एबीएसएल प्युअर व्हॅल्यू फंड

एखाद्या समभागाची बाजारातील किंमत त्या समभागाच्या अंतर्निहित किमतीपेक्षा कमी असल्यास हा समभाग गुंतवणुकीसाठी ‘व्हॅल्यू पिक’ समजला जातो. असे समभाग हुडकून काढण्याला ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ म्हणतात. या संकल्पनेला बेंजामिन (बेन) ग्रॅहम यांनी जन्म दिला. वॉरेन बफे हे कोलंबिया विद्यापीठात ग्रॅहम यांचे विद्यार्थी होते. विद्यार्थिदशेतील ग्रॅहम गुरुजींच्या व्याख्यानाने भारावलेल्या वॉरेन बफे यांनी हे तंत्र आत्मसात केले आणि आयुष्यभर ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ची उपासना केली. बफे यांनी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’च्या साहाय्याने संपत्तीची निर्मिती केली. या संकल्पनेवर आधारित गुंतवणूक धोरण राबविणाऱ्या फंडांना गुंतवणूकदारांची जगभरात पसंती लाभली आहे. भारतातदेखील या संकल्पनेवर आधारित जे फंड आहेत त्या फंडांपैकी ‘एबीएसएल प्युअर व्हॅल्यू फंडा’ने गुंतवणूकदारांना सर्वाधिक ‘एसआयपी’ परतावा दिलेला आहे. उद्या या फंडाला दहा वर्षे पूर्ण होत असून, २७ मार्च २००८ रोजी गुंतविलेल्या एक लाखाचे २२ मार्च २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीप्रमाणे बाजार मूल्य ६,१०,९२६ झाले असून परताव्याचा वार्षिक दर १९.८५ टक्के आहे.

एबीएसएल प्युअर व्हॅल्यू फंड हा ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ संकल्पनेनुसार मल्टी कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करताना विशिष्ट उद्योग क्षेत्राबद्दल विशेष आत्मीयता बाळगून गुंतवणूक करणारा किंवा काही कारणांनी एखादे उद्योग क्षेत्र न टाळणारा फंड आहे. निधी व्यवस्थापक आर्थिक आवर्तनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या उद्योग क्षेत्रातील निवडक कंपन्यांचे मूल्यांकन विचारात घेऊन गुंतवणुकीसाठी समभागांची निवड करतात. या फंडाची पहिली एनएव्ही २७ मार्च २००८ रोजी जाहीर झाली. या फंडाची मालमत्ता फेब्रुवारी २०१८ च्या ‘फंड फॅक्ट शीट’नुसार ३,२६३ कोटी आहे. ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’चा अवलंब करणाऱ्या फंड गटात पाच वर्षांच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीवर आणि तीन वर्षे कालावधीत नियोजनबद्ध गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा एबीएसएल प्युअर व्हॅल्यू फंडाने दिला आहे. फंडाच्या पहिल्या दिवसापासून ५,००० रुपये नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ६ लाखांचे २१ मार्च २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार बाजारमूल्य २०.०७ लाख रुपये असून वार्षिक परताव्याचा दर २२.९८ टक्के आहे.

या फंडाच्या गुंतवणुकीत भविष्यात भांडवली लाभ देणारे परंतु सद्य:स्थितीत अंतर्निहित किमतीपेक्षा कमी किमतीला उपलब्ध असलेल्या समभागांचा समावेश केला जातो. फंडाचे निधी व्यवस्थापक या प्रकारचे समभाग हुडकून योग्य किमतीत समावेश करण्यात यशस्वी झाल्याचे फंडाच्या कामगिरीवरून दिसत आहे. गुंतवणुकीसाठी फंडाने रसायने, तेल आणि वायू, धातू, पायाभूत सुविधा आणि गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांना प्राथमिकता दिली असून, फंडाच्या गुंतवणुकीत एचपीसीएल, टाटा केमिकल्स, गुजराथ अल्कली, इंडिया सिमेंट, एनसीसी आणि स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया हे सर्वाधिक गुंतवणूक असलेले समभाग आहेत. मागील वर्षभरात फंडाच्या गुंतवणुकीत समभागांची संख्या ५८ ते ६२ राखली असून मिड कॅप फंड असल्याने समभागकेंद्रित जोखीम न पत्करण्याचे निधी व्यवस्थापकांचे धोरण जोखीम नियंत्रित करण्याच्या दृष्टीने योग्य आहे. एमआरएफ, बाटा इंडिया, एल अँड टी फायनान्स यांसारख्या दर्जेदार समभागांचा निधी व्यवस्थापकांनी फंडाच्या गुंतवणुकीत योग्य वेळी समावेश केला आहे. फंडाच्या पोर्टफोलिओचे सक्रिय व्यवस्थापन केले जाते. मागील महिन्यांत फंडाने आठ समभाग वगळून ११ समभागांचा नव्याने समावेश केला. सक्रिय व्यवस्थापन आणि ५० टक्क्यांच्या आसपास राखलेले मिड कॅपचे प्रमाण फंडाच्या यशाचे गमक होय. महेश पाटील आणि मिलिंद बाफना हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. बीएसई २०० हा निर्देशांक फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. फंडाचे प्रमाणित विचलन अन्य मिड कॅप फंडापेक्षा अधिक असले तरी फंडाचा परतावा आणि जोखमीचे गुणोत्तर अन्य मिड कॅप फंडापेक्षा उत्कृष्ट आहे.

‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ या तंत्रावर लिहिलेली बेंजामिन ग्रॅहम आणि बफे या दोन लेखक द्वयींची डझनभर पुस्तके उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त अन्य लेखकांची पुस्तके आपापल्या पद्धतीने ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’चे गुणगान गात असतात; परंतु अंतर्निहित किमतीपेक्षा कमी असलेला समभाग हुडकणे आणि त्याची नेमकी अंतर्निहित किंमत काढणे हे सोपे काम नव्हे. एखादा समभाग अंतर्निहित किमतीपेक्षा कमी असण्यास अनेक कारणे असू शकतात. आभासी मूल्यांकन काही वेळेला ‘व्हॅल्यू ट्रॅप’ असण्याची शक्यता असते. ‘व्हॅल्यू ट्रॅप’ ‘व्हॅल्यू पिक’ यांच्यातील फरक समजण्यात निधी व्यवस्थापक नक्कीच यशस्वी झाले आहेत. बाजाराच्या घसरणीच्या कालावधीत ‘व्हॅल्यू फंड’ पोर्टफोलिओला संरक्षण देतात. ३ हजार ते ६ हजार कोटी दरम्यान मालमत्ता असलेले फंड गुंतवणुकीस आदर्श समजले जातात. उद्या अकराव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या या फंडाची वाटचाल बाल्यावस्थेकडून परिपक्वतेकडे होताना दिसत आहे. दशकपूर्तीच्या निमित्ताने गुंतवणूकदारांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा.

निवडक व्हॅल्यू फंडातील पाच वर्षांतील (२२ मार्च २०१३ ते २४ मार्च २०१८) ५,००० रुपयांच्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीची कामगिरी

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)