ती कमला नायर ऊर्फ कमला दास ऊर्फ माधवीकुट्टी ऊर्फ कमला सुरैय्या. अतिशय तीव्र संवेदनशीलता आणि विलक्षण प्रतिभा असणाऱ्या तिने जवळजवळ चारशे कथा, कविता लिहिल्या. खऱ्या प्रेमाचा शोध आणि स्त्री-पुरुषांमधील शारीरिक आकर्षण, त्याची पूर्तता न झाल्याने येणारे नैराश्य, प्रेमातील वंचना, विश्वासघात या आशयसूत्रांभोवती तिचे साहित्य फिरत राहते. तिच्या कविता इतर देशांमध्ये भाषांतरित रूपात गेल्या. एवढेच काय, पण १९८४ च्या नोबेलसाठी तिचे नामांकनही झाले. अनेक मानसन्मान पदरी आले, पण परिपूर्ण, खऱ्या प्रेमाचा शोध थांबलाच नाही. तरल, वास्तव, पण धाडसी लेखनामुळे ती आयुष्यभर उलटसुलट चर्चेतच राहिली.

‘स्त्रीला सारखं स्वत:ला सिद्ध करावं लागतं.

Marathi Actress Prajakta Mali glamorous photoshoot viral
“नुसता जाळ अन् धूर…”, प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले, “हाय गर्मी”
Saleel Kulkarni Shared special post for son shubhankar kulkarni
“आमच्या शुभूने…”, सलील कुलकर्णींची मुलासाठी खास पोस्ट; त्याचं पहिलं हिंदी गाणं येतंय श्रोत्यांच्या भेटीला
Swargandharva Sudhir Phadke musical biopic trailer launch
राम जन्मला गं सखी…; बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
aai kuthe kay karte fame milind gawali shared laxmikant berde, vijay chavan, ramesh bhatkar memories
“जिथे कुठे असतील, तिथे सुद्धा ते…”, मिलिंद गवळींनी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाले…

इतर काहीही करून दाखवण्याआधी, तिला चांगली पत्नी, चांगली आई म्हणून सिद्ध करावं लागतं.

याचा अर्थ असतो, वर्षांनुवर्षांची प्रतीक्षा. दीर्घ प्रतीक्षा. तारुण्याची सारी र्वष पिकून जाईपर्यंत प्रतीक्षा’

असे सार्वकालीन सत्य सांगणाऱ्या कमला नायर ऊर्फ कमला दास ऊर्फ माधवीकुट्टी ऊर्फ कमला सुरैय्या. ही सारी नावे एकाच स्त्रीची. आपल्यात वास करणाऱ्या या वेगवेगळ्या व्यक्तित्वांचा शोध घेत, त्यांचा आविष्कार लेखनातून करणारी कमला!

कमलाला कवितेचा वारसा घरातूनच मिळाला होता. मल्याळी कवितेची जननी मानल्या गेलेल्या, बालामणी अम्मा (याच सदरातील ४ फेब्रुवारीचा लेख) या कमलाच्या जन्मदात्री होत्या. दोघीही प्रतिभावान कवयित्री खऱ्या, पण दोघींची कविता अगदी वेगळ्या मार्गाने गेली. कमलाने कवितेबरोबरच कथा, कादंबऱ्या लिहिल्या, स्तंभलेखन केले आणि आत्मचरित्रपर लेखन केले. आईबद्दल माया होती, पण तिच्या कवितेशी आपला सांधा जुळत नाही याची स्पष्ट जाणीव होती. बालामणी अम्मांनाही घरात मानसिक समाधान नव्हते, पण त्यांनी संसार केला एवढेच नव्हे तर, याबाबतीतले असमाधान मनातच ठेवून कवितेला आपले सर्वस्व मानले. दोघींमध्ये एक प्रकारचा तटस्थपणा होता.

कमलाची वर सांगितलेली नावे ही तिच्या आयुष्याची व लेखनाचीही कहाणी सांगणारी आहेत. कमला नायर माहेरचे नाव. वडिलांच्या नोकरीमुळे लहानपण कोलकात्यात गेले. वडील सतत कामात. ती म्हणते, ‘आमच्या मोठय़ा घरात आम्ही सात जण राहायचो. आई-वडील, मी, मोठा भाऊ, दोन नोकर आणि महात्माजी’. वडिलांच्या मनावर गांधींचा इतका प्रभाव होता की, त्यांनी आईला फक्त सफेद वा ऑफ व्हाइट खादी वापरण्याची सक्ती केली होती. दागिन्यांचा त्याग करायला लावला होता.

मॅट्रिकही न झालेल्या कमलाचे केवळ पंधराव्या वर्षी लग्न झाले, तेही तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठय़ा असणाऱ्या माधव दास या नात्यातल्या पुरुषाशी.  अत्यंत मनस्वी असणाऱ्या कमलाला विवाहाच्या वेळी स्त्री-पुरुष संबंधांचीही पुरेशी जाणीव नव्हती आणि तिचे मन व शरीरही त्यासाठी तयार नव्हते. लग्नाआधीच स्त्री शरीराचा अनुभव घेणाऱ्या नवऱ्याचे आपल्याशी होणारे वर्तन अनुभवल्यावर नवरा बलात्कारच करतोय असे तिला वाटले. तिची सारी स्वप्ने धुळीला मिळाली, शरीर, मन आकसून गेले. मातृत्व आले, पण ती म्हणते तसं, ‘तीन मुलं झाल्यावरच मला खरी समजूत आली.’ त्याआधी हृदयविकाराचा झटका आल्यावर गाठावे लागलेले रुग्णालय, येणारे नैराश्याचे झटके, त्यातून बाहेर पडण्यासाठी लेखन म्हणजे उपचार पद्धती ठरली. शब्दांच्या सान्निध्यातच ती रमली. खरे म्हटले तर त्याआधी वयाच्या ६व्या वर्षांपासून ती कविता करत होती. खेळताना विरूप झालेल्या बाहुल्यांना कसे वाटेल, अशी कल्पना करून लिहिलेली तिची कविता ‘मातृभूमी’त प्रसिद्ध झाली होती. शाळेच्या कार्यक्रमांसाठीही ती लेखन करे.

नंतर मात्र मनातील सारी अस्वस्थता बाहेर यावी म्हणून लेखन सुरू झाले. सुरू झाला एक अंतहीन शोध- खऱ्या प्रेमाचा. ज्याच्या प्रेमात जगाचा विसर पडावा अशा आपल्या घन:शामचा. तो सखा नवऱ्याच्या रूपात जाणवतोय का याचाही शोध सुरू झाला. आता ती राधा झाली- मनात कृष्ण रुंजी घालत होता, त्याच्या येण्याकडे डोळे लागले होते, पण रोजचे व्यवहारही चालू होते. या उत्कट भावना कवितेशिवाय कुणाला कळणार? पुरुषाला जेवढे प्रेमाचे महत्त्व वाटते त्याच्या किती तरी पटीने अधिक स्त्रीला असते. प्रेमाशिवाय शरीरसंबंध तिला नको असतात.

केरळातील आपल्या माहेरच्या घरावर, आपल्या आजीवर कमलाचे विलक्षण प्रेम. लहानपणापासून आजीशीच मनीचे सारे गूज बोलले जायचे. आजीला आपली निराशा, मनातली वंचना कळू नये, म्हणून मग ती ‘माधवीकुट्टी’ झाली. मल्याळी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये विलक्षण ताकदीने लिहू लागली. मात्र मल्याळीमध्ये लिहिताना ती असे ‘माधवीकुट्टी’, तर इंग्रजीत ती असे ‘कमला दास’. शिवाय कविता इंग्रजीतच आणि इतर लेखन मल्याळीत अशी विभागणीही तिने केलेली होती.

वयाच्या चाळिशीआधीच तिने आपले आत्मचरित्रपर लेखन ‘एन्टे कथा’ – ‘माय स्टोरी’ प्रसिद्ध केले. आधी मल्याळीत, मग इंग्रजीत. त्यात तिने खुलेपणाने वर्णन केलेली स्वत:च्या वैवाहिक जीवनाची हकीकत (खरे तर लोकांच्या मते चव्हाटय़ावर मांडलेली लक्तरे) पारंपरिक, मातृप्रधान केरळी समाजातील लोकांना फारच धक्कादायक वाटली. तिच्यावर सडकून टीका झाली. ‘आपण दुर्लक्षित मुले होतो’ असा आरोपही तिने केला. तिच्या लेखनात धीटपणा असला तरी अश्लीलता किंवा कसलाही आव नव्हता, प्रामाणिकपणा जाणवत होता, त्यामुळे काही जणांना तिच्याविषयी सहानुभूतीही वाटत होती. तिने हे लेखन मागे घ्यावे म्हणून तिच्या प्रतिष्ठित घरातल्यांनी कमलावर खूप दडपणे आणली, पण ती आपल्या भूमिकेवर ठाम होती. शेवटी मात्र तिने गुळमुळीतपणे त्यात काही कल्पित होते अशी कबुली दिली.

स्त्रीच्या मनातील पुरुषाची ओढ ही स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. त्याबद्दल तिला अपराधी वाटण्याचे कारण काय? आपल्याला आवडणाऱ्या पुरुषाशी आपला संबंध यावा असे वाटण्यात गैर ते काय? असे तिचे म्हणणे. स्त्री-पुरुषांमधील प्रणयसंबंधाचे नि:संकोचपणे वर्णन करणाऱ्या कमलाची कविता अत्यंत तरल आणि असांकेतिक अशा प्रतिमा वापरते. बहुतेक वेळा स्त्री-पुरुषांचे मीलन म्हणजे नदीने सागराला भेटणे, ज्यात स्त्री ही नदी व पुरुष सागर, असा संकेत असतो. तिला मात्र वाटते,‘तो नदीसारखा उतावळा- मी सागरासारखी अथकपणे प्रतीक्षा करणारी.’ कृष्ण-राधेच्या प्रणयकथेचा आधार ती घेतेच, पण मुळात तिच्या अचूक, लयबद्ध, थेट शैलीने त्यातील व्यक्तिगत प्रेम कधीच नाहीसे होते आणि कोणत्याही स्त्री-पुरुषांचे प्रेम असे परिमाण त्याला लाभते. कविता विलक्षण प्रभावी वाटते.

‘जोवर तू मला भेटला नव्हतास, तोवर

मी कविता लिहिल्या, चित्रं काढली,

आणि मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर गेले

भटकायला-

आता तू मला भेटलास, मी तुझ्यावर प्रेम करतेय

तर भटक्या प्राण्यानं अंगाचं मुटकुळं

करून पडून राहावं

तसं माझं आयुष्य गुरफटून पडलंय,

विसावलंय तुझ्यात

( ‘समर इन कलकत्ता’या  कवितासंग्रहातील एका कवितेतील काही ओळींचा हा मुक्त अनुवाद)

अतिशय तीव्र संवेदनशीलता आणि विलक्षण प्रतिभा असणाऱ्या कमला दासने जवळ जवळ चारशे कथा आणि त्याहून अधिक कविता लिहिल्या. खऱ्या प्रेमाचा शोध आणि स्त्री-पुरुषांमधील शारीरिक आकर्षण, त्याची पूर्तता न झाल्याने येणारे नैराश्य, प्रेमातील वंचना, विश्वासघात, अधीरेपणा, या आशयसूत्रांभोवती तिची कथा, कादंबऱ्या व कविताही फिरत राहते. आपले आयुष्य निष्प्रेम आहे, आपल्यावर कुणीच जीव ओवाळून टाकत नाही, आपण प्रचंड एकाकी आहोत, हा एकटेपणा जीव जाळतोय अशा कल्पनांनी तिचे मन सतत व्यापलेले असे. आपल्या अस्तित्वाचा अर्थ समजून घेताना ती विलक्षण संवेदनशील होते, विकल होते, आपल्या चुकांची कबुली देते. जगावरचा विश्वास उडलेला असतो. आत्महत्या करावीशी वाटते. अतिविचाराने डोके भणाणते आणि ती म्हणते- ‘मी जेव्हा विचार करते तेव्हा माझ्या मेंदूतून घणघण आवाज येऊ  लागतात ते कुणी ऐकले तर ते नक्कीच विचारतील की, इथे जवळ कुठे कारखाना आहे का?’

भारतीय पारंपरिक, मध्यमवर्गीय, समर्पित स्त्रीच्या समाजातील प्रतिमेचे भंजन तिने आपल्या कवितेद्वारे केले. स्त्रीच्या शारीरिक गरजा मारल्या जातात, स्वार्थी, लंपट पुरुष हवे ते कसेही मिळवतो, बाई जात ही कायमच मन मारत जगते, तिच्यावर अनेक संकेत, परंपरा लादल्या जातात, हा अत्याचार जगापुढे मांडणे तिला आवश्यक वाटते. स्त्रीची तोवरची समाजातील प्रतिमा पुरुषांनी स्वार्थापोटी निर्माण केली आहे, असे तिला वाटते आणि ती प्रतिमा नष्ट करण्याचे काम ती करते. तिने आपल्या कवितेतून स्त्रीमनाच्या कोंडलेल्या अनुभवांना उद्गार दिला आणि स्त्रियांना कायमचे ऋणाईत करून ठेवले, पण आपण स्त्रीवादी नाही, चळवळीत भाग घेतला नाही, असे ती म्हणते.

कमला दास हे स्वातंत्र्योत्तर काळात, साठच्या दशकातील आघाडीच्या भारतीय इंग्रजी लेखकांमधील एक महत्त्वाचे नाव. निस्सीम इझिकेल, ए. के. रामानुजम् यांना समकालीन कवयित्री. इंग्रजी काव्याची पारंपरिक वळणे बदलून टाकत, व्यक्तिकेंद्रित अनुभवांना प्राधान्य देणारे हे कवी. नवे वळण निर्माण करणाऱ्या या आधुनिक कवींमध्ये कमला दास यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. तिच्या कविता विविध ठिकाणी अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्या.

नवऱ्याबरोबर मुंबईत अनेक वर्षे तर काही वर्षे दिल्लीत वास्तव्य असल्याने तेथील उच्चभ्रू समाजात, साहित्यिक वर्तुळात तिची चांगली ऊठबस होती. तिच्या कविता जर्मन, जपान, स्पेन, रशिया, फ्रान्स या देशांमध्ये भाषांतरित रूपात गेल्या. एवढेच काय, पण १९८४ च्या नोबेलसाठी तिचे नामांकनही झाले. अनेक मानसन्मान पदरी आले, पण परिपूर्ण, खऱ्या प्रेमाचा शोध थांबलाच नाही. तरल, वास्तव पण धाडसी लेखनामुळे ती आयुष्यभर उलटसुलट चर्चेत राहिली.

शेवटी गदारोळ उठला तो तिने इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यावर. खऱ्या प्रेमाच्या शोधात असताना, नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने आपल्याहून वीसेक वर्षांनी लहान असणाऱ्याशी विवाह होईल व आपला प्रेमाचा शोध पूर्ण होईल, अशा आशेने धर्मातर केलं. ती कमला सुरैया झाली; पण तेथेही पुन्हा वंचना. ती पुण्याला एकटी राहू लागली. पुन्हा धर्मातर करण्याचा विचार मात्र मुलांनी अमलात आणू दिला नाही. मनोमन ती पुन्हा कमला दास होऊन कविता लिहू लागली. ३१ मे २००९ ला ती अल्लाला प्यारी झाली.

साठेक वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रीच्या देहामनाच्या भुकांबद्दल ती ज्या धाडसाने बोलली, त्यासाठी तिने ज्या कणखरपणाने समाजाचे वार-प्रहार झेलले, आपल्या आविष्काराचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले ते वेगळे, विरळा होते. त्याची किंमतही तिने मोजली.

‘मी’, ‘मी’ करणाऱ्या पितृप्रधान संस्कृतीला आपली ‘ओळख’ सांगताना ती म्हणते,

‘मी भारतीय, केरळी आहे, सावळी आहे.

मी तीन भाषांमध्ये बोलते,

दोन भाषांमध्ये लिहिते,

पण स्वप्नं मात्र एकाच भाषेत बघते.

मी काय करावं हे मी ठरवते.

मी पापी आहे, मी संतही आहे,

मी प्रेयसी आहे, मीच वंचिता आहे.

माझी दु:खं तुमच्याहून वेगळी नाहीत,

माझे आनंदही तुमच्याहून वेगळे नाहीत.

अरे, मीसुद्धा मला ‘मी’ असंच संबोधते.’..

(‘अ‍ॅन इंट्रोडक्शन’कवितेतल्या काही ओळींचा हा मुक्त अनुवाद)

शेवटी मनात प्रश्न राहतातच. आपल्या वाटय़ाला आलेले जीवन मुलीच्या, कमलाच्या वाटय़ाला येऊ  नये म्हणून तिच्या आईने संघर्ष केला नाही आणि शेवटी इतका टीकेचा गदारोळ उठल्यावरही तिचे कुटुंब तिच्या बाजूने उभे राहिले. हा तिचा विजय की नातेसंबंधाची गुंतागुंत अगम्य असते हेच खरे?

  • कमला दास-सुरैया (१९३४-२००९)
  • आत्मकथन, सात कथासंग्रह, दोन कादंबऱ्या,
  • निवडक कवितासंग्रह, अनेक मुलाखती.
  • कथांवर आधारित चित्रपट. साहित्यावर समीक्षात्मक पुस्तके.
  • (मराठीत तिच्या साहित्याचे भाषांतर झालेले वाचनात आले नाही, पण मल्याळीतील बहुतेक सर्व साहित्य इंग्रजीत अनुवादित झाले आहे.)
  • साहित्य अकादमी, आशिया पेन, केरळ अकादमी इत्यादी अनेक पुरस्कार प्राप्त.
  • १९८४ मध्ये नोबेल पुरस्कारासाठी नामांकन

 

डॉ. मीना वैशंपायन

meenaulhas@gmail.com