11 December 2019

News Flash

‘एकमेवाद्वितीय’ महत्त्वाकांक्षा

शाळेचं सगळं सांभाळून ही मुलगी अहर्निश खेळाची आराधना करायची.

दुर्दम्य आशावाद आणि जबर महत्त्वाकांक्षा यांचं विलक्षण मिश्रण मित्रात होतं. मित्राच्या स्वभावातील महत्त्वाकांक्षा ‘एकमेवाद्वितीय’ होती. तिच्या मोकळ्या क्षणांवर फक्त कबड्डीचा हक्क होता. सातत्यानं केलेल्या या सरावाचं फळ मित्राला मिळालं. राज्यस्तरीय कबड्डी संघात तिची निवड झाली. एकीकडे खेळातलं देदीप्यमान यश मिळवत असतानाच मित्रानं शैक्षणिक यशाची कमान चढती ठेवली.

तिचं नाव मित्रा. आपलं म्हणणं जोरात मांडायचं, रेटून मांडायचं, अशा प्रकारे विरोध करणाऱ्यांना गप्प बसवायची किमया मित्राला चांगलीच साध्य झाली होती. पण एरवी मोठय़ा माणसांमधली ही ‘वाद’ पद्धत चीड आणणारी असली तरी दहा-अकरा वर्षांच्या मित्राला तसं बोलताना बघून हसू यायचं.

आपण मोठी माणसं गरजू मुलांना शोधून काढतो. त्यांना शिकवतो (निदान शिकवण्याचा प्रयत्न करतो.). पण मित्राचं वैशिष्टय़ असं की, तिनं मला शोधून काढलं. आमच्या घरी मुलं येतात, अभ्यास करतात, हे तिला समजलं आणि ती एके दिवशी सकाळी दत्त म्हणून दारात उभी राहिली. ‘मी पण येणार तुमच्या इथं अभ्यास करायला,’ अशी थेट सुरुवात केली तिनं. परवानगी नाही, विनंती नाही. सरळ प्रवेशच. मित्राचा पुढचा सारा प्रवास बघताना मला वारंवार मित्राच्या त्या पहिल्या वाक्याची आठवण यायची. मित्रा आमच्या घरी यायला लागली. येताना एकटी आली नाही. सोबत मुलामुलींचा लवाजमा घेऊन आली. बाकीची मुलं तिच्या आजूबाजूला बसायची आणि मित्रा त्यांच्या मधोमध. मित्राचं पहिलं वाक्य जसं मला पंचवीस वर्षांनी जसंच्या तसं आठवतंय, तशीच तिची ती मुलांच्या मधोमध बसलेली मूर्तीही आठवतेय.

मित्राकडे बाहेर जाण्यासाठी घालावा, असा बहुधा एकच फ्रॉक होता. गडद निळा, त्यावर रेखाटलेली फुलांची चित्रं. रोज मित्रा तो एकच फ्रॉक घालून यायची. जवळजवळ दोन र्वष तिनं रोज तो फ्रॉक घातला. पण मित्राचा फ्रॉक कधी चुरगलेला दिसला नाही की मळलेला. रोज स्वच्छ धुतलेला, पाटाखाली ठेवून इस्त्री केलेला फ्रॉक घालून मित्रा आमच्या घरी यायची.

मित्रा दिसायला खूप देखणी. गव्हाळ वर्ण, पिंगट डोळे आणि किंचित सोनेरी झाक असलेले केस. एकमेकांना शोभून दिसतील असे रंग तिच्या रूपात होते. मोठ्ठय़ानं हसली की दात दिसायचे. ते मात्र या सगळ्या आल्हादक दिसण्याला विसंगत वाटायचे. किंचित सुजलेल्या दिसणाऱ्या हिरडय़ा, दातातील फटी आणि बऱ्याच वेळा दातातून येणारं रक्त मित्राच्या शारीरिक आबळीचं चित्र स्पष्ट दाखवायचं. मित्रा तीन भावंडांतली सर्वात लहान मुलगी. मोठा भाऊ, मधली बहीण आणि सर्वात लहान मित्रा. आई-वडील आणि तीन मुलं, असं आटोपशीर कुटुंब. वडिलांना एका खासगी कंपनीत बऱ्यापैकी नोकरी. आईदेखील काही ना काही छोटे-मोठे गृहउद्योग करायची. ठाकठीक म्हणावी तशी परिस्थिती होती. घरात छोटय़ा-मोठय़ा कुरबुरी होत्या. मित्राच्या आईला वैभवशाली राहणीमानाचा सोस होता. पण ते तेवढय़ापुरतंच. मात्र मित्राचे वडील जुगार खेळायला लागले आणि बघता बघता स्थितीची अवस्था झाली. वडिलांनी कर्ज घेतलं नाही, अशी ओळखीची व्यक्ती राहिली नाही. घराचा आर्थिक डोलारा कोसळत गेला पण मानसिक धैर्य, अभंग ठेवण्याचा प्रयत्न उरलेल्यांनी केला. त्या काळात उरलेल्या चौघांनी काही करायचं शिल्लक ठेवलं नाही. पेपर टाकणं, उटणी तयार करणं, कारखान्यातून गठ्ठय़ानं येणाऱ्या फ्रॉक्सना लेस लावणं, लेबल चिकटवणं एक ना दोन, असंख्य कामं केली त्यांनी. नवलाची गोष्ट म्हणजे ही सगळी कामं करण्यात मित्राच्या वडिलांचा सक्रिय सहभाग असे. पैसे हरून, कर्जबाजारी होऊन पराभूत मनोवृत्तीनं घरी आलेला हा माणूस कामाचा ढिगारा उपसायला लागायचा.

पण संसाराचा गाडा ढकलायला हे सगळे प्रयत्न अत्यंत अपुरे होते. घेणेकरी दारात यायला लागले. रेशन आणणंदेखील परवडेना. घेणेकऱ्यांना चुकवता, चुकवता वडिलांच्या नोकरीनं कधी रजा घेतली हेही कळलं नाही. या सगळ्या गदारोळात खऱ्या अर्थानं उभी राहिली ती ही तीन मुलं. मित्राच्या घरी इतकं काही चालू होतं ना तरी तिचं अभ्यासातलं लक्ष कधी उडालं नाही. नेतृत्वगुण मावळले नाहीत. चेहऱ्यावरचं हास्य मात्र कधी कधी मावळून जायचं.

त्या सुमारास मित्राची खेळाच्या विषयातली गती माझ्या लक्षात आली होती. पैसे मिळवण्यासाठी घरी करावं लागणारं काम, अपुरा आहार, भावनिक आंदोलनं या सर्वाचा अपरिहार्य परिणाम मित्रावर होत होता. पण सायंकाळी जवळच्या मैदानावर जाऊन आम्ही सगळे जण खेळायला लागलो की चेवानं खेळायची मित्रा. त्या वेळचा तिचा आवेश ‘झाँसी की रानी’चा असायचा. जवळच असलेल्या व्यायाम मंदिराच्या संचालकांच्या डोळ्यात हा जोशपूर्ण खेळ भरला आणि मित्राची वर्णी व्यायाम मंदिरातील कबड्डीच्या प्रशिक्षणासाठी लागली. त्यानंतर मागे वळून बघणं हा प्रकारच राहिला नाही. घरचं, शाळेचं सगळं सांभाळून ही मुलगी अहर्निश खेळाची आराधना करायची. रात्रंदिवस मित्राच्या डोक्यात एकच विचार असायचा. खेळाचं मैदान गाजवायचं. त्यात करिअर करायचं. दृढनिश्चय म्हणजे काय हे मित्राच्या प्रत्येक कृतीतून प्रत्ययाला येत होतं. त्या वेळी मित्राचं वय तरी असं काय असणार? जेमतेम आठवीत होती ती.

मग एकदा तो प्रसंग घडला आणि प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आलं. कबड्डी खेळता, खेळता मित्रा मैदानावरच बेशुद्ध पडली. व्यायाम मंदिरात त्या वेळी सुदैवानं एक डॉक्टर हजर होते. त्यांनी मित्राला काळजीपूर्वक तपासलं. तिला दूध आणि बिस्किटं मिळतील अशी व्यवस्था केली गेली. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की मित्रा ‘अ‍ॅनिमिक’आहे. अशक्तपणा खूप आहे तिला आणि ताबडतोब उपचारांची गरज आहे.

मित्राची त्या वेळची मूर्ती आणि मुद्रा माझ्या पक्की लक्षात राहिली आहे. आम्ही डॉक्टरांशी बोलत होतो आणि ती दूध, बिस्किटं खात बाहेरच्या एका बाकावर बसली होती. अगदी कृश झाली होती ती. वाकून बसलेली तिची मूर्ती केविलवाणी दिसत होती. मुद्राही काहीशी खिन्न भासत होती. वाटलं, मित्राला सगळं समजतंय. पण आपण यात काही करू शकत नाही, याची हतबलतादेखील स्पष्ट दिसतेय तिच्या मुद्रेवर.

त्यानंतर या प्रकरणात मी गंभीरपणे लक्ष घातलं. मित्राच्या घरी गेले. मंडळी काय आणि कितपत जेवतात याची चौकशी केली. त्यातून जे निष्पन्न झालं ते भयावह होतं. भाजी तर सोडाच, या कुटुंबाला पुरेशी कडधान्यंही परवडत नव्हती (त्या वेळी आजच्या तुलनेनं कडधान्यं खूपच स्वस्त होती). जेमतेम पाव वाटी कडधान्य शिजवून ही पाच मंडळी आपला उदरनिर्वाह करत होती. मित्राला ताबडतोबीनं दूध आणि फळं द्यायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू तिची तब्येत सुधारली. तिला उत्साही वाटायला लागलं.

दुर्दम्य आशावाद आणि जबर महत्त्वाकांक्षा यांचं विलक्षण मिश्रण मित्रात होतं. त्याला थोडं दूध, थोडी फळं आणि थोडा आधार यांची जोड मिळाल्यावर मित्राच्या महत्त्वाकांक्षेचं रोपटं तरारून उठलं. खरं सांगते, मित्राच्या स्वभावातील महत्त्वाकांक्षा ‘एकमेवाद्वितीय’ होती. तिच्या मोकळ्या क्षणांवर फक्त कबड्डीचा हक्क होता. सातत्यानं केलेल्या या सरावाचं फळ मित्राला मिळालं. राज्यस्तरीय कबड्डी संघात तिची निवड झाली. राज्यात, देशात मित्राला ठिकठिकाणी जाण्याची संधी मिळाली. असंख्य पुरस्कारांची ती मानकरी ठरली. तोपर्यंत शिक्षणाच्या गाडीत कोणताही अडसर मित्रानं आणून दिला नाही. एकीकडे खेळातलं देदीप्यमान यश मिळवत असतानाच मित्रानं शैक्षणिक यशाची कमान चढत ठेवली.

या सगळ्या वर्षांत मित्राच्या घरच्या परिस्थितीत सावकाशीनं सुधारणा होत गेली, त्याचं सर्व श्रेय मित्राच्या मोठय़ा भावाला जातं. शालांत परीक्षा पास केल्याबरोबर फिरत्या विक्रेत्याची नोकरी त्यानं पकडली, अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि मिठ्ठास वाणी यांच्या बळावर यश स्वाभाविकपणेच मिळालं. लवकरच हुद्देदार बनलेल्या या मुलानं बापाच्या कर्जाची पै न् पै फेडून टाकली. घर घेतलं. धाकटय़ा बहिणीचं लग्न करून दिलं. या संदर्भात मित्राचा हा भाऊ एकदा बोलला. म्हणाला, ‘‘या यशाच्या मागचं प्रेरणास्थान खरं सांगायचं तर मित्रा आहे. या माझ्याहून पाच-सहा वर्षांनी लहान असलेल्या बहिणीची जिद्द, चिकाटी आणि आशावाद बघताना मी थक्क होत गेलो. तिचा भाऊ असून वारंवार वाटणाऱ्या निराशेला रामराम ठोकायला पाहिजे असं वाटायला लागलं खरं.’’

भावाच्या खंबीर पाठिंब्यानं मित्राच्या यशाच्या चढत्या कमानीचा आलेख उंचावत गेला. भावानं पुढं तिला नोकरी मिळून स्थिरावेपर्यंत तिच्या खेळाच्या (आहारासकट) खर्चाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्या काही वर्षांत या भावाला आपल्या दोनही बहिणींना भारी ओवाळणी नाही घालता आली, पैसेच नव्हते त्याच्यापाशी तेवढे. सगळे पैसे बहिणींचं करिअर व्हावं म्हणून खर्च होत होते.

आज मित्रा एक प्रथितयश अधिकाऱ्याची पत्नी आहे. दोन मुलांची आई आहे. भाऊ आपल्या संसारात गुंतला आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यानं कीर्ती मिळवली. मित्राचे आई-वडील अजूनही जुन्या एका खोलीच्या घरात आनंदानं राहतात (वडील व्यसनमुक्त झाले हाच केवढा मोठा आनंद).

या सर्व यशस्वी चित्राकडे बघताना एक सल जाणवतो. या सगळ्या धडपडीच्या संघर्षांच्या काळात मित्राच्या बहिणीकडे सर्वाचंच दुर्लक्ष झालं. फार, फार दुर्लक्ष झालं. अभ्यासात, खेळात अशा ‘मान्यताप्राप्त’ क्षेत्रात फारशी चमक दाखवू न शकलेली ही मुलगी दुर्लक्षित राहिली. कुढत राहिली, भांडत राहिली. परिणामत: अधिकाधिक मागे पडत गेली. तिला भेटलेल्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. त्याच्याशी तिनं झटपट लग्न केलं व आपली ‘सुटका’ करून घेतली. त्या वेळी मित्रावर आम्हा सर्वाचंच इतकं लक्ष केंद्रित झालं होतं की विंगेत एक मुलगी उभी आहे व आपल्या परीनं दुनियेच्या रंगमंचावर ती येऊ बघतेय, हे ध्यानातच आलं नाही. आणि मग ती तिथेच अडकून राहिली..

ही गोष्ट विलक्षण मित्राची, तिच्या असामान्य भावाची आणि सामान्य(?) बहिणीची!

रेणू गावस्कर
eklavyatrust@yahoo.co.in 

First Published on July 16, 2016 1:06 am

Web Title: ambition 2
Just Now!
X