरील दहशतवादी हल्ला म्हणजे युद्ध आहे, अशी भूमिका घेतल्यावर या युद्धात प्रत्युत्तर देणे भाग होते. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी तसे ते दिले आणि सोमवारी सीरियामधील आयसिसच्या बलस्थळांवर हल्ले केले. फ्रान्सवर जी अवस्था ओढवली आहे तीबाबत सहानुभूती म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही आयसिसविरोधातील कारवाई अधिक जोमाने केली जाईल असे सांगितले. फ्रान्सचा शेजारी असलेल्या ब्रिटननेही या कठीण काळात फ्रान्ससाठी सर्वतोपरी साहय़ दिले जाईल असे आश्वासन देऊन आयसिसविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचे सूतोवाच केले. पॅरिस हल्ल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तुर्कस्तानातील अंताल्या येथे जी-२० देशांची शिखर परिषद भरली. तिच्यावर पॅरिस हल्ल्याचे सावट असणे नसíगकच होते. या परिषदेत सहभागी झालेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अन्य राष्ट्रप्रमुखांनीही आयसिसच्या विरोधात तातडीने काही करण्याची गरज व्यक्त केली. अशा तऱ्हेने पॅरिस हल्ल्याने जागतिक नेत्यांचा विचार अवकाश व्यापला असून यातून बाहेर पडण्यासाठी काही ना काही केले जावे अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. या हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता अशा प्रतिक्रिया उमटणे अनसíगक नाही. परंतु या प्रतिक्रियांमुळे परिस्थितीतून काही मार्ग निघण्याऐवजी ती अधिकच गुंतागुंतीची होताना दिसते. जगातील प्रत्येक महत्त्वाच्या नेत्यास आयसिसच्या प्रश्नावर काही ठोस करावे असे वाटते आणि तरीही परिस्थिती आहे तशीच राहाते.
याचे कारण आयसिसविरोधात नक्की काय, कसे, केव्हा, कधी आणि कोठे करायचे आहे याची स्वच्छ कल्पना यापकी कोणालाही नाही. फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांचा ताजा निर्णय हे त्याचे उदाहरण. आयसिस ही संघटना पॅरिसवरील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार आहे म्हणून तिच्यावर कारवाई व्हायला हवी ही ओलांद यांची भूमिका निश्चितच योग्य. परंतु म्हणून त्यांनी सीरियातील काही प्रदेशांवर केलेले हवाई हल्ले योग्य ठरतात असे नाही. याचे कारण आयसिसची कार्यपद्धती. ही संघटना इलेक्ट्रॉनिक संदेशवहन यंत्रणेवर विसंबून राहत नाही. त्यामुळे अत्युच्च तंत्रज्ञानाच्या साहय़ाने या संदेशवहनवर पाळत ठेवून संघटनेची गुपिते उघड करावीत असेही होत नाही. हा झाला एक भाग. त्याच वेळी ही संघटना आपल्या प्रादेशिक घटकांना सर्वाधिकार देते आणि एकदा का त्यांच्याकडून काय करवून घ्यायचे हे निश्चित झाले की त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण ठेवत नाही की त्यांना मार्गदर्शन करावयास जात नाही. काय आणि कसे करावयाचे ही पूर्ण जबाबदारी स्थानिक घटकांची. म्हणजे एकदा का पॅरिसमध्ये हाहाकार माजवायचा असे ठरले की त्या पुढे जाऊन कोणी काय करायचे याचे तपशीलवार नियोजन करण्यात या संघटनेचे नेतृत्व वेळ आणि ऊर्जा वाया घालवीत नाही. याचा अर्थ असा की पॅरिसमध्ये जे काही झाले ते आयसिसच्या स्थानिक घटकाने केले असण्याची शक्यता आहे. या आणि अशा स्थानिक घटकांचा आयसिसच्या मध्यवर्ती केंद्राशी वा नेतृत्वाशी काहीही संपर्क नसतो. जे काही घडते ते स्थानिकांच्या बळावर. त्यांना केंद्रीय पातळीवर ना कोणती रसद पाठवली जाते ना काही सूचना दिल्या जातात. याच कार्यपद्धतीमुळे पॅरिसमधील हल्ल्यास फ्रान्समधीलच आयसिस समर्थक जबाबदार आहेत असा निष्कर्ष निघत असून घटनास्थळी सापडलेले स्थानिकाचे पारपत्र याचीच साक्ष देते. अशा परिस्थितीत जे काही पॅरिसमध्ये झाले त्यासाठी सीरियावर हल्ले करणे हे केवळ सूडबुद्धीचे समाधान मिळवून देणारे आहे. त्यामुळे दीर्घकालीन काहीही साध्य होणार नाही. २००१ साली ‘९/११’ घडल्यावर तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना अफगाणिस्तानवर हल्ला करण्याची खुमखुमी आली. अफगाणिस्तानातील तालिबान आणि इराकमधील सद्दाम हुसेन हे ‘९/११’ हल्ल्यामागे आहेत असा समज बुशसाहेबांनी करून घेतला आणि आधी अफगाणिस्तानावर आणि नंतर इराकवर तुफानी हल्ला केला. या अनावश्यक हल्ल्याच्या जखमा आणि ओरखडे अमेरिकी अर्थव्यवस्थेवर अद्यापही दिसतात. त्या हल्ल्यांमुळे बुश यांचा वेडापिसा जीव शांत झाला असेल. परंतु त्यामुळे ना दहशतवाद्यांना धडा मिळाला ना तो आटोक्यात आला. तेव्हा तातडीने आयसिसच्या सीरियातील केंद्रांवर चालून जाण्याआधी फ्रेंच अध्यक्ष ओलांद यांनी अमेरिकेचे ‘९/११’ नंतरचे वागणे पाहून थोडी सबुरी दाखवणे आवश्यक होते. तेवढा पोक्तपणा त्यांनी दाखवला नाही. दुसरे असे की सीरियावर बॉम्बफेक केल्यास त्यामुळे दुष्परिणामच होण्याची शक्यता अधिक. याचे कारण आयसिसच्या कार्यपद्धती. ही संघटना प्राधान्याने नागरी वस्ती, गृहसंकुले आदी सर्वसामान्यांच्या वसतिकेंद्रांतूनच आपल्या कारवायांचे नियोजन करीत असते. या अशा कार्यपद्धतीमुळे आयसिसच्या केंद्रावर हल्ला झाल्यास निरपराधांनाच त्याचा फटका बसण्याची शक्यता अधिक. किंबहुना तसेच होते. अशा परिस्थितीत आयसिसला रोखायचे म्हणजे नक्की काय करायचे याबाबत सगळ्यांच्याच मनात संभ्रम दिसतो. परंतु याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही.
याचे कारण या आयसिसच्या पालकत्वात आहे. या संघटनेचा आधीचा अवतार असलेल्या अल कईदा या संघटनेस निश्चित आकार होता. तिच्या जन्माचे कारण होते. तीच बाब तालिबान या संघटनेचीदेखील. १९७९ मध्ये सोविएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानात घुसल्यानंतर या साम्यवादी देशास पराभूत करणे ही अमेरिकेच्या गटातील देशांची जबाबदारी होती. त्यासाठी त्यांनी इस्लामी दहशतवाद्यांना पोसले. अमेरिकेचे तत्कालीन सुरक्षा सल्लागार झिबिग्न्यु ब्रेझन्स्की यांनी तर या पािठब्याचे तत्त्वज्ञान मांडले. निधर्मी कम्युनिझमला रोखण्यासाठी इस्लामी धर्माध वापरणे हे त्या तत्त्वज्ञानाचे सार. त्यामुळे यातून इस्लामी धर्मवादाचा मोठाच भस्मासुर उभा राहिला. पुढे तो अमेरिकेच्याच डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागल्याने त्यास संपवणे अमेरिकेस क्रमप्राप्त होते. त्यामुळे साहजिकच अमेरिकेने त्यासाठी पुढाकार घेतला आणि तालिबान, अल कईदा नेस्तनाबूत करण्यासाठी मोठी मोहीम उघडली आणि ती यशस्वी केली. ती करताना अमेरिकेची अर्थव्यवस्था रक्तबंबाळ झाली. तेव्हा एकूणच असे भस्मासुर आपण निर्माण करावेत का असा प्रश्न अमेरिकेत विचारला जाऊ लागला. दरम्यानच्या काळात झालेल्या सत्तांतराने अमेरिकेत युद्धखोर रिपब्लिकनांच्या जागी डेमॉक्रॅट्स सत्तेवर आले. त्यांच्या मते या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी होते आणि आहे. परिणामी अमेरिकेने जागतिक पातळीवर पोलिसीगिरी न करण्याचा निर्णय घेतला.
आयसिसचा जन्म नेमका या पोकळीतला आहे. एका बाजूला संन्याशाचा आव आणून दुरून गंमत पाहात बसलेली अमेरिका आणि दुसरीकडे अशक्त, हतबल युरोप अशी दुहेरी सुवर्णसंधी आयसिसला मिळाली. अमेरिकेने इराकमधून काढता पाय घेतल्यावर मोसूल आदी प्रांतातील तेलविहिरींवर आयसिसने कब्जा केला आणि त्यातून निधी उभारून आपली बेगमी केली. तेव्हा आयसिसचा प्रसार होण्यास परिस्थिती अत्यंत अनुकूल होती. तिचाच फायदा या संघटनेने उचलला आणि सर्वदूर आपले जाळे विणले. फ्रान्सच्या प्रतिकाराने ते उद्ध्वस्त होणारे नाही. याचे कारण हे सर्व प्रतिहल्ले हवेतून सुरू आहेत. आयसिसला नामशेष करावयाचे तर प्रत्यक्ष जमिनीवरील लष्करी कारवाईस पर्याय नाही. त्यास तूर्त तरी अमेरिकेची तयारी दिसत नाही. अमेरिकेची तयारी नाही आणि युरोपची अशा कारवाईसाठी िहमत नाही. ती नाही तोपर्यंत आकाशातील कारवाईने फार काही साध्य होणार नाही. पापाचे पालकत्व स्वीकारल्याशिवाय ते धुऊन काढता येत नाही. तेव्हा अमेरिका आणि पाश्चात्त्यांना आधी हे पालकत्व स्वीकारावे लागेल. तरच आयसिसविरोधातील कारवाई यशस्वी होईल. अन्यथा आयसिस वाढणार हे नक्की.