बच्चू कडू यांनी अमरावतीत महायुतीच्या विरोधात भूमिकात घेत प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी महायुतीत असतानाही विरोधी भूमिका घेतल्याने विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान, आता बच्चू कडू हे पुन्हा एकदा महायुतीविरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत. ते आता हातकंणगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरोधात राजू शेट्टी यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.
हेही वाचा – “प्रचारात मुसलमानांना खेचावे लागले याचा अर्थ…” मंगळसूत्राच्या विधानावरून शिवसेना उबाठ…
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
“राजू शेट्टी हे चळवळीतील नेते आहेत. ते शेतकऱ्यांसाठी लढणारे एक योद्धा आहेत. ज्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो, त्याचप्रमाणे राजू शेट्टीही काम करतात. मला माहिती आहे की हातकणंगलेमध्ये दोन्ही मराठा समाजाचे नेते उभे आहेत. मात्र, जातीच्या पलीकडे जाऊन आमचं नातं शेतकऱ्याशी जोडलं गेलं आहे. ते नातं आम्ही टीकवू आणि राजू शेट्टींना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
“मी हातकणंगलेमध्ये प्रचार करण्यासाठी कधी जाईल, हे अद्याप निश्चित नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल. पण एक संपूर्ण दिवस राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी जाणार आहे, हे निश्चित आहे. माझं यासंदर्भात राजू शेट्टी यांच्याशीही बोलणं झालं आहे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – अशोक चव्हाणांच्या जाण्याने नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसणार? बाळासाहेब थोरात म्हणाले…
दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी राजू शेट्टी स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे हातकंणगलेतील मतदार यंदा आजी-माजी खासदारांना पुन्हा संधी देणार की, नवीन चेहऱ्याला खासदार करणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.