एनसीएल इंडस्ट्रीज म्हणजे पूर्वीची नागार्जुन सिमेंट. के रामचंद्र राजू यांनी १९८४ मध्ये आंध्र प्रदेशात हा सिमेंट उत्पादनाचा प्रकल्प सुरू केला होता. गेल्या ३३ वर्षांत कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता ६६,००० टनांवरून २,९७,००० टनांवर गेली आहे. कंपनी सिमेंट तसेच सिमेंटशी संबंधित इतर उत्पादने यांचा व्यापार करते. कंपनीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ८० टक्के उत्पादन आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांत विकले जाते. सध्या या दोन्ही राज्यांचा पायाभूत सुविधांवर मोठा भर असल्याने येत्या दोन वर्षांत कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी राहील, अशी आशा आहे. गेल्याच महिन्यात कंपनीने क्यूआयबी प्लेसमेंटद्वारे ८५ लाख शेअर्सची २३७.५० प्रति शेअर दराने विक्री करून २०२ कोटी रुपये जमा केले आहेत. या रकमेचा विनियोग कंपनी कर्ज कमी करण्यासाठी करणार आहे. सध्या कंपनीवर सुमारे ३०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज कमी झाल्याने साहजिकच व्याज खर्च कमी होऊन कंपनीचा नफा वाढेल अशी अपेक्षा आहे. सप्टेंबर २०१७ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने १८८.४८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ९.७२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. सध्या २७० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर कदाचित थोडा महाग वाटत असला तरीही मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर २५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ  शकेल.

गेल्या दोन- तीन वर्षांत सर्वात उत्तम परतावा दिला आहे तो स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सनी. कमी कालावधीत आकर्षक परतावा मिळवण्यासाठी साहजिकच अनेक म्युच्युअल फंडांनी सातत्याने खरेदी केल्याने आता या सेगमेंटमधील शेअर्स खूपच महाग वाटतात. अनेक म्युच्युअल फंडानी म्हणूनच नवीन सब्स्क्रिप्शन अर्थात नवीन गुंतवणूक घेणेदेखील थांबवले आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी यंदा चोखंदळ आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. शेअर बाजार म्हटले की धोका आलाच. मात्र तरीही कितपत धोका पत्करायचा हेही गुंतवणूकदाराने ध्यानात ठेवायला हवे.

एनसीएल इंडस्ट्रीज लि. (बीएसई कोड – ५०२१६८)

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.