18 November 2017

News Flash

माझा पोर्टफोलियो : उत्तम ब्रॅण्ड्स, गुणवत्तेत सातत्य!

खरे तर कॅस्ट्रॉलचा शेअर दोन वर्षांपूर्वी या स्तंभातून सुचविला होता

अजय वाळिंबे | Updated: July 10, 2017 1:10 AM

खरे तर कॅस्ट्रॉलचा शेअर दोन वर्षांपूर्वी या स्तंभातून सुचविला होता. दुर्दैवाने ज्या गुंतवणूकदारांनी त्यात तेव्हा गुंतवणूक केली असेल त्यांना त्यात फायदा झाला नसणार. कारण गेल्या दोन वर्षांत जे शेअर हलले नाहीत त्यात कॅस्ट्रॉलचा समावेश करावा लागेल. परंतु शेअर बाजारात कुठला शेअर कधी उसळी घेईल ते सांगता येत नाही. तसेच प्रत्येकाची वेळ असते. जगप्रसिद्ध ब्रिटिश पेट्रोलियम समूहाची ही भारतातील एक अग्रगण्य कंपनी. खरे तर कॅस्ट्रॉल इंडियाने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. कंपनीचे देशांतर्गत तीन कारखाने असून वितरणासाठी २३ गोदामे तर सुमारे १,०५,००० रिटेल आऊटलेट्स आहेत. अ‍ॅक्टिव्ह, सीआरबी, जीटीएक्स, तसेच मॅग्नाटेक अशा या कंपनीच्या प्रमुख नाममुद्रा आहेत. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ३,३७०.३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६६८.९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता. तर यंदाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे मार्च २०१७ साठी ८८२.२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १७९ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. आपल्या नफ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी कंपनीने डिसेंबर महिन्यात उत्पादनांच्या किमतीत वाढ केली होती. १ जुलै २०१७ पासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जीएसटीचा फायदा होणाऱ्या काही निवडक कंपन्यांत कॅस्ट्रॉलचा समावेश करावा लागेल. सातत्याने राखलेली गुणवत्ता, उत्तम ब्रॅण्ड्स तसेच सागरी वाहतुकीला प्राधान्य आणि इतर सरकारी धोरणे याचा फायदा कंपनीला आगामी काळात निश्चित होईल. गेल्या तीस वर्षांत आठ वेळा बोनस देऊन तसेच सतत लाभांश देऊन कंपनीने आपल्या भागधारकांना कायम खूश ठेवले आहे. गेली २-३ वर्षे या शेअरला आलेली मरगळ झटकून हा शेअर लवकरच भरारी घेईल अशी आशा वाटते. अर्थात पोर्टफोलिओत सुचवलेली गुंतवणूक ही मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी असल्याने तसाच विचार करूनच ही खरेदी करावी.
arth01
सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on July 10, 2017 1:10 am

Web Title: castrol india ltd company profile