रिलायन्स टॅक्स  सेव्हर फंड

करबचत योजनांमध्ये ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस)’ हा म्युच्युअल फंडाचा प्रकार सर्वार्थाने सर्वश्रेष्ठ पर्याय ठरतो. ृकिंबहुना बदलत्या वातावरणात ‘ईएलएसएस’ हेच कर वजावटीसाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीचे भविष्यही आहे..

नोव्हेंबर महिना अर्धा सरल्यानंतर वैयक्तिक करदात्यांसाठी आपल्या खतावण्या कर नियोजनाच्या दृष्टीने तपासून पाहण्याची आणि केलेल्या गुंतवणुकीच्या तपशिलाचा पुरावा आपापल्या कार्यालयात सादर करण्याचे दिवस. विमा विक्रेत्यांच्या दृष्टीने सुगीचा हंगाम. विविध करवजावट मान्यताप्राप्त गुंतवणुकांचा विचार केल्यास दीर्घकालीन बचतीला चालना देण्याचा सरकारचा उद्देश सहज लक्षात येतो. म्युच्युअल फंडाच्या करबचत योजनांची बाजारपेठ ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी ७६ हजार कोटींची होती. ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस)’ फंड गटातील (गुंतवणुकीस कायम खुल्या योजना ७१.३८ हजार कोटी आणि मुदत बंद योजना ४.१९ हजार कोटी) योजनांतून मागील १० वर्षांत कर बचतीसोबत नियोजनबद्ध पद्धतीने सर्वाधिक संपत्तीची निर्मिती रिलायन्स टॅक्स सेव्हर फंडाने केली आहे. एकाच वेळी केलेल्या गुंतवणुकीत पाच वर्षे आणि तीन वर्षे कालावधीत रिलायन्स टॅक्स सेव्हर फंड परताव्याच्या दरात अव्वलस्थानी आहे. या फंडाची पहिली एनएव्ही २१ सप्टेंबर २००५ रोजी जाहीर झाली. या दिवशी या फंडाच्या रेग्युलर ग्रोथ प्लानमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास १३ नोव्हेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार वार्षिक १६.७६ टक्के परतावा मिळाला आहे. २०१६ च्या कॅलेंडर वर्षांची पहिली तिमाहीवगळता मागील २८ तिमाहीत फंडाने संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परतावा दिला आहे.

काही विशिष्ट फंड त्या त्या फंडांच्या कामगिरीमुळे त्या त्या फंड घराण्याची ओळख बनलेले असतात. रिलायन्स व्हिजन आणि रिलायन्स ग्रोथ हे फंड रिलायन्स फंड घराण्याची ओळख ठरले आहेत. म्युच्युअल फंडांच्या इतिहासात रिलायन्स ग्रोथ या फंडाच्या वृद्धी (ग्रोथ) पर्यायाच्या एनएव्हीने चार अंकांतील स्तर गाठणारा पहिला फंड म्हणून मान मिळविला आहे. रिलायन्स व्हिजन या फंडाला ही ओळख मिळवून देण्यास जे निधी व्यवस्थापक कारणीभूत ठरलेल्या अश्विनीकुमार यांच्याकडे रिलायन्स व्हिजन बरोबरीने रिलायन्स टॅक्स सेव्हर आणि रिलायन्स टॉप २०० या फंडांच्या निधी व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. अश्विनीकुमार यांचे स्मॉल आणि मिड कॅप समभाग हुडकून काढण्याचे कौशल्यच रिलायन्स व्हिजन या फंडाला ओळख मिळवून देण्यास कारणीभूत ठरले. अन्य इएलएसएस फंड गुंतवणुकीसाठी लार्ज कॅपकडे झुकलेले मल्टि कॅप धोरण अवलंबित असताना रिलायन्स टॅक्स सेव्हर फंडाचे धोरण निधी व्यवस्थापकांच्या लौकिकाला साजेसे म्हणजे स्मॉल आणि मिड कॅपकडे झुकलेले मल्टी कॅप धोरण आहे. या फंडाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ईएलएसएस फंडातील गुंतवणूक तीन वर्षांसाठी असल्याने निधी व्यवस्थापक चांगला वृद्धीदर असलेल्या परंतु थोडी कमी रोकडसुलभता असलेल्या समभागात गुंतवणूक करण्यास कचरत नाहीत. या फंडाचे दुसरे वैशिष्टय़ असे की निधी व्यवस्थापक संदर्भ निर्देशांकातील प्रभावापेक्षा एखाद्या उद्योग क्षेत्रात गरजेनुसार कमी किंवा अधिक गुंतवणूक करतात.

उदाहरण द्यायचे तर सरकारची धोरणे अर्थव्यवस्थेस गती देणारी असल्याने निधी व्यवस्थापकांनी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या आरोग्य निगा आणि ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) उद्योगातून गुंतवणूक कमी करून आर्थिक आवर्तनाशी निगडित उद्योगांतून गुंतवणूक केली. निधी व्यवस्थापकास आपल्या निवडीबद्दल विश्वास असतो तेव्हाच बाजारमूल्य आणि उद्योग क्षेत्र यांच्या बंधनात न अडकता गुंतवणूक यशस्वी होते. या फंडाच्या निधी व्यवस्थापकांचे स्मॉल आणि मिड कॅप समभाग हुडकण्याचे अतुलनीय कौशल्य चांगलेच यशस्वी झाल्याचे फंडाच्या परताव्यावरून सिद्ध होते. मिड कॅप आणि स्मॉलकॅप समभागांच्या किंमती जेव्हा जेव्हा उसळी मारतात, तेव्हा तेव्हा या फंडाचा परतावा अन्य ईएलएसएस फंडाच्या परताव्याच्या तुलनेत अव्वल ठरतो. तसा तो मागील दोन वर्षांत ठरला आहे.

रिलायन्स टॅक्स सेव्हर फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक किंवा मारुती हे सर्वाधिक गुंतवणूक असलेले समभाग आहेत. या फंडाच्या गुंतवणुकीत टीव्हीएस मोटर्स कंपनी असणे हे या फंडाचे आणखी वेगळेपण. दुचाकीच्या तुलनेत प्रवासी आणि व्यापारी वाहने चांगले वृद्धीदर नोंदवत असताना योग्य मूल्यांकन असताना टीव्हीएस मोटर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीने फंडाच्या परताव्यात लक्षणीय कामगिरी केली आहे. अर्थ आवर्तनांची दिशा बदलताच लाभार्थी समभाग खरेदी करण्याचे कौशल्य आत्मसात केलेल्या निधी व्यवस्थापक अश्विनीकुमार यांनी गुंतवणुकीत फंडाच्या पहिल्या पाच गुंतवणुकांमध्ये टाटा स्टीलचा समावेश केलेला असणे हेसुद्धा या फंडाचे वेगळेपण. प्रशांत जैन यांच्यासारखा ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट’ तंत्र घोटविलेला निधी व्यवस्थापक असलेले फंड वगळता अन्य फंडाच्या गुंतवणुकीत पहिल्या दहा समभागांमध्ये टाटा स्टील अभावानेच आढळतो. व्हॅल्यू आणि ग्रोथ या प्रकारच्या गुंतवणूक शैली एकाच वेळी या फंडाच्या निधी व्यवस्थापकांनी यशस्वीरीत्या वापरल्या आहेत. फंडाने गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राथमिकता बँका, भांडवली वस्तू, वाहन उत्पादन आणि पूरक उत्पादने, औद्योगिक वापराच्या वस्तू, माहिती तंत्रज्ञान, सीमेंट आणि पोलाद उत्पादन यांना दिले आहे. सेबीच्या समभाग वर्गीकरणाच्या नवीन नियमानुसार फंडाच्या गुंतवणुकीत ५८ टक्के लार्ज कॅप, २५ टक्के मिड कॅप आणि १४ टक्के स्मॉल कॅप समभागांचा समावेश आहे. मागील वर्षभरात फंडाच्या गुंतवणुकीत ६५ ते ७० समभागांचा समावेश राहिला आहे. ऑक्टोबर महिन्यात फंडाने आयटीसी, श्रीराम ट्रान्सपोर्ट, विजया बँक, टोरेंट पॉवर, आयडीया सेल्युलर, कोल इंडिया, भारत रोड नेटवर्क हे समभाग विकून टाकून आयटीडी सिमेंटेशन, अशोका बिल्डकॉन आणि नव्याने सूचीबद्ध झालेला एसबीआय लाइफ यांचा गुंतवणुकीत समावेश केला.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी – पीपीएफ हे अजूनही करनियोजनासाठी सर्वाधिक पसंतीचे साधन आहे. गुंतविलेल्या रकमेची हमी आणि करमुक्त व्याजामुळे आवश्यकता नसतानासुद्धा अनेकजण एप्रिल महिन्याच्या पाच तारखेच्या आधी ‘पीपीएफ’मध्ये दीड लाख भरताना आढळतात. वयाने ज्येष्ठ असलेले गुंतवणूकदार शेअर बाजाराची जोखीम टाळण्याच्या उद्देशाने पीपीएफला पंसती देतात. सामान्यपणे कमावती तरुण मंडळीचे गृहकर्ज असल्याने कर वजावटीसाठी फारसे काही करावे लागत नाही. परंतु ज्यांना घर घेण्याची आवश्यकता नाही अशा मंडळींनी पीपीएफऐवजी कर वजावटीसाठी ईएलएसएस फंडाची निवड करणे आवश्यक आहे. ईएलएसएस हे कर वजावटीसाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीचे भविष्य आहे. वार्षिक १.५ लाखाप्रमाणे वीस वर्षे केलेली ३० लाखांची गुंतवणूक वार्षिक १२ टक्के परताव्याने सेवानिवृत्तीच्या वेळी १.२४ कोटीचा निधी तयार करू शकेल. वय वर्षे ३० ते ४० दरम्यानच्या करदात्यांनी आपल्या कर नियोजनात ईएलएसएस फंडाचा समावेश करणे गरजेचे आहे.

वस्तू आणि सेवा कर संकलनास सुरुवात झाल्याचा परिणाम उद्योगांवर होत आहे. पादत्राणे, माल वाहतूक या प्रकारच्या उद्योगांत मोठय़ा प्रमाणावर असंघटित समुदायाकडून संघटित समुदायाकडे व्यवसायाचे संक्रमण होत आहे. रिलायन्स टॅक्स सेव्हरच्या निधी व्यवस्थापकांनी या संक्रमणाच्या लाभार्थी कंपन्यांतून केलेली गुंतवणूक नजीकच्या काळात फळाला येईल. या फंडाच्या गुंतवणुकीत बँका आणि वित्तीय सेवा क्षेत्र सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. ताज्या पतमानांकन सुधारणेचे हे क्षेत्र सर्वाधिक लाभार्थी आहे. कंपन्यांच्या नफ्यावर या लाभाचे परिणाम तीन ते चार तिमाहींच्या निकालानंतरच कळून येतील. हा फंड कर बचतीसोबत परिपूर्ण भांडवली नफा देणारा असला तरी हा फंड मिड कॅप गुंतवणुकीकडे झुकलेला असल्यामुळे अन्य लार्ज कॅपकेंद्रित फंडापेक्षा अधिक जोखमीचा आहे. गुंतवणुकीतील ही जोखीम सल्लागाराच्या मदतीने समजून घेऊन या फंडात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. अन्यथा भांडवली वृद्धीचा भरघोस लाभ देणाऱ्या या फंडाला आपल्या गुंतवणुकीत म्युच्युअल फंड विक्रेत्याशी सल्लामसलत करून योग्य ते स्थान द्यायला हवे. ‘डायरेक्ट प्लान’मध्ये आंधळेपणाने या फंडात गुंतवणूक करणे धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे.

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com