17 November 2017

News Flash

फंड विश्लेषण : परोपकारी फंड 

जे गुंतवणूकदार या फंडात गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

वसंत माधव कुलकर्णी | Updated: March 20, 2017 1:11 AM

एचडीएफसी चॅरिटी फंड फॉर कॅन्सर क्युअर

कोणत्याही व्यक्तीसाठी मानवी जीव हा सर्वात मोलाचा असतो. एचडीएफसी म्युच्युअल फंडाने गुंतवणुकीवरील पराताव्यासोबत एखाद्याचा जीव वाचविण्याचे पुण्य पदरात पाडून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. एचडीएफसी चॅरिटी फंड फॉर कॅन्सर क्युअर ही तीन वर्षांचा कालावधी असलेली मुदत बंद योजना असून गुंतवणुकीसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणुकीवरील परतावा इंडियन कॅन्सर सोसायटीला अंशत: किंवा पूर्ण देण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. गुंतवणुकीसाठी रोखे व अर्बिटराज असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.  याआधी अनुक्रमे २०११ व २०१४ या वर्षी एचडीएफसी म्युच्युअल फंडाने या प्रकारे रक्कम गोळा करून गुंतवणूकदारांनी दान केलेल्या रकमेइतकी रक्कम फंड घराण्याने इंडियन कॅन्सर सोसायटीला कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी दान केली आहे. याच मालिकेतील तिसरा फंड सध्या गुंतवणुकीसाठी खुला होत असून २४ मार्चपर्यंत हा फंड गुंतवणुकीस खुला राहील.

एचडीएफसी चॅरिटी फंड फॉर कॅन्सर क्युअर हा फंड एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बर्वे यांचे एचडीएफसीच्या सर्व अपत्यांपैकी सर्वात लाडके अपत्य असल्याचे समजले जाते. एचडीएफसी म्युच्युअल फंडाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अन्य फंड घराणी विशेष योजना आणत असताना समाजाचे आपण देणे लागत असल्याच्या भावनेने मिलिंद बर्वे यांच्या संकल्पनेतून या फंडाचा जन्म झाला. गुंतवणूकदारांनी दिलेल्या देणगीइतकीच रक्कम  (दरवर्षी १५ कोटींपर्यंत) एचडीएफसी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी इंडियन कॅन्सर सोसायटीला कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी दान करते. रुग्णांच्या मदतनिधी मंजुरीसाठी इंडियन कॅन्सर सोसायटीच्या पंधरा दिवसांनी होणाऱ्या सभेस स्वत: मिलिंद बर्वे उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ या परोपकारी कार्यासाठी देत आहेत. या फंडाआधी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांनी गौरविले आहे. एखाद्या रुग्णाकडून मदतीसाठी अर्ज आल्यानंतर त्या रुग्णाची सत्यता पडताळण्याचे काम करणाऱ्याची आठवडय़ातून एकदा बैठक होते. या बैठकीत शिफारस केलेले रुग्णांचे अर्ज अंतिम मजुरीसाठी इंडियन कॅन्सर सोसायटीच्या कार्यकारी समितीपुढे मंजुरीसाठी जातात. या समितीचे अध्यक्षपद रिझव्‍‌र्ह बँकेच्या निवृत्त डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात भूषवत असून या समितीत मिलिंद बर्वे, डॉ. अनिता बर्जेस, केकी दादीशेट, होमी खुरशोखान, शैला नायर, डॉ. एम. के. शर्मा, राजेंद्र बडवे, हरी मुंद्रा, उदय खन्ना, नवीन क्षत्रिय या मान्यवरांचा समावेश असून स्मिता अगरवाल संस्थेच्या सचिव आहेत. ज्यांचे वार्षिक उत्पन्न २ लाखांहून कमी आहे अशा रुग्णांना उपचाराच्या खर्चासाठी जास्तीतजास्त ४ लाख मंजूर केले जातात. कर्करोगाचे निदान झाल्यापासून उपचाराला लवकरात लवकर सुरुवात व्हावी म्हणून कमीतकमी वेळेत ही मदत मंजूर होते. मंजूर झालेल्या निधीचा अपव्यय टाळण्यासाठी निधी रुग्ण ज्या रुग्णालयात उपचार घेत आहे, त्या रुग्णालयाच्या बँकेतील खात्यात रुग्णाच्या नावे जमा होतो. इंडियन कॅन्सर सोसायटीने यासाठी देशभरातील १६ नामांकित रुग्णालयांशी करार केला आहे.

जे गुंतवणूकदार या फंडात गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या परताव्यापैकी सर्व अथवा निम्मी रक्कम गुंतवणूकदाराच्या नावे, वतीने इंडियन कॅन्सर सोसायटीला देणगी म्हणून दिली जाईल. सर्व गुंतवणूकदारांच्या वतीने दिलेल्या एकूण देणगी रकमेइतकी रक्कम एचडीएफसी म्युच्युअल फंड इंडियन कॅन्सर सोसायटीला देणगी देईल. गुंतवणूकदारांच्या वतीने दिलेल्या रकमेवर आयकराच्या कलम ८० जी अंतर्गत सूट मिळेल. मुदतपूर्तीनंतर गुंतविलेली रक्कम गुंतवणूकदाराला परत मिळेल. गुंतवणूकदराने अंशत: रक्कम देणगी म्हणून देण्याचा पर्याय स्वीकारला असेल तर मूळ गुंतवणूक व त्यावरील परतावा गुंतवणूकदाराला परत मिळेल.

कर्करोगाचे केवळ उपचारच नव्हे तर निदान होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्यादेखील खर्चीक असतात. निदान झाल्यानंतर कर्करोगाच्या प्रकारानुसार शस्त्रक्रिया, अथवा रेडिओ थेरपी, केमो थेरपी उपचारांना रुग्णाचा मिळणारा प्रतिसाद अजमावण्यासाठी उपचारादरम्यान केल्या जाणाऱ्या चाचण्या उपचार पश्चातची काळजी व उपचारानंतर बरे झाल्यानंतरचे रुग्णाचे पुनर्वसन ही खर्चीक प्रक्रिया आहे. कर्करोग कोणालाही व कोणत्याही वयात होऊ  शकतो. भारतातील कर्करोग्यांची संख्या पाहता इंडियन कॅन्सर सोसायटीला मिळणाऱ्या देणग्या कायम अपुऱ्या पडतात. या फंडाच्या माध्यमातून दिली जाणारी मदत इंडियन कॅन्सर सोसायटीला

कायमस्वरूपी देणगीचा स्रोत उपलब्ध होतो. याआधीच्या दोन फंडांत आर्थिक मदत केल्या गेलेल्या रुग्णांपैकी ४२ टक्के रुग्ण हे वय वर्षे १८ पेक्षा कमी वयाचे आहेत तर ४० टक्के स्त्रिया व ६० टक्के पुरुष आहेत. हा फंड गुंतवणुकीस २४ मार्चपर्यंत खुला आहे. या फंडातील गुंतवणुकीवर अंशत: देणगी देण्याचा पर्याय स्वीकारल्यास मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर इंडेक्सेशनचा फायदा मिळविता येईल. थोडक्यात बचत खात्यातील शिलकीवर मिळणाऱ्या व्याजाइतके उत्पन्न व कोणा अनामिकाचा जीव वाचविण्याचे पुण्य पदरात पडेल.

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on March 20, 2017 1:11 am

Web Title: hdfc charity fund for cancer cure