25 November 2017

News Flash

वाटा गुंतवणुकीच्या : काळानुसार आर्थिक नियोजनाचे पुनरावलोकन

शासकीय निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत दरवर्षीच काही न काही फेरफार सुरू असतात.

किरण हाके | Updated: July 17, 2017 1:01 AM

पगारवाढ, बोनस किंवा भत्तावाढ असे काही झाले असल्यास या वाढीव मिळकतीचा समावेश चालू असलेल्या आर्थिक नियोजन आराखडय़ात करता येतो

काही गुंतवणूकदारांना असे प्रश्न पडतात की, आर्थिक उद्दिष्टे जर सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण अशी दीर्घकालीन असतील, तर अशा वेळीसुद्धा आर्थिक नियोजनाचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता आहे का? जर असेल तर पुनरावलोकनामध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?

तर, या प्रश्नांचे उत्तर असे की, आर्थिक उद्दिष्टे जरी दीर्घकालीन असली तरीसुद्धा त्याचे किमान वार्षिक पुनरावलोकन करणे जरुरी आहे. तसे करताना अर्थनियोजक काही मुद्दे तपासून पाहतात, जेणेकरून आपण करत असलेल्या गुंतवणुकीत काही बदल करण्याची गरज असल्यास तसा निर्णय आपण योग्य वेळी घेऊ  शकतो. हेच आपण सविस्तर पुढे पाहू.

आर्थिक नियोजनाच्या पुनरावलोकनापूर्वी काही गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात. अशा पुनरावलोकनामुळे आपल्याला हे लक्षात येते की, आपली पूर्वनिश्चित ध्येये आताच्या घडीला पूर्ण होऊ  शकतील काय? त्यामुळे हेही समजू शकते की, ती ध्येये वास्तववादी आहेत किंवा त्यात काही फेरफार करण्याची गरज आहे काय? उदाहरणार्थ, दिवाळीपूर्वी तुम्हाला घराची डागडुजी करायचे ठरविले आहे. हे पूर्वनिश्चित केलेले ध्येय व त्यासाठी पूर्वी गृहीत धरलेली रक्कम तयार तर होत आहे, परंतु आता ती कमी पडेल असे वाटू लागले आहे. अशा वेळी पुनरावलोकनाच्या वेळी त्याकडे लक्ष देऊन, लागणारी रक्कम उरलेल्या कमी वेळात कशी उभी करता येईल याचा निर्णय घेता येतो.

अर्थ नियोजक पुनरावलोकन करतेवेळी कोणकोणत्या गोष्टी ध्यानात घेतात ते आपण पाहू.

* मिळकतीत झालेला बदल:

पगारवाढ, बोनस किंवा भत्तावाढ असे काही झाले असल्यास या वाढीव मिळकतीचा समावेश चालू असलेल्या आर्थिक नियोजन आराखडय़ात करता येतो. पगारवाढीमुळे तुमच्या मासिक बचतीत काही प्रमाणात वृद्धी करता येऊ  शकते. त्यामुळे एखादे नवीन ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ  शकतो. बोनस वगैरेसारखी मोठी रक्कम लगेचच अनियोजित खर्च केली जाऊ  शकते. बोनस, एखादे सुनिश्चित ध्येय पूर्ण करण्याच्या गुंतवणुकीत जमा केला जाऊ  शकतो.

*  कुटुंबात लग्न, जन्म किंवा मृत्यू यामुळे होणारे बदल:

अशा घटनांमुळे कुटुंबातील मिळकत व खर्चामध्ये बरेच बदल होतात, आर्थिक ध्येयांमध्ये बदल होतात. अशा बदलांचा आपल्या आर्थिक नियोजनात अंतर्भाव करणे अतिशय महत्त्वाचे असते. जसे की कुटुंबात नवजात बालकाचे आगमन झाले तर मासिक खर्चात होणारी वाढ किंवा घरातील एखादी व्यक्तीचे गंभीर आजारपण व त्यावर अकस्मात करावा लागलेला  खर्च किंवा एखादी व्यक्ती दीर्घ आजारपणानंतर मृत्यू पावल्यामुळे तिच्या औषधोपचाराचा होणारा खर्च कमी होणे वगैरे. लग्नानंतर पगारदार व्यक्ती वाढते, त्यामुळे कौटुंबिक मिळकतीत बदल होतो. शिवाय आर्थिक ध्येयांमध्येही बरेच बदल होतात.

*  जोखीम घेण्याच्या क्षमतेतील बदल:

वय, अनुभव, बदललेल्या जबाबदाऱ्या, काही वर्षे गुंतवणूक केल्यामुळे अनुभवाने बदललेले ज्ञान या सर्वामुळे जोखीम घेण्याच्या क्षमतेत बरेच बदल घडून येतात. बदललेल्या जोखीम क्षमतेप्रमाणे आर्थिक नियोजनात गरजेनुसार कमी-जास्त बदल करता येऊ  शकतात. जसे की गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही आर्थिक नियोजकाच्या साह्य़ाने आर्थिक नियोजन आणि त्यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूकदेखील केली आहे. या दोन वर्षांच्या अनुभवामुळे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेत बदल झालेला असू शकतो. या बदलाचा उपयोग करून त्या घडीला योग्य ठरेल असा गुंतवणूक आराखडा तयार करता येऊ शकेल.

*  बाजारातील चढउतारामुळे करावे लागणारे बदल :

विशेषत: जोखीम घेण्याच्या क्षमतेप्रमाणे केलेली मालमत्तेची विभागणी व त्याचे गुंतवणुकीतून होणारे चढ-उतार याचे अवलोकन वेळोवेळी केले गेले पाहिजे व त्याचा योग्य तो समतोल सतत राखला गेला पाहिजे. जसे की सुरुवातीच्या काही वर्षांत केली गेलेली इक्विटीमधील गुंतवणूक ही बाजारभावातील चढत्या क्रमामुळे काही वर्षांतच नफा झाल्यास, अशा गुंतवणुकीचा पुन्हा जोखीम प्रक्षमतेप्रमाणे समतोल साधला गेला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या अनुषंगाने त्या त्या जीवनाच्या पायरीप्रमाणे नियोजनामध्ये बदल करावा लागतो. या सर्व गोष्टींचा समावेश आर्थिक नियोजनाच्या पुनरावलोकनात केला जातो.

*  सरकारची धोरणे आणि होणारे कर बदल:

शासकीय निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत दरवर्षीच काही न काही फेरफार सुरू असतात. त्याप्रमाणे आपल्या आर्थिक नियोजनात बदल करून घ्यायला हवा.

“Consistency with the right strategic plan is the ultimate key to success. Yesterday’s action would never make up for today’s procrastination.”

– Edmond Mbiaka

याचा मथितार्थ असा की, सातत्याने कुशलतेने केलेले नियोजन हेच अंतिम यशाचे गमक आहे. कालचे निर्णय हे आजच्या घडीसाठी योग्य बसतीलच असे नाही.

आर्थिक नियोजनाचे पुनरावलोकन करताना वरील गोष्टी ध्यानात घेतल्यामुळे, ज्या त्या वेळी योग्य ते बदल केल्यामुळे आपले आर्थिक नियोजन आजच्या घडीनुसार सुसह्य़ व योग्य बनते. बदलत्या गरजा व घटनांनुसार ते पुढे सरकते. अद्ययावतदेखील राहते. यामुळेच आपल्याला ध्येयपूर्तीची सुनिश्चिती मिळते व मानसिक समाधान मिळते. भविष्याची चिंता मागे ठेवून जीवनातील इतर परिपाठ आपण आनंदाने उपभोगू शकतो.

* लेखक आर्थिक नियोजनातील ‘सीएफपी’ पात्रताधारक व सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल kiran@fingenie.in वर संपर्क साधता येईल.

First Published on July 17, 2017 1:01 am

Web Title: investment advisor kiran hake tips for financial planning