काही लिहावे असे सध्याचे वातावरण नाही, असे लेखकाने म्हटल्याबरोबर, आधी लिहिणे थांबवू दे- मग पाहू, असे सांगणारे सांस्कृतिक कार्यमंत्री ज्या देशाला लाभले आहेत त्या देशाचे भले असो, एवढीच प्रार्थना करणे आता सर्वसामान्य नागरिकांच्या हाती राहिले आहे. सध्याचा काळ हा खरोखरच सांस्कृतिक आणीबाणीचा आहे. पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्या फौजा एकमेकांना भिडल्या आहेत. कोणत्याही समाजात पुढचा विचार करणारे नेहमीच अल्पसंख्याक असतात. सनातनी, ‘जैसे थे’वादी यांच्याकडे जबरी संख्याबळ असते. त्या बळावर ते येथील सामाजिक-सांस्कृतिक अवकाश ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. आज भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर येथील सनातन्यांच्या अंगी बारा हत्तींचे बळ आल्यासारखे झाले आहे. त्यातून कोणी काय खावे-प्यावे-ल्यावे-बोलावे-लिहावे, काय विचार करावा आदी सर्व गोष्टी ठरविण्याचे अधिकार त्यांनी आपल्या हाती घेतले आहेत. साहित्य अकादमीचे वा तत्सम पुरस्कार परत केलेल्यांपैकी काही लेखकांची खंत आहे ती ही. त्यातील निषेधाचे निवडक फलक उंचावणाऱ्या पक्षपाती विचारवंतांवर ‘लोकसत्ता’ने याआधीच कोरडे ओढले आहेत. मात्र समाजात सगळेच तसे नसतात. त्यापैकी काहींना प्रामाणिकपणे सद्यकालीन भारतात वैचारिक प्राणवायूची कमतरता निर्माण झाल्यासारखे वाटत आहे. त्यांचा झगडा त्या प्राणवायूसाठी आहे. केंद्रात सांस्कृतिक कार्यमंत्री यांसारखे महत्त्वाचे पद भूषविणाऱ्या, वैद्यकशास्त्राची पदवी असल्याने सुशिक्षित म्हणता येतील असे असणाऱ्या महेश शर्मा यांना त्याची जाणीव असायला हवी. मात्र सुशिक्षितपणा हा सुसंस्कृततेसाठी प्रतिशब्द बनू शकत नाही हे दाखविण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यामुळेच ‘आम्हाला लिहिता येणे अशक्य झाले आहे, असे साहित्यिक म्हणत असतील तर त्यांना आधी लिहिणे बंद करू देत. मग काय ते आम्ही बघू,’ असे अत्यंत उर्मट उद्गार काढून त्यांनी आपल्या संस्कृतीचा परिचय दिला. शर्मा यांची संस्कृती सांगणारे हे काही एकमेव विधान नाही. यापूर्वीही त्यांनी माजी राष्ट्रपती दिवंगत ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबाबत बोलताना अकलेचे दिवे पाजळले होते. कलाम हे ‘मुस्लीम असूनही थोर राष्ट्रवादी’ आहेत असे बोलताना आपण येथील तमाम मुस्लिमांना राष्ट्रद्रोही ठरवत आहोत याचेही भान त्यांना राहिले नव्हते. दादरी प्रकरणातही त्यांनी अशाच प्रकारे गरळ ओकले होते. आपण संघाच्या परिघावरील कोणा दांडगट संघटनेचे नव्हे, तर धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणारे नरेंद्र मोदी ज्या पक्षाचे नेते आहेत त्या भाजपचे सदस्य आहोत याचे विस्मरण त्यांना कसे झाले असावे हा सवाल येथे फजूल आहे. याचे कारण त्यांची मनोवृत्तीच मध्ययुगीन आहे. महिलांनी रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी वगैरे बाहेर पडणे हे भारतीय संस्कृतीत बसत नाही, असे म्हणणारी व्यक्ती ही एकविसाव्या शतकातील जशी असू शकत नाही, तशीच ती भारतीय संस्कृतीतही बसू शकत नाही. ही संस्कृती विविध विचारांना कवेत घेणारी आणि प्राय: सहिष्णू आहे हे त्यांना समजले असते, तर ट्विटरवरील जल्पकांप्रमाणे (ट्रोल्स) ते शाब्दिक गुंडगिरी करीत सुटले नसते. अर्थात मोदी यांनी त्यांना अशाच प्रकारची बेशरम वक्तव्ये करण्याच्या सांस्कृतिक जबाबदारीसाठी केंद्रीय मंत्रिपद दिले असेल तर मात्र त्याबद्दल कोणीही काही न बोललेले बरे.