राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळाने प्रश्न विचारू लागला- ‘राजा, तुझ्याकडे बाजारातील नवीन खबर काय आहे?’

‘सध्या आपल्याकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून महाराष्ट्र शासनाच्या पातळीपासून ते गल्लीतल्या गणपतीपर्यंत सगळीकडे उत्सव इको फ्रेंडली अर्थात पर्यावरणाला हानी न पोहचवता साजरा व्हावा, असे आवाहन करणारे फलक लावलेले दृष्टीस पडत आहेत. अशाच एका पर्यावरण रक्षण करणाऱ्या ‘गणेशा’ची माहिती तुला सांगतो,’ राजा म्हणाला.

‘हे बघ सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना कचरा वेचक कचऱ्यातून काही शोधतांना दृष्टीस पडतात. रेल्वेच्या फलाटावर रुळातून काही मंडळी शीतपेय व पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करताना दिसतात. तू त्या बाटल्यांचे पुढे काय होते याचा विचार केलास काय?’ राजाने प्रश्न केला. हा एक मोठा उद्योग असून आज तुला याच पुरवठा साखळीतील सर्वात मोठय़ा कंपनीची ओळख करून देणार आहे. ‘गणेश इकोस्पियर’ असे या कंपनीचे नाव असून या कंपनीची स्थापना १९८७ साली एक कुटीरोद्योग म्हणून झाली. कंपनी पेट बाटल्यांच्यावर प्रक्रिया करून त्यापासून ‘रिसायकल्ड पॉलिएस्टर स्टेपल फायबर’ ‘ट्वीस्टेड फिलॅमेंट यार्न’ तयार करते. कंपनीची उत्पादने ही एक प्रकारचे कृत्रिम धागे आहेत. ‘रिसायकल्ड’ धाग्यांचे गुणधर्म ‘व्हर्जिन धाग्यां’च्या जवळपास असणारे व किंमत १० टक्क्यांनी कमी असल्याने उद्योगजगताकडून या कंपनीच्या उत्पादनाला मोठी मागणी आहे. ‘रिसायकल्ड पॉलिएस्टर स्टेपल फायबर’ हा एक प्रकारचा कृत्रिम धागा असून औद्योगिक जगात या धाग्याचे अनेक उपयोग आहेत. कृत्रिम वस्त्रे, नौकानयन व अन्य औद्योगिक वापराचे दोरखंड, एक ना अनेक गोष्टींमध्ये ‘रिसायकल्ड पॉलिएस्टर स्टेपल फायबर’चा वापर केला जातो. कंपनीचे कारखाने उत्तर प्रदेशात कानपूर व बिलासपूर येथे आणि उत्तरांचल राज्यात रुद्रपूर येथे आहेत. आज ही कंपनी या क्षेत्रातील सर्वाधिक ९७,८०० मेट्रिक टन उत्पादन क्षमता असलेली सर्वात मोठी कंपनी आहे,’ राजाने माहिती दिली.

‘या व्यवसायातील सर्वात मोठे आव्हान आहे ते सुरळीत कच्चा माल पुरवठय़ाचे. त्यासाठी कंपनीने रिकाम्या पेट बाटल्या गोळा करण्यासाठी भारतात स्वत:ची २६ केंद्रे उघडली असून, अन्य पुरवठादारांमार्फात कंपनीला मौल्यवान कचऱ्याचा पुरवठा होत असतो. या व्यतिरिक्त देशातील प्रमुख शीतपेय उत्पादकांशी करार केला असून हे उत्पादक त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत तयार होणाऱ्या टाकाऊ बाटल्या या कंपनीला विकतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तेल, दूध, शीतपेये, बाटलीबंद पाणी, औषधे, १५० ते ३५० मिली क्षमतेच्या बाटल्यातून विकली जाणारी दारू इत्यादी द्रवपदार्थाच्या वेष्टनासाठी स्वस्त असल्याने पेटच्या बाटल्यांना उत्पादकांची पसंती असते. साहजिकच पेट बाटल्यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने कंपनीला कच्च्या मालाचा अल्पदरात पुरवठा होत आहे,’ राजा म्हणाला.

‘कंपनीने २०११ पासून २०१५ पर्यंत दरवर्षी आपल्या उत्पादन क्षमतेत सातत्याने वाढ केली आहे. ‘वेस्ट मॅनेजमेंट’ उद्योगात कंपनीचे बिझनेस मॉडेल हे आदर्श समजले जाते. एकूण जगभरात पर्यावरण जाणिवा सजग होत असल्याने औद्योगिक पुन:प्रक्रिया उद्योगाला ‘ग्रीन इंडस्ट्री’ मानले जाते. या उद्योगाला विशेष कर सवलती दिल्या जातात. बहुराष्ट्रीय अर्थसंस्थांनी तर ‘क्लीन टेक्नोलॉजी फोकस्ड फंड’ स्थापला असून या फंडामार्फत ‘ग्रीन इंडस्ट्री’तील कंपन्यांत गुंतवणूक केली जाते. कंपनीने कोका कोला इंडिया सोबत करार केला आहे. पुनर्वापराबद्दल लोकांमध्ये सजगता वाढविण्याचे कार्य करण्याबाबतचा हा करार आहे. कंपनीने बिलासपूर कारखान्याची उत्पादन क्षमता २१,००० टनांनी वाढविण्यचा प्रकल्प हाती घेतला असून हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर एकूण उत्पादन क्षमता १,१५००० टन होईल. एक मोठा ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टर’ या कंपनीच्या समभागात रस घेत असल्याच्या बातम्या आहेत,’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

gajrachipungi@gmail.com