आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत व्यायाम ही अत्यावश्यक बाब बनली आहे. शरीर आणि मन तंदुरुस्त किंवा ताजंतवानं ठेवायचं असेल तर व्यायाम हवाच. पण त्यासाठीही वेळ कुठे मिळतो? धावपळीच्या दिनक्रमातून व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर ‘शॉर्टकट’मध्ये व्यायामाचे फंडे सांगणारं एक अ‍ॅप तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल.
या अ‍ॅपवर अवघ्या सात मिनिटांत आवश्यक व्यायाम कसा करावा, याच्या टिप्स देण्यात आल्या आहेत. त्याचं नावच मुळी ‘सेव्हन मिनिट्स वर्कआऊट’ असं आहे. या अ‍ॅपवर दररोज वेगवेगळे व्यायामाचे प्रकार सांगितले जातात. यात एका सेशनमध्ये प्रत्येकी ३० सेकंदांचे १२ व्यायाम प्रकार दाखवले जातात.
दर ३० सेकंदांच्या व्यायामानंतर १० सेकंदांचा ‘ब्रेक’ही यात देण्यात आला आहे. शिवाय तुमच्या व्यायामाचं वेळापत्रकही हे अ‍ॅप नोंदवून ठेवतं. थोडक्यात, सांगायचं तर हे अ‍ॅप म्हणजे तुमचा ‘वैयक्तिक प्रशिक्षक’च आहे.
हे अ‍ॅप अँड्रॉइड, अ‍ॅपल या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. 7 Minute Workout असं सर्च केल्यास ते तुम्हाला मिळू शकेल.

 

‘वॉर्डरोब’ आपल्या हातात
अलीकडे संपूर्ण कुटुंबांच्या कपडय़ांनी भरलेलं एकच आणि तेही लोखंडी कपाट ही संकल्पना सर्वसामान्य कुटुंबातूनही नाहीशी झाली असून त्याची जागा प्रत्येकाला किमान चार-पाच कप्प्यांची जागा देणाऱ्या ‘वॉर्डरोब’ने घेतली आहे. हा ‘वॉर्डरोब’ म्हणजे कोणत्याही स्त्रीसाठी ‘रमण्याची’ हमखास जागा. ‘वॉर्डरोब’ व्यवस्थित लावणं, त्यातील कपडय़ांचं व्यवस्थित वर्गीकरण करणं, आवडत्या रंगसंगतीनुसार त्यांची मांडणी करणं अशा अनेक गोष्टी करण्यात प्रचंड वेळ जातो.
अनेकींच्या ‘वॉर्डरोब’मध्ये इतके कपडे असतात की त्यातील एखादा टॉप किंवा चुडीदार कित्येक दिवस वापरला नसल्याचंही त्यांच्या लक्षात येत नाही. या सर्व गोष्टी आता आपल्या स्मार्टफोनवरून ‘मॅनेज’ करणं शक्य आहे. त्यासाठी ‘स्टाइलबुक’ (stylebook) हे अ‍ॅप असंख्य पर्याय देतं. या अ‍ॅपवर तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये असलेल्या कपडय़ांची नोंद करू शकता. एकदा नोंद केली की, ‘स्टाइलबुक’ तुमचा वॉर्डरोब व्यवस्थित मॅनेज करतं. एखाद्या पार्टीला जाताना कोणता ड्रेस घालावा इथपासून आठवडय़ात एकच ‘ड्रेस कॉम्बिनेशन’ किंवा रंगाची पुनरावृत्ती होणार नाही, इथपर्यंतच्या सर्व गोष्टी हे अ‍ॅप मॅनेज करतं. अचानक एखाद्या ‘बिझनेस टूर’वर जायचं ठरलं तर योग्य कपडे बॅगेत भरण्यासाठी आपली उपसाउपशी सुरू होते. पण ‘स्टाइलबुक’च्या मदतीने तुम्ही बसल्या जागी कोणकोणते कपडे भरायचे, याचं नियोजन करू शकता. या अ‍ॅपमध्ये ‘लुक’, ‘क्लोझेट’, ‘पॅकिंग लिस्ट’, ‘कॅलेंडर’ असे अनेक पर्याय असून ‘वॉर्डरोब’मध्ये नसलेले कपडे किंवा चपला, बूट आदी गोष्टींची ‘ऑनलाइन शॉपिंग’ करण्याची सुविधा या अ‍ॅपवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप सध्या केवळ ‘अ‍ॅपल स्टोअर’वर उपलब्ध आहे. मात्र अँड्रॉइडवर अशाच प्रकारचे ‘स्टायलिशियस’(stylicious) नावाचे अ‍ॅप उपलब्ध आहे.

– असिफ बागवान