गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

@girishkuber

आधुनिकता, इतिहास यांची वर्तमानाशी सांगड घालायला आवडतं त्यांनी व्हिएन्नातल्या ‘शॉनब्रुन’ या राजवाडय़ाला भेट द्यायला हवी. तशी ती देऊन परतताना त्याच्या इतिहासातल्या दोन व्यक्तिरेखा त्या राजवाडय़ातनं आपल्याबरोबर येतात..

तसं ज्या ज्या प्रदेशात एके काळी राजेशाही होती, त्या त्या प्रदेशात आजही राजवाडे आहेत. पर्यटक भक्तिभावानं तिथं येतात; महाल, राणीवसा, राजाचं शयनगृह वगैरे पाहून अचंबित होतात; पुरुष मंडळी त्याबाबत एकमेकांच्या कानांत काहीबाही निर्बुद्धसं कुजबुजतात; तरुण/तरुणी सेल्फी वगैरे घेऊन लगेच आपल्या मित्रमत्रिणींना ‘लिंक’ करतात (आणि कधी कधी बराच वेळ कोणी ‘लाइक’ कसं केलं नाही, म्हणून खट्टू होतात).. हे असं साधारण होतंच. कारण पर्यटनात राजवाडे पाहणाऱ्यांचा लसावि जवळपास असा असतो. व्हिएन्नातला ‘शॉनब्रुन’ राजवाडा त्यांच्यासाठी नाही. ज्यांना आधुनिकता, इतिहास यांची वर्तमानाशी सांगड घालायला आवडतं त्यांनी(च) या राजवाडय़ाला भेट द्यायला हवी.

तशी ती देऊन परतताना त्या संपूर्ण इतिहासातल्या दोन व्यक्तिरेखा त्या राजवाडय़ातनं आपल्याबरोबर येतात. मारिया थेरेसिया आणि जोसेफ दुसरा.

मारिया महाराणी. ज्या वेळी ऑस्ट्रियाचं साम्राज्य हंगेरी, क्रोएशिया, बोहेमिआ, इटलीचा मिलान वगैरे काही भाग असं सर्वदूर पसरलेलं होतं, त्या वेळची ती राणी. सम्राट सहावे चार्ल्स यांची कन्या. त्यांनी तिच्या लहानपणीच ठरवून टाकलं होतं ही आपली उत्तराधिकारी म्हणून. नंतरचं आपलं आयुष्य मग ते तिला राणीपदासाठी तयार करण्यातच त्यांनी घालवलं. १७४० साली सम्राट चार्ल्स यांच्या निधनानंतर तिच्याकडे या साम्राज्याची सूत्रे आली. त्यानंतर थेट ४० वर्ष तिच्या हाती सत्ता होती. तिच्याकडे ती आली इथपासूनच खरं तर ही अप्रूप मालिका सुरू होते. आसमंत सारा पुरुषी तालावर नाचत असताना एका सम्राटाला आपलं राज्य मुलीच्या हाती द्यावंसं वाटणं यातच एक मोठं भाष्य आहे. राज्य तिच्या हाती दिल्यावर त्या वेळच्या पुरुषी साम्राज्यात बरीच खळखळ झाली. आसपासच्या लहान-मोठय़ा राजांना आपण हिला सहज हरवून ऑस्ट्रियाचं राज्य बळकावू शकू अशी स्वप्नं पडू लागली. यातल्या एकाचंही स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.

ही राणी मोठी, आजच्या भाषेत बोलायचं तर, सामाजिकदृष्टय़ा पुरोगामी होती. धार्मिक बाबतीत यहुद्यांविषयी तिला आकस होता. संरक्षणाच्या आघाडीवर कोणताही राजा/राणी जे काही करतात, ते तिनं केलंच; पण त्यात तिचं मोठेपण नाही. तिचा मोठेपणा आहे तो आपल्या राज्यात शिक्षण आणि वित्त क्षेत्रात तिनं केलेल्या सुधारणांत आणि त्याहूनही मोठेपण आहे त्या सुधारणा आपल्यानंतर वाहून जाऊ नयेत यासाठी तिनं केलेल्या संस्थात्मक उभारणींत. ही राणी वयापेक्षा मोठी होती. म्हणजे ज्या वयात तारुण्यसुलभ उद्योग क्षम्य ठरतात, त्या वयात ही मुलगी संगीत- त्यातही ऑपेरा, चित्रकला, राज्यकारभारात लक्ष घालणं वगैरे गोष्टींत रस घेत होती.

ही राणी धर्मानं अर्थातच रोमन कॅथलिक. एका अर्थानं पारंपरिक ख्रिस्ती. त्या वेळी धर्माचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर होता. ज्या वेळी धर्मसत्तेच्या हातीच राजसत्तादेखील होती, त्या वेळेस यापेक्षा वेगळं काय असणार? मारिया थेरेसिया ही या इथं वेगळी ठरते. तिनं आपल्या राज्यात धर्माचा राजकारणातला हस्तक्षेप बंदच करून टाकला. म्हणजे किती? तर, त्या वेळेस किरकोळ धार्मिक कारणांसाठी सार्वजनिक सुट्टय़ा द्यायची परंपरा होती. ही राणी इतकी धडाडीची, की तिनं नाताळ वगैरे महत्त्वाचे दिवस सोडले तर या धार्मिक सुट्टय़ा बंद करून टाकल्या. गंमत म्हणजे ती स्वत: इमानेइतबारे चर्चमध्ये जायची. सर्व धार्मिक परंपरा पाळायची.

पण त्या फक्त व्यक्ती या नात्यानं. राणी म्हणून नाही. याबाबत ती इतकी सुजाण होती, की आपल्या धर्माचं प्रदर्शन तिनं कधीही सार्वजनिक पातळीवर, राणी या नात्यानं केलं नाही. इतकंच काय, सार्वजनिक ठिकाणी धार्मिक चिन्हं वगैरे प्रदर्शनालाही तिनं बंदी घातली. त्या धर्मात रोमन चर्चला अतोनात महत्त्व. पण या बाईनं ग्रीक चर्चलाही तितकंच उत्तेजन दिलं. हे इतकं सगळं त्या काळात. त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे स्त्री असल्यानं तिला सर्वोच्च रोमन दरबारात प्रवेश नव्हता. तेव्हा तिनं आपल्या नवऱ्याच्या नावावर आपल्या साम्राज्याचा एक भाग करून दिला आणि राजा या नात्यानं आपल्या नवऱ्याला रोमन दरबारात घुसवलं.

तिला १६ मुलं झाली. त्यातल्या ११ मुली. या मुलीही वेगवेगळ्या साम्राज्याच्या महाराण्या बनल्या. गंमत म्हणजे या सगळ्या मुलींच्या पहिल्या नावात मारियाचं नाव आहे. म्हणजे सगळ्या मुली आईच्या नावाने.. बापाच्या नव्हे.. ओळखल्या जातात. त्यातली एक फारच गाजली. इतिहासाचं किमान ज्ञान असणाऱ्यालाही ती माहीत असते.

ती म्हणजे मारिया ‘मेरी’ आंत्वानेत. फ्रान्सची गाजलेली आणि वादग्रस्त अशी राणी. गरिबांना ‘भाकरी मिळत नसेल तर त्यांनी केक खावा’ असं म्हणणारी आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी जी गिलोटिनखाली मारली गेली, ती मेरी आंत्वानेत ती हीच. आपली ही शेवटची मुलगी मारिया थेरेसियाला अजिबात आवडायची नाही. कारण? ती काहीही वाचत वगैरे नाही आणि बौद्धिकदृष्टय़ा आळशी आहे, असं तिच्या आईचं मत होतं. थेरेसियानं आपला दरबार जनसामान्यांना खुला केला. त्या काळात उमराव सोडले, तर अन्यांना या दरबारात प्रवेश नसे. थेरेसियाच्या काळात तो सुरू झाला. ती अशी. तर कन्या मेरी आंत्वानेत याच्या बरोबर उलट. या दोघींतला पत्रव्यवहार वाचण्यासारखा आहे. महाराणी आई आपल्या महाराणी लेकीचे सारखे कान उपटताना त्यात दिसते. आंत्वानेतला छानछोकीत रस होता. उधळपट्टी नेहमीचीच. आई यांच्याविरुद्ध. अभ्यास कर, वाच, काही गंभीर काम कर वगैरे सांगणारी. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी फ्रेंच राज्यक्रांतीनं तिचा बळी घेतला.

पण जोसेफ दुसरा हा मात्र आपल्या आईच्या वळणावर गेला. हाही थेरेसियाचा मुलगा. पुढे ऑस्ट्रियाचा राजा झाला. जागतिक इतिहासात प्रशियाचा फ्रेडरिक द ग्रेट किंवा रशियाची कॅथरिन द ग्रेट यांच्या तोडीची या जोसेफची कारकीर्द आहे. बाकीचे दोघे जितके जगाला माहीत आहेत, तितका जोसेफचा परिचय नाही. पण तो बाकीच्यांचा दोष.

हा आईच्या वरताण निघाला. युरोपात एका टप्प्याला प्रबोधन (एनलायटनमेंट) काळ म्हटलं जातं. या काळात काही लोकशाही वगैरे होती असं नाही. पण त्या काळातल्या सत्ताधीशांनी आपल्या अधिकाराचा वापर जनतेचं विचारावलंबित्व वाढवण्यासाठी केला. ही बाब आजच्या काळातही होत नाही. पण तेव्हा झाली. आणि तीत या जोसेफसारख्या राजाचं अतोनात महत्त्व आहे. आजसुद्धा.. आणि आपल्याला तर अधिकच.. ज्याचं अप्रूप वाटेल असा मुद्दा म्हणजे त्यानं मोठय़ा प्रमाणावर प्रशासकीय सुधारणा हाती घेतल्या. न्यायव्यवस्था, प्रशासन अशा अनेक आघाडय़ांवर नियमाधिष्ठित अशी व्यवस्था तयार केली. ‘आले महाराजांच्या मना..’ असा प्रकार बंद केला. फाशीसारख्या शिक्षा पूर्ण काढून टाकल्या आणि इतकंच नाही, तर नागरिकांना सांगितलं : धर्माचा आधार सोडा.. तो भावनेला खतपाणी घालतो.. त्यापेक्षा विचारांची कास धरा.

आपल्या प्रजेनं विचार करावा असं आधुनिक लोकशाहीतल्या ‘राजां’नाही वाटत नाही, तिथं अठराव्या शतकातला हा राजा नागरिकांनी विचारांची कास धरावी म्हणून प्रयत्न करतो.. हे कमालीचं उदात्त आहे.

या सगळ्याबरोबर राजाची एक गोष्ट त्या राजवाडय़ात कळली आणि मोहरून जायला झालं. तसे कल्याणकारी राजे आपल्यालाही माहीत आहेत. धर्मशाळा, पाणपोया वगैरे बांधणारे. ते यानंही केलंच. पण त्यापुढे जाऊन जे काही यानं केलं ते फार कमी आज करू शकतील.

असं काय केलं यानं?

तर.. राजवाडय़ात भव्य वाचनालय बांधलं. स्वत:च्या खर्चानं पुस्तकं आणली आणि नागरिकांना सांगितलं : कधीही या, हवं ते पुस्तक वाचायला घेऊन जा.. त्यावर काही प्रतिक्रिया असतील, कोणती पुस्तकं हवी असतील तर मला भेटा.

..आणि तसं प्रत्यक्ष घडलं. नागरिकांना वाचनालयात हा राजा कधीही सहज भेटायचा.. आपला राजेपणा विसरून.

पुस्तकांच्या सहवासात राहणारा आणि विचारांना महत्त्व देणारा राजा पाहायला मिळणं तसं दुर्मीळच. तसा तो असला की राज्यकारभारात ‘ऐसी विचाराची कामे..’ शोधता येतात. एरवी आहेच भावनांचा रतीब..!!