क्रिसिल लिमिटेड (बीएसई कोड ५०००९२)

arth06शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सध्याचा काळ खूप विचित्र आहे. म्हणजे असं की गेल्या काही महिन्यात आपल्याकडे सातत्याने काहीतरी घडत आहे. मग ते नोटाबंदी असो, वर्षसांगतेला पंतप्रधानांचे भाषण असो, अमेरिकेतल्या घडामोडी असोत किंवा त्यानंतर आलेला अर्थसंकल्प असो. तर अशा वेळी नक्की कुठे आणि किती गुंतवणूक करायची हा प्रश्न पडणे साहजिक आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत म्हणाल तर असे कुठले शेअर खरेदी करायला हवेत ज्यामध्ये मला अशा कुठल्याही घडामोडींमुळे नुकसान होणार नाही किंवा झाल्यास ते इतर गुंतवणुकीच्या तुलनेत अत्यल्प असेल. तर अशी सर्वात सुरक्षित गुंतवणूक मला ‘क्रिसिल’मधील वाटते.

क्रिसिल ही भारतातील पहिली आणि सर्वात मोठी पतमापन कंपनी. जगप्रसिद्ध आघाडीची अमेरिकन कंपनी स्टँडर्ड अँड पुअर्स या कंपनीची क्रिसिलमध्ये ६७.१०% गुंतवणूक असून ती तिची उपकंपनी आहे. स्टँडर्ड अँड पुअर्स ही जगातील एक बलाढय़ संशोधन आणि पतमापन कंपनी असून फॉच्र्युन यादीतील सुमारे ५० कंपन्या तर जगातील सर्वात मोठय़ा २० वित्तीय / बँकिंग कंपन्यांपैकी १५ कंपन्यांचे पतमापन आणि मानांकन ती करते. भारतातही एकटय़ा क्रिसिलकडे ९० टक्क्य़ांहून अधिक वाणिज्य बँकांचे काम असून २०,८०० मोठय़ा कंपन्या, तर ९१,००० हून अधिक लघू तसेच मध्यम उद्योगांसाठी संशोधन तसेच मानांकनाचे काम क्रिसिल करते. वितरित केलेल्या एकूण कर्जापैकी ५० टक्क्य़ांहून अधिक कर्जाचे मानांकन क्रिसिलने केले असून तिचे १२०० हून अधिक मोठे ग्राहक आहेत. १९८७ मध्ये भारतात कामकाज सुरू केल्यापासून गेल्या तीस वर्षांत कंपनीने आपला प्रगतीचा आलेख कायम उंचावत नेला आहे. कंपनीचे डिसेंबर २०१६ या आर्थिक वर्षांचे निकाल अजून जाहीर व्हायचे असले, तरीही सप्टेंबर २०१६ साठी संपलेल्या नऊमाहीसाठी कंपनीची कामगिरी अपेक्षेनुसार झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या नऊ माहीच्या तुलनेत कंपनीची उलाढाल १२.६ टक्क्य़ांनी वाढून ती ११२२.५१ कोटीवर गेली आहे, तर नक्त नफ्यात १५.२ टक्क्य़ांनी वाढ होऊन तो २२८.२५ कोटी रुपयांवर गेला आहे. लवकरच कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर होतील आणि ते चांगलेच असतील असे अपेक्षित आहे. १९९३ मध्ये ४० रुपयांच्या अधिमूल्याने ज्या हुशार गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करून ती जोपासली आहे ते आज करोडपती झाले आहेत. नवीन गुंतवणूकदारांना आज हा शेअर थोडासा महाग वाटत असला तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीवर विश्वास आहे अशांनी क्रिसिलमध्ये कधीही गुंतवणूक करायला हरकत नाही.

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.