फोकस्ड फंड हा फंड प्रकार ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’च्या वाचकांच्या चांगलाच परिचयाचा आहे. डीएसपी ब्लॅक रॉक फोकस्ड २५, आयडीएफसी फोकस्ड इक्विटी आणि अ‍ॅक्सिस फोकस्ड २५ या फंडांनी गुंतवणुकीवर भरघोस परतावा दिला आहे. सध्या हा लार्ज कॅप फंड गटात अग्रभागी असलेल्या अ‍ॅक्सिस फोकस्ड २५ फंडाचे विश्लेषण १० जुलै २०१७ रोजी पहिल्यांदा केले होते. तेव्हापासून या फंडाने ९.३२ टक्के वृद्धी दिली आहे. हा फंड समभागकेंद्रित जोखीम पत्करून परतावा मिळविणारा फंड आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत मागील सहा महिन्यांत २१ ते २५ समभाग आहेत. जिनेश गोपानी हे अ‍ॅक्सिस फंड घराण्याचे मुख्य समभाग गुंतवणूक अधिकारी आणि या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. जानेवारीच्या फंड फॅक्ट शीटनुसार निधी व्यवस्थापकांनी १० टक्के गुंतवणूक रोकड संलग्न प्रकारात ठेवली आहे. फंडाच्या गुंतवणुकीत अग्रक्रमाने एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक, मारुती सुझुकी, श्री सिमेंट, सुप्रीम इंडस्ट्रीज, गृह फायनान्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसव्‍‌र्ह, इन्फोएज (इंडिया), मदरसन सुमी या दहा कंपन्या आहेत.

या फंडाची ५० टक्के गुंतवणूक अशा कंपन्यांत आहे ज्यांच्या उत्सर्जनात (ईपीएस) मध्ये सतत वाढ होत आहे. मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, पेज इंडस्ट्रीज यांसारख्या त्या कंपन्या आहेत. येत्या जून महिन्यात हा फंड सातव्या वषात पदार्पण करेल. फंडाच्या सुरुवातीपासून मागील साडेसहा वर्षांचा विचार केल्यास फंडाने लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल आणि मायक्रो कॅप यांचे सरासरी प्रमाण अनुक्रमे ७५ टक्के, १६ टक्के आणि ३ टक्के आणि १ टक्का इतके आहे. पंकज मोरारका यांच्याकडून या फंडाची सूत्रे जिनेश गोपानी यांच्याकडे आल्यापासून स्मॉल आणि मायक्रो कॅप प्रकारच्या समभागांना गुंतवणुकीत स्थान दिलेले नाही. अन्य फंडांच्या परताव्यात मिड कॅप समभागांचे योगदान आहे तसे या फंडाबाबतीत म्हणता येत नाही. या फंडाचा परतावा समभागांची योग्य निवड आणि सक्रिय व्यवस्थापन या दोन गोष्टींमुळे मिळाला आहे. या फंडाची सूत्रे विद्यमान निधी व्यवस्थापकांकडे आल्यापासून जून २०१७ ते ऑगस्ट २०१७ दरम्यान पोर्टफोलिओत आमूलाग्र बदल झाले. हे बदल पूर्ण होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे या बदलांचे परिणाम आता परताव्यात दिसू लागले आहेत. दर्जेदार व्यवस्थापन असलेल्या कंपन्यांच्या योग्य मूल्यांकनात गुंतवणुकीत अंतर्भाव केल्याची व्ही गार्ड, सुप्रीम इंडस्ट्रीज, इन्फो एज, सन फार्मा, अ‍ॅडव्हान्स रिसर्च ही उदाहरणे दिसतात.

त्याच प्रमाणे योग्य वेळी इन्फोसिसच्या गुंतवणुकीतून बाहेर पडणे ही निधी व्यवस्थापकांच्या सक्रिय गुंतवणूक व्यवस्थापनाची काही उदाहरणे देता येतील. निधी व्यवस्थापकांनी कंपन्यांच्या प्राथमिक समभाग विक्रीत (आयपीओ) आरबीएल बँक, एस चांद, सीडीएसएलसारख्या कंपन्यांचा समावेश करून योग्य भावात नफावसुली केली; तर प्राथमिक समभाग विक्रीपश्चात अ‍ॅव्हेन्यू सुपर मार्ट, गोदरेज अ‍ॅग्रोव्हॅट, एमएएस फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस यांसारख्या कंपन्यांचे गुंतवणुकीत प्रमाण वाढवत नेले.

नियोजनबद्ध गुंतवणुकीवर (एसआयपी) मागील दहा वर्षांत सर्वाधिक परतावा देणारा फंड हा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड आहे; परंतु पाच वर्षांच्या एसआयपी गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा देणाऱ्या पहिल्या वीस फंडांत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरीचा समावेश नाही. दहा वर्षांचा विचार केल्यास एसआयपी गुंतवणुकीवर २० टक्क्यांहून अधिक परतावा असलेला हा एकमेव फंड आहे;

परंतु १७ ते १९ टक्क्यांच्या दरम्यान परतावा देणारे तब्बल २१ फंड आहेत. पाच वर्षांच्या एसआयपी गुंतवणुकीवर १९ ते १६ टक्क्यांच्या दरम्यान परतावा देणारे २० फंड आहेत. पाच आणि दहा वर्षांच्या एसआयपी गुंतवणुकीवर परताव्याच्या दरावर आधारित केलेल्या यादीत केवळ पहिल्या पाच फंडांत केवळ एक आणि पहिल्या दहांत केवळ दोन फंड आहेत. सातत्य राखणारे फंड शोधणे आणि विश्लेषकांनी शिफारस केल्यानंतर त्या फंडात गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या पचनी पडणे कठीण असते. प्रत्येक गुंतवणूकदार वेगळ्या ‘रंगात’ न्हालेला असतो.

अ‍ॅक्सिस फोकस्ड २५ फंडाच्या पोर्टफोलियोची पुनर्रचना होत असताना जुलै २०१७ मध्ये पहिल्यांदा या फंडाचे विश्लेषण केले होते. समभागकेंद्रित जोखीम आणि सक्रिय व्यवस्थापन हे या फंडाचे वेगळेपण रंगपंचमीच्या निमित्ताने अन्य फंडांपेक्षा वेगळेपण जपणारा हा फंड गुंतवणुकीची शोभा वाढवेल या अपेक्षेने केलेली ही शिफारस.

shreeyachebaba@gmail.com
(
अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)