22 August 2019

News Flash

मुन्ना

वो फोटो लेके मै घर जाऊंगा।

रिमांड होममधून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मुलाला मी एक छोटी भेट देत असे. मुन्नालाही विचारलं. मुन्नानं कुठलीही वस्तू मागितली नाही. उलट म्हणाला, “मुझे ऐसा वैसा कुछ नही चाहिए। अगर देना ही है तो अंधे वेद मेहताजीका एक फोटो दे दो। वो फोटो लेके मै घर जाऊंगा। हमेशा साथ रखूंगा।” मुन्नाची ती मागणी ऐकताना त्याच्यापर्यंत काय पोहोचलंय याची मला जाणीव झाली…

सायंकाळची वेळ. रिमांड होममधल्या पंधरा-सोळा वयोगटातल्या चाळीस-पंचेचाळीस मुलांनी भरलेली ती खोली आरडाओरडा आणि कर्कश सुरात म्हटलेली भजनं यांनी भरून गेली होती. या ठिकाणी कधी काळी शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा करणंही व्यर्थ होतं इतका गोंधळ तिथं चालू होता.

मी एका कोपऱ्यात उभी होते. समोरच्या घडामोडी बघण्यापलीकडे त्याक्षणी तरी माझ्या हातात काही नव्हतं. काही वेळ तसाच गेला. मग मात्र काही मुलांचं लक्ष माझ्याकडे गेलं. भजनाचा टीपेला गेलेला सूर खाली येऊ लागला. माझ्याशी जवळीक असणारी मुलं आसपास येऊन बसू लागली… पंधरा-वीस मिनिटांतच तिथं बऱ्यापैकी शांतता पसरली. आपल्याजवळ कोणीतरी आहे याचं समाधान त्या एकाकी मुलांच्या मुद्रेवर दिसू लागलं. थोडय़ाच वेळात गोष्ट सांगायला आणि ऐकायला तिथं अनुकूल वातावरण तयार झालं.

कितीतरी वर्षे रिमांड होममधल्या त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या प्रेमाला आसुसलेल्या मुलांना मी अगणित गोष्टी सांगितल्या. त्यातली बहुतेक चरित्रं होती. सुरुवात पंचेंद्रियांपैकी तीन इंद्रियं हरवलेल्या हेलन केलरनं झाली. पुढं त्यात अनेकांनी हजेरी लावली. लोकमान्य टिळकांपासून ते अगदी थेट मिथुन चक्रवर्त़ींपर्यंत कोणतंच व्यक्तिमत्त्व आम्हाला वर्ज्य नव्हतं. मात्र त्यातही अगदी पाचव्या वर्षीच दृष्टी गमावूनदेखील यशाची सर्वोच्च शिखरं सर करणारे

वेद मेहता मुलांचे आवडते झाले. त्यांचे प्रेरणास्रोत ठरले. वेद मेहतांच्या ‘द लेज् बिट्वीन द टू स्ट्रीम्स’ या पुस्तकाची तर कितीतरी महिने पारायणं चालली होती.

या पारायणात सगळ्यात मोठा सहभाग होता तो मुन्नाचा. वेद मेहतांनी मुन्नाला वेड लावलं होतं. अभ्यासात अगदी पिछाडीवर असणारा हा मुलगा! उत्तर प्रदेशचा रहिवासी. आमचं ‘वेदी’, ‘डॉडीजी’, ‘मम्माजी’ असं वेद मेहतांच्या पुस्तकांचं सांगणं, ऐकणं चालू होतं, त्या वेळी ‘पागल’ अशी इतरांनी संभावना केलेला हा मुलगा देहभान हरपून एका दृष्टिहीन माणसाची यशोगाथा ऐकत होता. त्यातच त्याला स्वत:च्या आयुष्याचा मार्ग दिसत होता. हा मुन्ना म्हणजे त्याच्या समवयस्क मुलांनी ‘पागल’ असं लेबल लावून जवळपास वाळीत टाकलेला. याला अभ्यासातला श्रीगणेशादेखील जमत नाही असं त्याच्या अर्धवेळ शाळेतल्या शिक्षकांचं मत. तर कार्प़ेंट्री म्हणेज सुतारकामाचं कौशल्य तो आत्मसात करू शकत नाही, असा त्याच्या विभाग प्रमुखांचा समज.

मुलांनी कितीही चिडवो, मुन्ना कधी चिडला नाही, त्यांच्या मागे रागावून धावला नाही. शिक्षकांनी टीका केली म्हणून हिरमुसला नाही. पुन्हा त्याचं दिसणंही तसंच. म्हणजे चांगला उंचापुरा होता. वर्णानं गव्हाळ, पिंगट रंगाचे डोळे, सरळ नाक, रूपाच्या दृष्टीने तसा उजवा. मात्र चेहऱ्यावर कायम हरवल्यासारखे भाव असत. शर्ट पँटची बटणं क्वचितच व्यवस्थित लावलेली असत. बहुधा ती खालीवर लावलेली असल्याचं पाहायला मिळे. त्यामुळेच ‘द लेज् बिट्वीन द टू स्ट्रीम्स’ची कथावस्तू सांगायला सुरुवात केल्यावर मुन्ना मागे येऊन बसायला लागला, तेव्हा त्याला त्यातलं काही कळेल असं कोणालाच वाटलं नाही. उलट तो येऊन बसला की ‘ये पागल यहाँ क्या कर रहा है।’ अशा अर्थाच्या खुणा मुलं एकमेकांना करीत असत. हसत, त्याच्या उलटसुलट बटणांकडे बोटं दाखवत.

मुन्नानं मात्र मुलांच्या या आविर्भावाची, खाणाखुणांची अजिबात दखल घेतली नाही. किंबहुना आमच्या या कथाकथनाच्या काळात त्यानं इतर कशाकडेही लक्ष देणंच नाकारलं. रिमांड होमच्या भल्या मोठय़ा दारातून मी वेद मेहतांचं पुस्तक धरून येताना दिसले की मुन्ना ताबडतोबीने माझ्या मागोमाग येत असे. काही अंतरावर उकीडवा बसून राहत असे. गोष्ट सुरू झाली की एकतानतेनं ऐके. तासाभरानंतर मी आवरतं घ्यायला सुरुवात केली की उठून उभा राहत, ‘बहोत अच्छा बहोत अच्छा’ असं म्हणत निघून जाई. जाताना चाल बदललेली असे. काहीशी दमदार पावलं टाकत मुन्ना जाई.

असं एकंदरीत छान चाललेलं असताना मुन्नाची संस्थेतून सुटून उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी जाण्याची वेळ येऊन ठेपली. मुन्नाचं भवितव्य तसं अंधारातच होतं. वर्गात चार वर्षं बसला, पण जेमतेम र-ट-फ करीत वाचण्यापलीकडे त्याची मजल गेली नाही. स्वतंत्रपणे सुतारकाम करू शकेल असंही वाटेना. पण माझ्या मात्र एवढं लक्षात आलं की वेद मेहतांच्या बालपणीच्या अंधाऱ्या, संघर्षाच्या आठवणी ऐकताना एरवी मलूल, भावहीन दिसणारा मुन्नाचा चेहरा बदलतो, त्यात एक चमक येते. त्यामुळेच एकदा आम्ही दोघं (विशेषत: मी) काळजीनं त्याच्या भवितव्याविषयी बोलत असताना मुन्ना म्हणाला, “उसमे इतना डरने का क्या है? अगर एक अंधा आदमी इतना कुछ कर सकता है तो मै किसी बात से क्यूं डरूं? घर ढूंढ निकालेंगे और जो भी काम हाथ मे आयेगा उसमे दिल और दिमाग लगा के कोशिश करेंगे। बस्स। क्या करना है मालूम नही लेकिन क्यूं करना है अब समझमें आया।”

मुन्नाचं हे भाष्य ऐकताना इतकं समाधान वाटत होतं, इतका आनंद वाटत होता. वाटत होतं, सगळ्यांना ओरडून सांगावं की ज्या मुलाला तुम्ही ‘पागल’ समजताय तो हे सगळं सांगतोय. हे मुन्ना बोलतोय, मुन्ना विचार करतोय. पण एवढय़ावरच हे संपलं नाही.      त्यावेळी बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मुलाला मी एक छोटी भेट देत असे. मुलं दीर्घकाळ संस्थेच्या चार भिंतींत राहिलेली असत. त्यांना बाहेर पडताना काही गोष्टी हव्याशा वाटत. एखादा टूथब्रश, कंगवा, एखादं बनियन. मागणी अगदी साधी असे. पण त्या देवघेवीत जो आनंद होई तो अवर्णनीय असे.

मुन्नालाही मी काही हवंय का विचारलं, त्यावर त्याने जे उत्तर दिलं ते मात्र अविश्वसनीय होतं. मुन्नानं कुठलीही वस्तू मागितली नाही. उलट आपल्या नेहमीच्या संथ आवाजात तो म्हणाला, “मुझे ऐसा वैसा कुछ नही चाहिए। अगर देना ही है तो अंधे वेदजीका एक फोटो दे दो। वो फोटो लेके मै घर जाऊंगा। हमेशा साथ रखूंगा।”

मुन्नाची ती मागणी ऐकताना त्याच्यापर्यंत काय पोहोचलंय याची मला जाणीव झाली. त्यानंतर अधीक्षकांकडूनच मुन्नाची मुदत थोडी वाढवून घेतली आणि वेद मेहतांची अनेक पुस्तकं मिळवली. पुढचे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस आम्ही ती इंग्रजी पुस्तकं अनुवादित करून वाचत होतो. वेद मेहता व त्यांचे कुटुंबीय यांची अनेक छायाचित्र आम्ही दोघं मिळून बघत होतो. मी मुन्नाला वेद मेहतांच्या या कुटुंबीयांचा त्या छायाचित्रांद्वारे परिचय करून दिला. मुन्ना नि:शब्दपणे ती छायाचित्रं बघायचा. ते कुटुंबचित्र, त्याच्या आत खोल जात होतं. खास करून वेद मेहतांच्या बहिणींची छायाचित्रं पाहताना मुन्ना आपल्या घरच्या आठवणींनी स्वब्ध होत होता. जाताना मुन्नानं वेद मेहतांचं एक छायाचित्र आपल्या शर्टाच्या खिशात ठेवलं व भरून आलेल्या आवाजात तो म्हणाला, “इन्होने मुझे सिखाया की जिंदगी में कोई कम नही होता! और हाँ, इन्होने ये भी सिखाया मुझे की किसी को बेचारा नही कहना! कोई बेचारा नही! हर कोई साईकल सीख सकता है।”(सायकलचा संदर्भ वेद मेहतांच्या एकटय़ानं सायकल शिकण्याशी होता) एवढं बोलून मुन्नानं माझा निरोप घेतला. पुन्हा फिरून मुन्ना मला भेटला नाही. पण त्याचे निरोपाचे शब्द मात्र मी कधीही विसरले नाही. ‘जिंदगी में कोई कम नही! कोई बेचारा नही! हर कोई साईकल सीख सकता है! हर कोई साईकल सीख सकता है!’

रेणू गावस्कर

eklavyatrust@yahoo.co.in

First Published on October 8, 2016 1:09 am

Web Title: munna