अन्वय सावंत
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटची ‘क्रेझ’ दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. यंदा उद्घाटन सोहळा आणि सलामीची लढत, तसेच पुढील काही लढतींतही प्रेक्षकसंख्येचा (टीव्ही आणि ऑनलाइन स्वरूपात सामने पाहणारे) नवा विक्रम नोंदवला गेला. विक्रमांच्या बाबतीत यंदाची स्पर्धा फारच वेगळी ठरते आहे. यंदा केवळ प्रेक्षकसंख्या नाही, तर धावसंख्येचेही नवनवे विक्रम रचले जात आहेत. सातत्याने २०० धावांपार मजल मारली जात आहे. सर्वच संघ धावांच्या मोठ्या राशी उभारत आहेत. सपाट खेळपट्ट्या आणि काही नियमांमुळे ‘आयपीएल’मध्ये फलंदाजांना झुकते माप मिळत असल्याची क्रिकेटवर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये समतोल साधण्यासाठी काही गोष्टींबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आल्याचे मत काही आजी-माजी क्रिकेटपटूंकडून व्यक्त केले जात आहे.

यंदा धावसंख्येचे कोणते विक्रम रचले गेले?

‘आयपीएल’मधील आजवरच्या १० सर्वोच्च धावसंख्यांपैकी (२४ एप्रिल २०२४ पर्यंत) सहा धावसंख्या यंदा नोंदवल्या गेल्या आहेत. तडाखेबंद फलंदाजांचा समावेश असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाने तब्बल तीन वेळा २५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध ३ बाद २७७ धावा, त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध विक्रमी ३ बाद २८७ धावा आणि मग दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ७ बाद २६६ धावा अशी मोठी मजल मारली होती. या सामन्यात हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मिळून ‘पॉवर-प्ले’च्या सहा षटकांत तब्बल १२५ धावा फटकावल्या होत्या. हा केवळ ‘आयपीएल’ नाही, तर कोणत्याही प्रकारच्या ट्वेन्टी-२० सामन्यातील विक्रम होता.

हेही वाचा >>>NOTAला सर्वाधिक मतं मिळाली तर कोण विजयी होतं? का पुन्हा निवडणूक होते? जाणून घ्या नकाराधिकाराचा अर्थ

कारणे काय?

बुधवारी (२४ एप्रिल) झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांनी अगदी सहज २०० धावांचा टप्पा ओलांडला. इतकेच काय, तर गेल्या १२ सामन्यांत १२ वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावांची मजल मारण्यात संघांना यश आले आहे. यंदाच्या हंगामातील एका सामन्यात दोन संघांनी मिळून ५०० धावांचा टप्पा ओलांडण्याचा प्रकार दोन वेळा घडला आहे. तसेच एका सामन्यात दोन संघांनी मिळून ४०० हून धावा केल्याचे तब्बल १० वेळा पाहायला मिळाले आहे. चौकार-षटकारांच्या बाबतीतही नवे विक्रम रचले जात आहेत. या आतषबाजीमागे सपाट खेळपट्ट्या आणि ‘इम्पॅक्ट खेळाडू’ (प्रभावी खेळाडू) नियम ही दोन प्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

खेळपट्ट्यांमध्ये काय बदल?

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ भारतात आल्यावर खेळपट्ट्यांबाबत कायम चर्चा रंगत असते. खेळपट्ट्या फिरकीला अति-साहाय्य करणाऱ्या असतात, त्यामुळे फलंदाजी करणे जवळपास अशक्यच होते, अशी तक्रार या पाहुण्या संघांकडून केली जाते. ‘आयपीएल’मध्ये मात्र फलंदाजीला आव्हानात्मक अशा खेळपट्ट्या शोधूनही सापडणे अवघड झाले आहे. ‘आयपीएल’मध्ये बंगळूरु, मुंबई आणि अहमदाबाद येथील खेळपट्ट्यांवर मोठ्या धावसंख्या पाहायला मिळणे यात नवे काहीच नाही. मात्र, चेन्नई, हैदराबाद किंवा लखनऊ येथे गोलंदाजांना कायम मदत असायची. या मैदानांवर १६० ची धावसंख्याही पुरेशी मानली जायची. यंदा मात्र येथील खेळपट्ट्यांमध्येही मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषत: चेन्नईतील चेपाॅक स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर फिरकीपटूंचे वर्चस्व असायचे. यंदा येथेही चार सामन्यांत तीन वेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला गेला आहे. त्यामुळे येथील खेळपट्टीकडूनही गोलंदाजांना फारशी मदत मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा >>>अमेरिकेतील विद्यापीठं आंदोलनाचं केंद्र म्हणून का ओळखली जातात? या आंदोलनांचा इतिहास काय?

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाचा किती प्रभाव?

‘आयपीएल’मध्ये अधिक मनोरंजन आणण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ हा नवा नियम आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या नियमानुसार, मैदानात खेळणाऱ्या ११ खेळाडूंव्यतिरिक्त आणखी पाच खेळाडू राखीव म्हणून निवडण्याची संघांना मुभा असते. त्यानंतर सामन्याच्या परिस्थितीनुसार, संघांना ११ जणांमधील एका खेळाडूच्या जागी राखीवमधील एका खेळाडूला मुख्य संघात उर्वरित सामन्यासाठी घेता येते. म्हणजेच प्रथम फलंदाजी करणारा संघ सात फलंदाज आणि एखाद अष्टपैलू घेऊन खेळू शकतो. त्यानंतर गोलंदाजीच्या वेळी एका फलंदाजाच्या जागी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून एका अतिरिक्त गोलंदाजाला संघात स्थान देण्याचा पर्याय संघांपुढे असतो. या नियमामुळे फलंदाजांना अधिक मोकळेपणाने खेळता येत असल्याचा मतप्रवाह आहे. सुरुवातीला जास्त गडी बाद झाले तरी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून एका अतिरिक्त फलंदाजाला खेळवता येऊ शकते अशी संघांची योजना असते. त्यामुळे फलंदाज अगदी पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा अवलंबतात. या नियमामुळे, मोठ्या धावसंख्या उभारण्यासाठी मदत होत आहे. मात्र, गोलंदाजांचे काम अधिकच अवघड झाले असून अष्टपैलूंचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.

नियमाबाबत पुनर्विचाराची वेळ आली आहे का?

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम भारतीय अष्टपैलूंच्या प्रगतीसाठी मारक ठरत असल्याचे परखड मत भारताचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा तारांकित सलामीवीर रोहित शर्माने नुकत्याच एका मुलाखतीत व्यक्त केले. ‘‘क्रिकेट हे १२ नाही, तर ११ खेळाडूंनिशीच खेळले जाते. त्यामुळे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ या नियमाचा मी चाहता नाही. थोड्या मनोरंजनासाठी तुम्ही क्रिकेटचे नुकसान करत आहात,’’ असे रोहित म्हणाला होता. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही या नियमावर टीका केली होती. ‘‘जेव्हा एकाच विभागाला झुकते माप दिले जाते, तेव्हा क्रिकेटची मजाच निघून जाते,’’ असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले होते. तसेच सीमारेषा आता अधिक जवळ आणल्या जात असल्याने षटकार मारणे सोपे झाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या गोष्टींचा नक्कीच विचार होणे गरजेचे आहे. अन्यथा क्रिकेट हा केवळ आणि केवळ फलंदाजांचा खेळ होण्याची भीती निर्माण झाली आहे.