डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे – anuradha1054@gmail.com

अनेक मुलांना गुन्हेगार ठरवून शिक्षा दिली जाते. त्यांच्या हातून काही वेळा कळत तर काही वेळा नकळत गुन्हे घडतातही. पण समाज म्हणून त्यांच्यामागचे कारण कुणी शोधले आहे का? अनेकदा तर छोटय़ा कारणांसाठी झालेली शिक्षा मुलांना आयुष्यातून उठवू शकते. मुलांना समजून न घेता त्यांच्यावरच दोषारोप करणारा, त्यांच्यातल्या आक्रमकतेचा निचरा करणारी क्रीडांगणे हिसकावून घेणारा, त्यांना गुन्हेगार करणारा समाज गुन्हेगार नाही का?

loksatta explained article, crude oil price, hike, Iran Israel conflict, india, on petrol diesel prices
विश्लेषण : इराण-इस्रायल संघर्षातून खनिज तेलाचा भडका… भारतात निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ अटळ?
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एका मुलाची हत्या त्याच्या मित्राने अत्यंत निर्घृणपणे केली. पश्चात्ताप अजिबात नाही. कुठून येते ही पाशवीवृत्ती? अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या चोऱ्या, मुलींवरचे हल्ले अशा रोजच्या कथा. समाजाला त्याचा धक्का बसतो. पोलीस/माध्यमे काही दिवस ‘आवाज’ करतात, शहरातील तज्ज्ञांची मते छापतात. थोडे दिवस वैचारिक चर्चा गावात, माध्यमांवर होतात. पुन्हा निवांत. हे कुठवर चालायचे? हे का होते आहे, पेक्षा हे थांबणार नाही का?

पुणे ‘चाइल्डलाइन’कडेही हल्ली वर्तणुकीच्या समस्यांबाबत केसेसची संख्या वाढत चालली आहे. अशा मुलांना उन्मार्गी असा शब्द वापरला जातो. छान शब्द आहे-मार्गापासून भरकटलेला असा काहीसा त्याचा अर्थ होतो- वाट चुकलेली, भरकटलेली अशी मुले वेळेवर आधार नाही मिळाला तर गुन्हेगार व्हायला वेळ लागत नाही. पण खरंच दोष कुणाचा? जन्मत:च काही कोणी गुन्हेगार/उन्मार्गी म्हणून जन्माला येत नाही.. मुले शिकतात अनुकरणातून. वडील मुलाचे, तर आई मुलीची स्वाभाविक ‘रोल मॉडेल’ असतात. शिक्षकांचे तसेच आजूबाजूचे ‘माननीय’, घरातले इतर वडीलधारे, चित्रपट कलावंत यांचेही आदर्श असतात. आई-बाबा भांडतात, शेजाऱ्यांवर धावून जातात. शिक्षक-पालक अन्यायपूर्वक मारहाण करतात. पुढारी मंडळींची अरेरावी, गल्लीतील दादाची गुंडगिरी व तरीही या मंडळींना मिळणारा मान, भीतीपोटी असलेली दहशतीची शक्ती, यातून काय शिकवण मिळते? जेव्हा घरातील आदर्श काम करवून घेण्यासाठी लाच देतात, चनीसाठी लाच घेतात, घरी आणतात, मुलांकरवी रजेचे खोटे अर्ज पाठवतात, आपला अल्पवयीन मुलगा/मुलगी कशी गाडी चालवतो याची कौतुके करतात-मीडियाही ते उचलून धरते-तेव्हा कोणते संस्कार मुलांपर्यंत पोहोचतात? कायदा मोडण्याचे असे बाळकडू ठायी-ठायी मिळते. सिग्नल तोडणे, वन-वेमध्ये घुसणे हे तर पोलीस स्वत: सर्रास करतात. एका लहान मुलाने ‘चाइल्डलाइन’वर मला सांगितले- १२ वीचे मार्क बघण्याची तसदीही न घेता कॉलेज देणगीची रक्कम सांगते. पालक द्यायला तयार होतात. सगळेच विक्रीसाठी उपलब्ध आहे. सरस्वती अशी घ्यायची आणि तिच्या जोरावर लक्ष्मी आणायची. हे पटले नाही तर जीवनात नापास, असे पालक- शिक्षकांचे सांगणे. वा रे संस्कार! गुन्हेगार मुले कशी हो?

बालन्याय अधिनियमांच्या तरतुदींना सोयीस्कर बगल देत पोलिसांद्वारे निष्कारण कारवाई होते. बंदी असतानाही, बेडय़ा घालून/काढण्या लावून, न्यायप्रक्रिया सुरू करण्याआधी अपमानित करून अपराधी घोषित केले जाते. वर्ष-वर्ष न्यायप्रणालीची लांबड म्हणून, बारीकशी चूकसुद्धा निरीक्षणगृहात कोणत्याही शिक्षण-प्रशिक्षणाशिवाय आयुष्याची मोलाची वर्षे वाया घालवत असतात. रग आणखीनच कोंडली जाते. रिकामे डोके सतानाचे घर असते हे सर्वश्रुतच आहे, यातून सुटली तरी त्यांच्यावरच्या डागामुळे त्यांना गुन्ह्य़ाशिवाय जगायला पर्याय राहात नाही. शिवाय त्यांच्या राहत्या भागात कोणताही गुन्हा घडला तरी पोलीस पकडायला सोपे, केस बंद करायला सुकर व मोठय़ा गुंडांना अभय देण्यासाठी या छोटय़ांना उचलतात, हे वास्तव आहे. गुन्हेगार कोण?

बालन्यायमंडळात न्यायदंडाधिकारी म्हणून मी सुमारे ६ वर्षे अशा मुलांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यांच्याबरोबर जवळीक साधत ज्ञानदेवीने गंमत-शाळाही सुरू केली. नाटय़माध्यमातून त्यांच्यावर आलेले प्रसंग समजावून घेतले व दबून राहिलेल्या अन्यायाच्या वैफल्याच्या भावनांना वाट करून देण्याचा प्रयत्न केला. असे आढळले की पालकांनी नावच टाकल्यामुळे केस उभी राहत नाही म्हणून छोटय़ाशा गुन्ह्य़ासाठी पोरं वर्षांनुवर्षे तेथे खितपत पडलेली असतात. एका ६ वर्षांच्या मुलाला गाडीवरचे संत्रे चोरले म्हणून पकडले होते. भूक लागली म्हणून घेतले असे त्याने निरागसपणे सांगितले. त्याचे आई-वडील सापडले. समुपदेशनादरम्यान लक्षात आले की शेतातून चोऱ्या करून विकणे हाच त्यांचा पंरपंरागत व्यवसाय होता. लेकराने पाहिले ते केले, त्यात त्याची काय चूक? आजही अशा जमाती आहेत की चोरी ही त्यांची जगण्याची पद्धत आहे. अशांच्या मुलांचे हेच शिक्षण आहे.

एक १२-१३ वर्षांचा मुलगा होता. आई-वडील नाहीत, मायेची आजी होती, शहरात दुकानदाराकडे नोकरी करीत होता. गावाकडून आजी आजारी असल्याचं कळल्यावरून तिच्या औषधासाठी मालकाकडे २०० रुपये उचल मागितली. त्याने नाकारली. मित्राच्या सांगण्यावरून त्याने दुकान फोडले. खरा चोर असता तर आणखीही चोरू शकला असता, पण २०० रुपयेच घेतले. पकडला गेला. चोरी वाईटच. ती करू नये. पण घटनेकडे कसे बघावे? चोरीचा शिक्का मारून त्याला कायमचा समाजातून उठवणे कितपत योग्य?

बाहेरच्या प्रदेशांतून बालकामगार म्हणून बरीच मुले आणली जातात. शोषण असह्य़ झाले की ठेकेदाराला मारणे, खून करणे अशा गोष्टी घडतात. या अशा केसेसमध्ये पालक सापडत नाहीत अथवा पाठीशी उभे राहात नाहीत व मुले निरीक्षणगृहात खितपत बाहेर पडतात ती गुन्हेगारीचा शिक्का घेऊन. ज्यामुळे त्यांना कुठेही प्रामाणिक काम मिळत नाही व जगण्यासाठी गुन्हेगारीशिवाय दुसरा मार्ग राहात नाही.

वर उल्लेखित निरीक्षणगृहातील गंमत-शाळा प्रयोगात मुलांच्या केसेस नियमांच्या आधारे तडीस नेऊन त्या संपवणे, तसेच त्यांच्याबरोबर जोडलेले मायेचे बंध, केलेले समुपदेशन यामुळे पळून जाण्याचे प्रमाण पूर्ण थांबलेच, पण आपले भविष्य जाणलेली ही मुले स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल असे प्रशिक्षण द्यावे म्हणून मागे लागली. संस्थेच्या मर्यादेत त्याचीही व्यवस्था केली. हा यशस्वी प्रयोग बघून तो चालू ठेवावा अशी विनंती संबंधित खात्याच्या प्रमुखांकडून आली. प्रस्तावाची फाइल गहाळ (?) झाली. नंतर ती मुले भेटली की ताई काय झाले असे विचारीत. माझी व्यथा त्यांना सांगितली. काही दिवसांनंतर समजले की ती मुले पळून गेली व आज त्यांच्या मोठय़ा गँग्स आहेत. गुन्हेगार कोण? आशा दाखवणारी मीसुद्धा गुन्हेगारच की!

याउलट मोठय़ा घरातील मुले जेव्हा गुन्हे करतात तेव्हा त्यांना त्यातून सोडविण्यासाठी पालक अनेक गुन्हे करतात. माझ्यासमोर आणलेल्या एका ९ वीतल्या मुलाने गाडी चालवताना अपघात केला, बालमित्र दगावला. मुलाची भावनिक स्थिती वाईट होती, पण गुन्हाही मोठा होता. बालन्याय अधिनियमात असे मानले आहे की मुले गुन्हेगार नसतात. त्यामुळे शिक्षेची तरतूद नाही. समाजसेवा करून पश्चात्तापाची संधी दिली जाते किंवा समुपदेशनासाठी पाठवले जाते. सदर मुलाला समाजसेवेसाठी माझ्याच संस्थेत पाठवण्यात आले, परंतु डॉक्टरांकडून खोटी सर्टििफकेट आणून ती टाळण्याचा तसेच मी याबाबत गप्प बसावे म्हणून मला पैसे देण्याचा पालकांनी प्रयत्न केला. शेवटी त्या मुलाला परदेशी पाठवले गेले. अशाच एका अलीकडच्या केसमध्ये एका गर्भश्रीमंत उन्मार्गी मुलाकडून शेजारच्या बाळावर लैंगिक अत्याचार झाला. पॉक्सोची केस असूनसुद्धा त्याला नियमबाह्य़ जामिनावर सोडून दिले. वास्तविक त्या मुलापासून पीडित मुलीला आता जास्त धोका होता हे ‘चाइल्डलाइन’ व मुलीची आई तळमळीने करून सांगत होती.

काही पालक स्वत:च आपल्या मुलावर बिघडला/वाया गेला असे शिक्के मारतात. मित्रमंडळींत/नातेवाईकांत चर्चाही करतात. अशी काही मुले जेव्हा माझ्याकडे आणली गेली तेव्हा त्यांनी पालक-शिक्षक असे म्हणतात तर वाईट वागूनच दाखवतो म्हणून ‘बिघडल्याचे’ सांगितले. बहीण विनाकारण संशय घेते म्हणून अभ्यास सोडून दिलेला एक मुलगा कसाबसा वाचवला, तर आईचे बॉयफ्रेंड सहन न झालेली आपणहून तेथे गेलेली मुलगी वेश्या वस्तीतून सोडवून आणावी लागली. १३ वर्षांच्या मुलाने बलात्कार केल्यामुळे गर्भ राहिला असा मोलकरणीने आळ घेतला. डॉक्टर आई-वडिलांना जराही शंका आली नाही व मुलाला दोषी मानून मोलकरणीचे प्रकरण त्यांनी दाबले. मात्र तो मुलगा बिथरला तो बिथरलाच. शाळा-कॉलेजातून त्याच्या गैरवर्तणुकीच्या तक्रारी येत. आई-बाप पशांच्या जोरावर पांघरूण घालत. प्रत्यक्ष तो जी गैरकृत्ये करतो ती खरेच करतो का याची कोणतीही शहानिशा न करता त्याला आई-वडिलांनीच गुन्हेगार ठरवले. त्याचे अभ्यासावरून लक्ष उडाले. ड्रग्स-दारू याचा आधार शोधू लागला. आईला मी एकच प्रश्न विचारला, ‘‘मुळातच त्याची चूक होती का? कदाचित, मोलकरणीनेच त्याचे लैंगिक शोषण केले असेल असा विचार कधी तुम्ही केलात का?’’ साक्षात्कार घडल्यासारखी ती उच्चशिक्षित बाई म्हणाली, ‘‘खरेच की! हे विष समाजात आणायला मी जबाबदार मानून मी त्याला विष देऊन स्वत: आत्महत्या करायचा विचार करत होते.’’

बालगुन्हेगारी कशाची उपज आहे? मुलांमध्ये विशिष्ट वयात आक्रमकता भरलेली असते. त्या आक्रमकतेला यथायोग्य वाट करून देणे हे मोठय़ांचे काम आहे. मुक्त खेळ हे त्याचे सर्वोत्तम माध्यम. खेळात चोर-पोलीस, लढाई, राम-रावण असे खेळ खेळताना कधी चोर तर कधी पोलीस, कधी विजेता तर कधी हरलेला अशा भूमिका सहज घेतल्या जातात. नकळत अंगातील रग तर जिरतेच, पण चांगल्या-वाईटातील फरकपण समजू लागतो. पकडापकडी, हुतुतू, अशा मदानी खेळातून रग जिरते. आक्रमकता समाजमान्य पद्धतीने बाहेर पडते. लीडर आणि फॉलोअर या भूमिकांचा सहज स्वीकार होतो. पण मुलांची मदाने बळकावून, त्यांच्या मुक्त खेळावर अभ्यासाच्या नावाखाली बंधने आणून त्यांच्यातील रग कोंडली कोणी? मुलांना खेळातल्या बंदुकी कोण आणून देते? त्या बंदुकी सनिकांच्या नसतात दरोडेखोरांच्या असतात. ‘‘माझी मुले कशी ढिशाँव ढिशाँव फाइट मारतात’’ याचे कौतुक, गुन्हेगारीचे उदात्तीकरण कोण करते? मग गुन्हेगार कोण?

मुलाचा मित्रपरिवार कोण, त्यांची मनोरंजनाची साधने कोणती, आदर्श कोणते या सर्वावर, लुडबुड वाटणार नाही अशी देखरेख हवी आहे. त्यासाठी उत्तम संवाद आणि नात्यातील मोकळेपणाची गरज आहे. मायेचे सुकाणू आयुष्याचे जहाज कधीच भरकटू देत नाही. आमच्याकडे असे नाही तर तसे लक्ष द्या असे लेकरे ओरडून सांगत आहेत. बालगुन्हेगार मोठय़ांच्या गुन्ह्य़ांची शिकार आहेत निर्वविाद!

chaturang@expressindia.com