01 March 2021

News Flash

मालवीय काय म्हणतात?

२००८ ते २०१६ या काळात अमेरिकेत वर्षांला तेलविहिरी खणण्याच्या वाढीचा वेग जेमतेम आठ टक्के इतका होता.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

२००८ ते २०१६ या काळात अमेरिकेत वर्षांला तेलविहिरी खणण्याच्या वाढीचा वेग जेमतेम आठ टक्के इतका होता. नव्या तंत्रज्ञानानं मारलेली मजल ३३ टक्क्यांची आहे. आपल्याकडे दिवसागणिक पेट्रोल दरवाढीच्या बातम्या येताहेत आणि काही पैशांनी इंधन स्वस्त करण्याचा भार ‘ओएनजीसी’सारख्या संस्थेवरच पडतो आहे..

खनिज तेलाचे दर जगभर सर्वत्र वाढलेत, पण अमेरिकेतनं त्याविरोधात चकार शब्द निघालेला नाही. काही प्रतिक्रियाच नाहीत या विषयावर. एके काळी म्हणजे अगदी १९७३ साली किंवा अलीकडे जॉर्ज बुश सत्तेवर असताना तेलाचे दर वाढले की अमेरिका कंठशोष करायला लागायची. १९७३ साली तेलाचे दर  जेव्हा ४०० टक्क्यांनी वाढले- म्हणजे ३ डॉलर प्रतिबॅरलवरून १२ डॉलर प्रतिबॅरल इतके झाले- तेव्हा तर अमेरिकेनं युद्धच पुकारलं पश्चिम आशियाई देशांविरोधात. १९९० साली तेलसंपन्न इराकच्या सद्दामने दुसऱ्या तेलसंपन्न कुवेत या देशाचा घास घ्यायचा प्रयत्न केला तर तेव्हाही अमेरिकेनं थेट युद्ध छेडलं. कुवेतला वाचवण्यासाठी. कुवेतला का वाचवायचं?

तर कुवेत हा जर सद्दामच्या ताब्यात गेला असता तर इराक आणि कुवेत या दोन्ही तेलसंपन्न देशांच्या एकत्रित तेलसाठय़ानं सौदी अरेबिया या तेलशक्तीला आव्हान दिलं असतं. आणि सौदी तर अमेरिकेच्या मर्जीतला. त्या वेळी अमेरिकेचे जनरल श्वर्झकॉफ म्हणालेसुद्धा होते की कुवेतमध्ये गाजरं पिकत असती तर आम्ही काही त्या देशाला वाचवायला आलो नसतो. म्हणजे कुवेतमध्ये तेल आहे म्हणून त्या देशाची किंमत.

पण या वेळी तेलाचे दर इतके वाढूनही अमेरिका शांत कशी?

त्याचं उत्तर आहे ‘तंत्रज्ञान’ या एका शब्दात.

दोन वर्षांपूर्वी ज्या वेळी शेल ऑइल, फ्रॅकिंग टेक्नॉलॉजी वगैरेची चांगलीच चर्चा होती त्या वेळी ती शांत करण्यासाठी सौदी अरेबियानं आपल्याकडचं चिक्कार तेल बाजारात ओतलं. त्यामुळे दर अर्थातच कोसळले. सौदीला तेच हवं होतं. याचं कारण एकदा का स्वस्त तेल उपलब्ध व्हायला लागलं की समुद्राच्या तळाखाली खोलवर जाऊन तिथं दगडात स्फोट घडवून तेल वेगळं करून वर आणणं अधिकाधिक खर्चीक व्हावं हा सौदीचा विचार. अमेरिकेनं हे तंत्रज्ञान विकसित केलेलं. त्यामागचा हेतू हाच की सौदीच्या तेलावर अवलंबून राहावं लागू नये. पण हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणायला खूप भांडवली गुंतवणूक करावी लागते. म्हणूनच या मार्गानं काढलं जाणारं तेल बरंच महाग पडतं. तसं ते अजूनच वाटावं यासाठी सौदीनं बाजारात तेलाचा महापूर आणला.

त्या देशाच्या अपेक्षेप्रमाणे तेलाचे दर कोसळले. अमेरिकेतल्या शेल ऑइलपेक्षाही सौदीचं तेल विकत घेणं अमेरिकेत स्वस्त ठरलं आणि त्या वेळी अमेरिकेत स्वदेशी वगैरेचं भूत डोक्यावर असलेला कोणी नेताही नव्हता. त्यामुळेही स्वभूमीतल्या तेलापेक्षा सौदभूमीतलं तेल अमेरिकेनं आनंदानं स्वीकारलं.

फरक इतकाच की अमेरिकी तेल कंपन्यांनी आपल्याच संशोधनावर नव्यानं काम सुरू केलं. शेल ऑइल किंवा गॅस, फ्रॅकिंग तंत्रज्ञान वापरून तेल उत्खनन इतकं महाग का याचा विचार या कंपन्यांनी सुरू केला. या तंत्रज्ञानाचा भांडवली खर्च कमी कसा करता येईल यावर संशोधन सुरू केलं. तेलविहीर खणण्याचं तंत्रज्ञान या संशोधकांच्या डोळ्यांत खुपू लागलं. तेलविहीर खणायला घ्यायची, खोल जायचं, तेल लागलं तर लागलं, नाही तर वरची खणायची यंत्रणा पुन्हा वेगळी करायची आणि नव्या ठिकाणी तेल खणायला जायचं.. असा हा प्रकार.

अमेरिकी तंत्रज्ञांनी या सगळ्याला फाटा देत नवीनच सुधारणा घडवून आणली. एखाद्या वहीच्या पुठ्ठय़ाला अनेक छिद्रं पाडल्यावर जसं दिसेल तसा एक फलाट त्यांनी तयार केला आणि त्या पुठ्ठय़ाच्या छिद्रातनं अनेक पेन्सिली खुपसाव्यात त्या पद्धतीनं तेलविहिरींचे फाळ जमिनीत घुसतात. म्हणजे एकाच वेळी अनेक विहिरी आपोआप खणल्या जातात. इतकंच नाही तर पुठ्ठय़ासारखा दिसणारा फलाट स्वयंचलित आहे. म्हणजे असं की तो तसाच्या तसा दुसऱ्या ठिकाणी ‘चालत’ जाऊ शकतो. म्हणजे विहिरी खणण्याची यंत्रणा सुटी करून हलवण्याचा प्रश्नच येत नाही. तसंच्या तसं काम तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुरू करू शकतो.

याचा दृश्य परिणाम असा झालाय की २०११ साली अमेरिकेत जितक्या तेलविहिरी खणणाऱ्या यंत्रणा होत्या तितक्याच आता आहेत. पण फरक पडलाय तो त्यांच्या तेल बाहेर काढण्याच्या क्षमतेत. याचा अर्थ असा की आधी होत्या तितक्याच तेलविहिरी खणण्याच्या यंत्रणा आपल्या जुन्याच क्षमतेत अधिक तेलविहिरी खणू शकतात. तेही कमी खर्चात. २००८ ते २०१६ या काळात अमेरिकेत वर्षांला तेलविहिरी खणण्याच्या वाढीचा वेग जेमतेम आठ टक्के इतका होता. नव्या तंत्रज्ञानानं मारलेली मजल ३३ टक्क्यांची आहे. या नव्या यंत्रणेचं, तंत्रज्ञानाचं यश डोळ्यावर येणारं आहे!

ते मोजायचं कसं?

तर किती पिंपं (बॅरल) तेल निघालं यावरून. अमेरिकेनं सरत्या एप्रिल महिन्यात तब्बल १ कोटी ५७ लाख बॅरल्स इतकं तेल स्वभूमीतनं काढलं. अमेरिकेच्या पुढे एकच देश आहे. रशिया. याच एप्रिल महिन्यात रशियातनं निघालेल्या तेलपिंपांची संख्या आहे १ कोटी ९७ लाख इतकी. ९९ लाख ६० हजार पिंपं भरून तेल काढणारा सौदी अरेबिया आता तिसऱ्या क्रमांकावर गेलाय.

याचा अर्थ असा की अमेरिका हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा तेलसंपन्न देश बनलाय आणि आपल्या नव्या तंत्रावर त्यांना इतका विश्वास आहे की लवकरच पहिला क्रमांक आपलाच असेल अशी खात्री त्यांना आहे.

२००१ साली ‘९/११‘ घडेपर्यंत जगातला सर्वात मोठा तेल आयातदार असलेला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नावाचा देश ९/११ नंतरच्या अवघ्या दोन दशकांत तेलाबाबत नुसताच स्वयंपूर्ण बनलाय असं नाही तर तो तेल निर्यातदारदेखील बनलाय.

००००००

डेहराडूनमधल्या केशवदेव मालवीय इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम एक्स्प्लोरेशन या ऐतिहासिक संस्थेला या आठवडय़ात भेट देताना अमेरिकेची ही ताजी कहाणी डोळ्यासमोर येत होती. उत्तराखंडला देवभूमी म्हणतात. साहजिकच आहे. स्वर्गवास्तव्याची हमी देणारे चारधाम, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, हृषीकेश, उत्तर काशी अशी एकापेक्षा एक पॉवरफुल धर्मस्थळं एकाच राज्यात आहेत. परत नैनिताल, जिम कॉर्बेट अभयारण्य, मसुरी अशी पर्यटनस्थळं. त्यामुळे या राज्यात तशी चांगलीच पर्यटक वर्दळ असते. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडूनचा जॉली ग्रँट विमानतळ लहानसाच आहे. मुंबईहून पुण्याला जाताना जलदगती महामार्ग संपता संपता माळरानावर एकदम एक स्टेडियम दिसतं तसा हा विमानतळ दिसतो. आसपास सगळं भकास किंवा वैराण आणि मधेच हा विमानतळ. पंधरा-एक विमानं उतरतात दिवसभरात. तेवढय़ापुरती बक्कळ गर्दी. दिवसभरात हजारो पर्यटक इथं उतरतात. रुद्राक्ष संस्कृतीचे पाईक धर्मस्थळी स्नानसंध्या करायला जातात. द्राक्ष संस्कृतीच्या अनुयायांना नैनिताल, मसुरीतली सुखद हवा खुणावत असते.

ही केशवदेव मालवीय स्मृती संस्था इथे आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, म्हणजे ओएनजीसी, या केंद्र सरकारी कंपनीनं ती स्थापन केली. हे मालवीय (जन्म : १९०४, मृत्यू : १९८१) माजी मंत्री भारतीय तेल संशोधनाचे अध्वर्यू. आता या संस्थेत भारतीय तेल संशोधनाचा प्रवास दाखवणारं सुंदर वस्तुसंग्रहालयदेखील मांडलंय. या महामंडळाचे माजी प्रमुख सुबीर राहा यांच्या नावानं ते उभारलं गेलंय.

द्राक्ष आणि रुद्राक्ष या दोन्ही संस्कृतींतल्या पर्यटकांच्या दृष्टीनं हे वस्तुसंग्रहालय तितकं महत्त्वाचं नसावं. या अप्रतिम वस्तुसंग्रहालयाला भेट दिली तेव्हा एकही पर्यटक नव्हता तिथं. या केशवदेव मालवीय संस्थेच्या दर्शनी भागात दोन प्रतिमा आहेत. एक मालवीयांच्या मागे ठामपणे उभे राहणारे तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू आणि दुसरे खुद्द मालवीय. शेजारी मालवीय यांचं वाक्य आहे : ‘तेल संशोधनाच्या निर्धारापासून आपण मागे जाताच नये. आपण यशस्वी ठरलो तर ही स्पर्धा जिंकू आणि अपयशी ठरलो तर मात्र आपल्या हालअपेष्टांना वाली असणार नाही आणि आपण नष्ट होऊ.’

तो पेट्रोल/डिझेल दरवाढीचा १५वा दिवस होता आणि तेलविक्रीशी काहीही संबंध नसणाऱ्या या महामंडळाला केंद्र सरकार हकनाक हा दरवाढीचा भार सोसायला लावणार अशी बातमी होती.

किती द्रष्टे होते केशवदेव मालवीय!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 3:10 am

Web Title: new oil drilling technology in america oil well drilling in america american oil well
Next Stories
1 रिकाम्या हातांची स्वप्नं..
2 प्रश्न… प्रश्नकर्त्यांना
3 आधार आणि अधिकार
Just Now!
X