*  एल अँड टी टँक्स अ‍ॅडव्हान्टेज फंड

नोकरदार मंडळींना साधारण डिसेंबरअखेर जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत कर वाचविण्यासाठी केलेल्या गुंतवणुकांचा तपशील आपल्याला नोकरीच्या ठिकाणी द्यावा लागतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) हे भविष्यातील निर्वाहाच्या साधनापेक्षा करबचतीचा राजमार्ग म्हणून उच्च मध्यमवर्गात लोकप्रिय असलेली योजना होती. ३० वर्षांपूर्वी या योजनेचा व्याजाचा दर १४ टक्के होता. मुद्दल दुप्पट होण्यास सव्वा पाच वर्षे कालावधी लागत असे. चालू शतकाच्या सुरुवातीला व्याजाचा दर १२ टक्के होता. २०१७ मध्ये पीपीएफ गुंतवणुकीवरील देय व्याजाचा दर ८.१ टक्के आहे. या व्याजदराचा तिमाही आढावा घेतला जाणार असून वेळोवेळी या व्याजदरात वाढ किंवा घट केली जाईल. २००८ ते २०१६ दरम्यान महागाईचा दर ८.३२ ते १२.११ टक्के दरम्यान राहिला. बचतीची कार्यक्षमता टिकवायची असेल तर पीपीएफसारख्या तरल व्याजदरांवर कर नियोजनाची सारी भिस्त वर ठेवून चालणार नाही. कर नियोजनात ‘ईएलएसएस’ फंडांचा अंतर्भाव असणे आवश्यक आहे.

म्हणूनच येत्या फेब्रुवारी महिन्यात कर नियोजनासोबत, संपत्ती निर्मितीची ११ वर्षे साथीदार असलेल्या एल अँड टी म्युच्युअल फंड घराण्याच्या भात्यातील दोन ईएलएसएस योजनांपैकी ‘एल अँड टी टँक्स अ‍ॅडव्हान्टेज फंडा’ची आजची शिफारस.

२७ फेब्रुवारी २००६ रोजी गुंतविलेल्या १ लाखाचे १३ जानेवारीच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार ४.१८ लाख झाले असून परताव्याचा वार्षिक दर १४.०८ टक्के आहे. या दिवशी मासिक ५,००० रुपयांची एसआयपी केली असती तर ६.५५ लाख गुंतवणुकीचे १३ जानेवारीच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार १४.६५ लाख झाले असते. या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर वार्षिक दर १४.१२ टक्के आहे. फंडाच्या सुरुवातीपासून कर वजावट मिळण्यासाठी दरवर्षी १.२० लाख गुंतविले असते तर १२.८० लाखाच्या गुंतवणुकीचे २९.५३ लाख झाले असते. या गुंतवणुकीवरील परताव्याचा वार्षिक दर १४.८९ टक्के आहे. एल अँड टी म्युच्युअल फंडाची मालमत्ता वाढ प्रामुख्याने २००९ मध्ये डीबीएस, चोला मंडलम व २०१२ मध्ये फिडॅलिटी या फंड घराण्यांच्या अधिग्रहणामुळे झाली. एल अँड टी या फंड घराण्याकडे भारंभार म्युच्युअल फंडाच्या योजना नाहीत. मोजक्या परंतु गुंतवणूकदारांना समाधानकारक परतावा देणाऱ्या योजना एल अँड टी फंड घराण्याकडे आहेत.

arth10

लार्ज कॅप केंद्रित गुंतवणूक असलेल्या या फंडाचा बीएसई २०० हा संदर्भ निर्देशांक आहे. मागील महिन्यात १,७५६ कोटींची सरासरी मासिक मालमत्ता असलेल्या फंडाच्या गुंतवणुकीत २२ उद्योग क्षेत्रांचा समावेश आहे. बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम, वित्तीय सेवा व सीमेंट ही गुंतवणूक असलेली आघाडीची उद्योग क्षेत्रे आहेत. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक अनुक्रमे एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो या पाच समभागात असून पहिल्या पाच समभागातील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या २१ टक्के आहे. सर्वाधिक गुंतवणूक बँकांच्या समभागात आहे. गुंतवणूक असलेल्या सहा बँकापैकी स्टेट बँक वगळता उर्वरित पाच बँका खाजगी क्षेत्रातील आहेत. हा फंड फिडॅलिटी फंड घराण्याकडे असताना या फंडाच्या गुंतवणुकीत ७०—७५ समभाग राखण्याची पद्धत होती.

फिडॅलिटीचे अधिग्रहण एल अँड टीने केल्यानंतर फंडाच्या गुंतवणूक पद्धतीत बदल झाले. समभागांची संख्या ५०—५५ वर आल्यामुळे फंडाची कामगिरी मोठय़ा फरकाने सुधारली. समभाग केंद्रीत जोखीम कमी करण्यासाठी विकेंद्रीकरणाची पद्धत अवलंबताना कोणत्याही समभागामधील गुंतवणूक ६ टक्कय़ांहून अधिक राहणार नाही ही मर्यादा निश्चित करण्यात आली.

सौमेंद्रनाथ लाहिरी हे या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) आहेत आणि या फंडाचे निधी व्यवस्थापनही तेच पाहतात. या फंड घराण्यात २०१२ मध्ये दाखल होण्यापूर्वी सौमेंद्रनाथ लाहिरी हे कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी होते. जून २००४ ते जून २००८ या काळात त्यांनी डीएसपी ब्लॅकरॉक या फंड घराण्यात निधी व्यवस्थापनाची धुरा सहमुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) या नात्याने यशस्वी सांभाळली आहे. सौमेंद्रनाथ लाहिरी हे आदर्श व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या दर्जेदार परंतु साधारण मूल्यांकन असलेल्या कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश करणारे म्हणून गुंतवणूक जगतात ओळखले जातात. त्यांच्या या ओळखीची साक्ष ते निधी व्यवस्थापक असणाऱ्या काळातील डीएसपी ब्लॅकरॉक टायगर, डीएसपी ब्लॅकरॉक स्मॉल अँड मिड कॅप, डीएसपी ब्लॅकरॉक मायक्रो कॅप या फंडाची कामगिरी देत असते. फंडाच्या गुंतवणुकीत समभागांचा समावेश करताना त्यांचा कटाक्ष कंपनीची नफाक्षमता, ‘पी/ई’ रेशो, कंपनीच्या विद्यमान किंमतीचे पुस्तकी किंमतीशी प्रमाण या आर्थिक परिमाणांवर असतो. त्यांच्या गुंतवणूक कौशल्याचा प्रत्यय या फंडाची नोव्हेंबर २०१२ नंतरची कामगिरी देत असते.

फंड व्यवस्थापनाच्या मते, सरकारने मागील दोन वर्षांत मोठय़ा आर्थिक सुधारणा करण्यासाठी जी पाश्र्वभूमी तयार करावे लागते ती तयारी झाली आहे. सरकारने महसूल गळती रोखण्याच्या वाटा बऱ्यापैकी बंद केल्या असून येत्या अर्थसंकल्पात सरकारचा भर सुधारणापुढे नेण्याचा राहील. निश्चलनीकरणामुळे मध्यम व लघु उद्योगांची घसरलेली गाडी रुळावर येण्यास पुढील आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाही निकालापर्यंत वाट पहावी लागेल.

ईएलएसएस फंड गटात १० वर्षांच्या एसआयपी गुंतवणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा वृद्धी दर एल अँड टी टँक्स अ‍ॅडव्हान्टेज फंडाने नोंदविला आहे. साहजिक करबचतीसोबत गुंतवणूकदारांसाठी संपत्तीची निर्मिती करणारा हा फंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रत्येक करदात्याने कर नियोजनासाठी करावयाच्या गुंतवणुकील थोडा हिस्सा आपल्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार ईएलएसएस फंडात गुंतविणे गरजेचे आहे. या गरजेची पूर्तता करण्यासाठी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीले योग्य ईएलएसएस फंडाची निवड करावी.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)