रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन हे उदारमतवाद या तत्त्वास कालबाह्य ठरवतात, याचे मूळ कोठे असावे? 

यश डोक्यात गेले की माणसे आपल्या यशाचे तत्त्वज्ञान मांडू लागतात आणि हे यश राजकीय असेल तर त्याची म्हणून एक राजकीय विचारप्रणाली तयार होऊ लागते. अलीकडच्या काळातील अशी राजकीय प्रणाली देणारे आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व म्हणजे रशियाचे सर्वेसर्वा अध्यक्ष व्लादिमीर व्लादिमिरोविच पुतिन. नव्या सहस्रकाच्या तोंडावर या महाकाय देशाची सूत्रे त्यांच्या हाती आली. आधीचे बोरीस येल्तसिन हे मद्यपी आणि भ्रष्टाचारी म्हणून ओळखले जाऊ लागले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील त्यांच्या व्यसनाची टिंगल होऊ लागली होती. एकेकाळी मिखाइल गोर्बाचेव्ह यांना आव्हान देण्याइतपत पुण्याई असलेला हा नेता बघता बघता रसातळास गेला. त्याबरोबर रशियादेखील त्याच मार्गाने जातो की काय, अशी शंका येत असतानाच खुद्द येल्तसिन यांनीच नव्या सहस्रकाच्या पूर्वसंध्येला, ३१ डिसेंबर १९९९ या दिवशी सत्तासूत्रे पुतिन यांच्या हाती दिली. पुतिन हे त्यांचे बाळ. मोठे झाले तरी ते आपल्या कह्य़ात राहील, असा येल्तसिन यांचा समज. तो समजच राहिला. पुतिन यांनी सत्ता हाती आल्यावर या आपल्या राजकीय गुरूस काही केले नाही. पण त्यांना काही दिलेदेखील नाही. उलट त्यांच्या निकटवर्तीयांना खडय़ासारखे दूर केले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. रशियास पुन्हा महासत्ता बनवणे, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी यांचा संहार आणि सामान्य रशियनांच्या मनांत राष्ट्राभिमान जागृत करणे ही त्यांची सत्तेसाठीची कार्यक्रम पत्रिका. त्याआधारे गेले दीड तप रशियावर त्यांनी अभेद्य नियंत्रण ठेवले असून ते अध्यक्षपदी आजन्म राहतील अशीच चिन्हे आहेत. पुतिन यांच्या संदर्भात ही सारी चर्चा आता करण्याचे कारण म्हणजे त्यांनी ‘फायनान्शियल टाइम्स’ या लंडनस्थित तालेवार दैनिकास दिलेली प्रदीर्घ मुलाखत. मुळात पुतिन हे अजिबात माध्यमस्नेही नाहीत. उलट त्यांना माध्यमांचा तिटकाराच आहे. म्हणूनच त्यांनी या दैनिकास दिलेली मुलाखत लक्षवेधक तर ठरतेच, पण त्याचबरोबर ती दिशादर्शकदेखील ठरते. या मुलाखतीत पुतिन कोणती दिशा दाखवतात?

‘उदारमतवाद हे एक कालबाह्य़ मूल्य आहे’, ‘या मूल्याचे जीवितकर्तव्य संपलेले असल्याने त्यास आता गाडूनच टाकण्याची गरज आहे’, ‘युरोप, अमेरिका आदी लोकशाही देशांत अलीकडे निर्माण झालेले तणाव हे या मूल्याच्या आग्रहामुळे झालेले आहेत’, ‘या उदारमतवाद मूल्याने देशोदेशींच्या प्रचलित संस्कृतीवर अतिक्रमण केले असून त्यामुळे अनेक देशांत सांस्कृतिक संघर्ष निर्माण होताना दिसतात; जर्मनी हे त्याचे उदाहरण’, ‘पश्चिम आशियातील स्थलांतरितांना आश्रय देणे ही जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांची अत्यंत गंभीर चूक’, ‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत प्रतिभावान गृहस्थ आहेत’, ‘समलंगिकतेस आपला काही आक्षेप नाही, फक्त या पद्धतीने जगणाऱ्यांनी पारंपरिक मूल्ये पाळणाऱ्यांचाही आदर करावा’, ‘या नव्या उदारमतवाद वगरेंच्या काळातही पारंपरिक मूल्ये, कुटुंबव्यवस्था यांस महत्त्व द्यायला हवे. कारण ही मूल्ये ही अधिक स्थिर आहेत.. आणि असेही उदारमतवाद हे मूल्य आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे’, हे या मुलाखतीत पुतिन यांनी मांडलेले दखलपात्र मुद्दे. रशियाचे परराष्ट्र धोरण, रशिया चीन संबंध आदी अनेक विषयांवर पुतिन यांनी या मुलाखतीत भाष्य केले आहे. ते ठीक. पण आवर्जून उल्लेख आणि विचार करायला हवा तो पुतिन यांच्या उदारमतवाद आणि तदानुषंगिक मुद्दय़ांचा.

स्वातंत्र्य, समता, बंधुता ही फ्रेंच क्रांतीची मानवतेस देणगी. त्यानंतर अमेरिकेत मानवतेचा लढा उभा राहिला आणि अब्राहम लिंकन यांच्या नेतृत्वाखाली गुलामगिरी संपुष्टात आली. या तुलनेत साम्यवादाची विचारधारा आणि तिच्या आधारे झालेली रशियन राज्यक्रांती अलीकडची. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, १९१७ साली लेनिन यांच्या लढय़ामुळे रशियातील झारशाही उलथून पाडली गेली आणि त्या देशात ‘कष्टकऱ्यां’चे राज्य आले. सामुदायिक शेती, सामुदायिक निवास असे अनेक प्रयोग सोविएत रशियात केले गेले. त्यांचे कोण कौतुक झाले त्या काळी. परंतु त्या शोषितांच्या, कष्टकऱ्यांच्या हितरक्षणाची भाषा करणाऱ्या राज्यकर्त्यांतूनच स्टॅलिनसारखा क्रूरकर्मा राज्यकर्ता तयार झाला आणि याच साम्यवाद नावाच्या देखाव्याने पुढे ब्रेझनेव्ह यांच्यासारखा बेमुर्वतखोर आणि अकार्यक्षम राज्यकर्ता दिला. हा पोलादी पडदा उतरवण्याचे पुण्यकर्म केले ते मिखाइल गोर्बाचोव्ह यांनी. पण हाती आलेली सत्ता सांभाळणे त्यांना जमले नाही. आधी येल्तसिन आणि नंतर त्यांच्या आडून पुतिन यांनी सत्ता हस्तगत केली.

तेव्हा पुतिन हे या साम्यवादी राजकारणास लागलेले फळ आहे हे विसरून चालणार नाही. साम्यवाद आणि एकाधिकारशाही यांतील अंतर फार कमी असते. साम्यवादी म्हणवून घेणाऱ्या सर्वानीच ते ओलांडले. पुतिन यांचे वेगळेपण असे की त्यांनी साम्यवादी सरकारातील ‘समूहहुकूमशाही’देखील मोडीत काढली आणि स्वत:ची पूर्ण एकाधिकारशाही स्थापित केली. साम्यवादी सरकारच्या काळात पोलिटब्यूरो नावाची एक व्यवस्था असे. यांतील बरेचसे होयबा तरी असत किंवा अध्यक्षाचे आव्हानवीर. पुतिन यांनी ही व्यवस्थाच दूर करून आव्हानाची शक्यताही दूर केली. तथापि हे करताना त्यांनी आपल्या साऱ्या कृतीस राष्ट्रवादाचा आकर्षक मुलामा दिला आणि रशियास पुन्हा महासत्ता बनवण्याची हाक देत सत्ता आपल्या हाती पूर्ण केंद्रित राहील, याची पुरेपूर खबरदारी घेतली. तथापि एक महत्त्वाचा प्रश्न असा की जनतेने त्यांना या साऱ्यात साथ कशी दिली? त्याचे उत्तर आहे अर्थकारणात. पुतिन यांच्या आधी दोन दशके रशियन अर्थव्यवस्था गाळात गेलेली होती आणि येल्तसिन यांच्या काळातील भ्रष्टाचाराने तिला पुरते पोकळ केले होते. पुतिन यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय काळात हे अर्थकारण सुधारले आणि सामान्य माणसाचे जीवन सुकर केले. त्यामुळे हा सामान्य माणूस त्यांच्याबाबत तटस्थ झाला.

आणि एरवीही दैनंदिन जगण्याच्या संघर्षांत व्यग्र असलेल्या सामान्य माणसासाठी वैचारिक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य प्राणपणाने राखावे असे नसतेच. त्याच्या मते या मूल्याची गरज असते ती फक्त अभिजन आणि पत्रकार इत्यादींनाच. ते नेहमीच मूठभर असतात. तेव्हा काही थोडय़ांना जीवनावश्यक असलेल्या तत्त्वासाठी आपण का संघर्ष करावा असा त्याचा मुद्दा असतो आणि पुतिन यांच्यासारखे सत्ताधारी याचाच यशस्वी फायदा उठवतात. पुतिन यांच्या यशाने इतरांनाही त्याची प्रेरणा मिळते ही यातील खरी समस्या. त्यामुळे उदारमतवाद या तत्त्वास कालबाह्य़ ठरवून आपल्या साऱ्या समस्यांचे मूळ या विचारधारेत आहे असे सांगणाऱ्यांचे फावते.

नेमके हेच आता होताना दिसते. आपल्या समस्यांसाठी शेजारी देश, आधीचे राज्यकत्रे आणि त्या काळातील भ्रष्टाचार, शेजारी देशांतून येणारे बेकायदा घुसखोर अशी कारणे देणारे राजकारणी युरोप, अमेरिकादी देशांत उदयास आले असून त्या सगळ्यांचे या समस्यांवरील तोडगेही एक सारखेच आहेत. ते म्हणजे हे सर्व कठोरपणे मोडून काढणे आणि यास विरोध करणाऱ्या उदारमतवादी वगरेंना मोडीत काढणे. पुतिन यांचा प्रयत्न आहे तो या साऱ्यास राजमान्यता मिळवून देणे.

हे क्लेशकारी असले तरी पुतिन यांच्या मुलाखतीवर अत्यंत कठोर आक्षेप घेत उदारमतवाद या तत्त्वाच्या समर्थनार्थ ज्या रीतीने आणि वेगाने युरोपीय राजकारणी सरसावले ते निश्चितच आशादायी म्हणावे लागेल. तथापि लोकशाहीच्या गबाळ्या, गोंधळी गाडय़ास असे अडथळे भेडसावतील, असे भाकीत द्रष्टे राजकीय विचारवंत सॅम्युअल हंटिंग्टन यांनी आपल्या ‘द थर्ड वेव्ह’ या ग्रंथात करून ठेवले आहे. त्याचे स्मरण या प्रसंगी उचित ठरावे. ‘पहिल्या लाटेनंतर लोकशाही स्थिरावली. पण दुसऱ्या लाटेनंतर तिच्याविषयी घृणा निर्माण होईल आणि त्यातूनच लोकशाहीच्या पुनस्र्थापनेची तिसरी लाट आकारास येईल,’ असे हंटिंग्टन म्हणतात. यातील पहिल्या दोन प्रक्रिया घडल्या. तशीच तिसरीही घडेल ही अपेक्षा.