News Flash

अल्पसंतुष्टी सुखाचा आनंद!

मध्यंतरी त्याच्या पत्नीवर छोटीशी एक शस्त्रक्रिया करावी लागणार होती.

डॉ. प्रेम रेड्डी यांना न्यायालयानं शिक्षा ठोठावल्याची बातमी कळल्यावर माझा मित्र भलताच खूश झाला. हे असं व्हायला हवं. शेवटी सत्याचा विजय होतोच होतो. वगैरे भाबडय़ा प्रतिक्रिया त्यानं भडाभडा व्यक्त केल्या.

त्यामागे कारणही तसंच होतं.

मध्यंतरी त्याच्या पत्नीवर छोटीशी एक शस्त्रक्रिया करावी लागणार होती. एका बडय़ा, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ती करायचं चाललं होतं. तो गेला विचारायला. सुरुवातच झाली, लाखभर रुपयांपासून. हा उडाला. इतक्या छोटय़ा शस्त्रक्रियेचा खर्च इतका असेल हे कळल्यावर त्याला धक्काच बसला.

त्याची ही अवस्था पाहून त्या रुग्णालयाची स्वागतिका म्हणाली.. इतकी काय काळजी करताय.. मेडिकल इन्शुरन्स असेल ना?

हो आहे..पण इतक्या छोटय़ा शस्त्रक्रियेसाठी विमा वापरायचा म्हणजे..तो चाचरत म्हणाला.

तुमच्यासाठी नाही, तर आमच्यासाठी वापरा. तुम्हाला नसेल गरज पैशाची..पण आम्हाला आहे..असं त्या स्वागतिकेचं त्यावर सुस्मित म्हणणं. इतकं ऐकल्यावरही त्याला काही आशा होती या खर्चात काही कपात होऊ शकेल याची. तसं त्यानं बोलून दाखवलं. त्यावर त्या स्वागतिकेनं एक ऐतिहासिक सत्य या मित्राच्या तोंडावर असं काही फेकलं की हा एकदम फाफललाच. ती म्हणाली.

हे बघा..आम्ही काही हेल्थ बिझनेसमध्ये नाही.. We are into hospitality industry, Hospital is incidental. तिचं म्हणणं, ते काही आरोग्य राखण्याच्या व्यवसायात नाहीत. त्यांचा व्यवसाय आहे अगत्यशिलतेचा..म्हणजे हॉटेलसारखा. हॉस्पिटल हा एक केवळ योगायोग.

ते ऐकल्यावर हा सर्दच झाला. दुसऱ्या एका ट्रस्टच्या रुग्णालयात त्यानं ही शस्त्रक्रिया करून घेतली. तीही एकचतुर्थाश खर्चात. तेव्हा डॉ. प्रेम रेड्डी यांना न्यायालयानं शिक्षा ठोठावल्याची बातमी ऐकल्यावर तो खूश झाला यात काही नवल नाही.

या डॉ. रेड्डी यांचे वैद्यकीय विमा व्यवसायातल्या एका कंपनीशी साटंलोटं होतं. व्हायचं काय तर डॉ. रेड्डी यांचा संबंध असलेल्या कोणत्याही रुग्णालयात काही तातडीच्या आजारासाठी एखादा रुग्ण गेला रे गेला की त्याला लगेच दाखल करून घेतलं जायचं. जणू काही तो अत्यवस्थच आहे. आणि हा रुग्ण दाखल झाला रे झाला की लगेच या विमा कंपनीला सांगितलं जायचं. एकदा का रुग्ण दाखल करावा लागला की त्याचा खर्च वाढतो.

या मेडिक्लेम कंपनीला त्यातच रस होता. त्यात अर्थातच डॉ. रेड्डी यांचे हितसंबंधही होते. एकदा का रुग्ण दाखल झाला की किमान काही ना काही कारणानं त्याला किमान दोनचार दिवस राहावं लागतंच. म्हणजे मग ही चाचणी, ती चाचणी वगैरे आलं सगळं. अर्थातच रुग्णाचा खर्च वाढत जातो. म्हणजे आपोआप विमा कंपन्यांच्या व्यवसायालाही मागणी.

हे डॉ. रेड्डी हृद्रोगतज्ज्ञ. उत्तम शल्यक. कितीही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असो हृदयाची. डॉ. रेड्डी यांचं यशस्वी होण्याचं प्रमाण अत्यंत आकर्षक होतं. त्यामुळे त्यांना मागणीही चांगली होती. जरा काही हृद्रोगाची शंका आली की रुग्णच अट्टहास धरत डॉ. रेड्डी यांनीच आपल्याला तपासावं असा. तिथे मात्र रुग्णालयाची पंचाईत व्हायची. ते तरी किती जणांना तपासणार. पण काही रुग्ण हट्टच धरून बसत. यात बाहेरगावच्यांचे फार हाल व्हायचे. एक तर डॉ. रेड्डी यांनीच तपासावं असा रुग्णाचा आग्रह. त्यात ते बाहेरगावनं आलेले. त्यामुळे डॉ. रेड्डी यांनाही नाही म्हणणं जड जायचं. बघता बघता डॉ. रेड्डी यांची लोकप्रियता इतकी वाढत गेली की त्यांना स्वत:लाच आपण रुग्णालय सुरू करायला हवं असं वाटू लागलं. किती दिवस इतरांच्या रुग्णालयाचे उंबरठे झिजवत राहायचे असा विचार डॉ. रेड्डी यांनी केला. त्यांना कोणी पतपुरवठा न करण्याचा प्रश्नच नव्हता. अनेक वित्तसंस्था त्यासाठी पुढे आल्या. पतपुरवठा इतका होणार होता की डॉ. रेड्डींना लक्षात आलं या इतक्या पैशात आपण एकच काय..अनेक रुग्णालयं उभी करू शकू.

तसंच केलं त्यांनी. सुरुवातीला दोन. मग हळूहळू एकेक करत डॉ. रेड्डी यांच्या मालकीची तब्बल तीस रुग्णालयं आहेत. कंपनीच स्थापन केली त्यांनी. रीतसर. त्यामुळे मग त्यांचा कारभार एखाद्या कंपनीचा चालावा तसा चालतो. ते मुख्य कार्यकारी अधिकारी. कंपनी म्हणून मग त्यांनी काही विमा कंपन्यांशीही हातमिळवणी केली. विमा कंपन्यांनाही त्यात रस होता. इतके एकगठ्ठा रुग्ण मिळणार असतील तर त्यांचंही भलंच की त्यात. त्यातली एक विमा कंपनी जास्तच आग्रही असायची. व्यवसाय मिळण्यासाठी. तो आपल्याला मिळावा म्हणून ती वाटेल ते करायला तयार असायची.

हे दोघांच्याही सोयीचं होतं. दोघेही समानधर्मी. डॉ. रेड्डी आणि ही विमा कंपनी. दोघेही एकमताचे असल्यानं पुढचा मार्ग सोपा होता. उगाच सोवळेपणाचं नाटक करण्याची गरज नव्हती कोणालाही. त्यामुळे त्या दोघांचं एकमत झालं..

आणि विमा कंपनी आणि डॉ. रेड्डी या दोघांनाही बरकत यायला सुरुवात झाली. सुरुवातीला या रुग्णालयांतले काही डॉक्टर का..कू करायचे. हे असं रुग्णांना फसवणं वगैरे बरं नाही, असं त्यांना वाटायचं. मग डॉ. रेड्डी यांनी क्लृप्ती लढवली. जो कोणी डॉक्टर जास्तीत जास्त रुग्ण भरती करून घेईल त्याला त्या नफ्यातलं वाटेकरी केलं. म्हणजे जेवढा धंदा हे डॉक्टर आणू लागले त्यातला काही वाटा त्यांना बोनस म्हणून द्यायची प्रथा सुरू झाली. नैतिकतेच्या सीमारेषेवर होते त्यांना हे मंजूर होतं. ठिकाय ना..आपण तर पाप करत नाही..डॉ. रेड्डी करतायत..आपण काय आपलं कर्तव्य बजावतोय..असं या डॉक्टरांनी स्वत:ला बजावलं. खूप पैसे मिळायची व्यवस्था झाली की हे असं प्रश्न विचारणारं मन शांत करता येतं, हे ठाऊक होतं डॉ. रेड्डींना. त्यांनी ती व्यवस्था करून दिली. प्रकरण शांत झालं. ज्यांना हे असले उद्योग मंजूर नव्हते ते सोडून गेले.

पण तरी रुग्णालयातला एक कर्मचारी होता. त्याला हे काही पसंत पडेना. जे काही चाललंय ते योग्य नाही, अशी त्याची खात्री होतीच. पण आपण गप्प बसणं त्यावर बरोबर नाही, असं त्याचं मन म्हणू लागलं. तो अस्वस्थ होता.

त्यानं न राहवून शेवटी तक्रार केली सरकारकडे. आमच्या रुग्णालयात रुग्णांना अनावश्यकरीत्या दाखल केलं जातंय आणि विम्याचे खोटे दावे सादर केले जातायत. अशा तक्रारी गंभीरपणे घ्यायची पद्धत असल्यामुळे सरकारनं चौकशी सुरू केली डॉ. रेड्डी यांच्या रुग्णालयाची. संबंधित विमा कंपनीच्या उद्योगावरही लक्ष ठेवलं गेलं. त्यात सिद्ध झालं, डॉ. रेड्डी खोटं वागतायत. तसा चौकशी अहवाल तयार झाल्यावर सरकारच्या न्याय खात्यानं स्वत:हून स्वत:ला या खटल्यात वादी करून घेतलं. गेल्या आठवडय़ात या खटल्याचा निकाल लागला.

न्यायालयानं डॉ. रेड्डी यांना तब्बल साडेसहा कोटी डॉलर्सचा दंड ठोठावलाय. आणि पुढची तीन र्वष त्यांच्या प्रत्येक व्यवहाराची छाननी करण्याचा निर्णय दिलाय. कॅलिफोर्नियातली प्राइम हेल्थकेअर सव्‍‌र्हिसेस ही कंपनी हा दंड भरेल. त्यातली निम्मी रक्कम डॉ. रेड्डी यांना स्वत:च्या खिशातून भरावी लागेल.

तो मित्र खूश आहे. कुठे तरी का असेना नियम, कायदा पाळला जातो म्हणून.

अज्ञानाप्रमाणे अल्पसंतुष्टतेल्या सुखाचा आनंद काही वेगळाच. आपण भोगतोय तसा.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 3:48 am

Web Title: cardiologist dr prem reddy
Next Stories
1 या पिकाचं काय करणार?
2 आणि दगडफेक झाली.. नाही!
3 रशियन भाषेतलं मौन..
Just Now!
X