19 November 2017

News Flash

अर्थ.. मशागत : म्युच्युअल फंड युनिट्सही आता डिमॅट स्वरूपात!

एप्रिल ते जुलै २०१७ दरम्यान ४० लाख गुंतवणूकदारांनी नवीन खाती उघडली आहेत

अजित प्रभाकर मंजुरे | Updated: August 28, 2017 5:20 AM

गेल्या चार महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते जुलै २०१७ दरम्यान ४० लाख गुंतवणूकदारांनी नवीन खाती उघडली आहेत.

शेअर बाजारात गुंतवणूक करावयास कचरणारे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे वळतात. त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक राजमार्गच आहे. घसरणारे व्याजदर, इतर गुंतवणूक साधनांतील मिळणारा तुटपुंजा परतावा यामुळे गुंतवणूकदारांचा कल साहजिकच म्युच्युअल फंडाकडे वाढला आहे.

गेल्या चार महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते जुलै २०१७ दरम्यान ४० लाख गुंतवणूकदारांनी नवीन खाती उघडली आहेत. आता म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची – फोलिओधारकांची संख्या ५.९४ कोटींपर्यंत पोहोचली आहे. परंतु या संख्येमध्ये एकाच गुंतवणूकदाराची अनेक खाती जरी असली तरी किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, असे सेबीचा अहवाल सांगतो. यांतील प्रमुख कारण म्हणजे म्युच्युअल फंड घराण्यांची संघटना- अ‍ॅम्फी आणि सेबी यांनी केलेले गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम हेही आहे. असे असूनही मात्र डिमॅटधारकांची संख्या संपूर्ण देशात २.८५ कोटी एवढीच मर्यादित आहे. म्युच्युअल फंडाविषयी सेबीने केलेल्या निर्णयानुसार आता म्युच्युअल फंडाची युनिट्स डिमॅट स्वरूपात धारण करता येणार आहेत. याचे पुष्कळ फायदेही आहेत. परंतु जसे शेअर्सचे डिमॅट करणे सेबीने बंधनकारक केले होते तसे म्युच्युअल फंडाची युनिट्स डिमॅट करणे सध्या तरी बंधनकारक नसल्याने बरेचसे गुंतवणूकदार अजूनही कागदोपत्री स्वरूपातही युनिट्स बाळगत आहेत.

म्युच्युअल फंडाची युनिट्स डिमॅट स्वरूपात ठेवायचे फायदे –

१. एकाच डिमॅट खात्यात शेअर्स व म्युच्युअल फंड युनिट्सचे विवरण बघण्याची सोय.

२. आपले नामनिर्देशन, बँक खात्यातील बदल, पत्ता/जागा बदलण्याचा दाखला आपण फक्त एका ठिकाणी म्हणजे डिपीला पत्र देऊन बदलू शकतो. सध्या असे करायचे तर आपणास जेवढय़ा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आहे, त्या सर्व फंड घराणे/ एएमसींना वेगवेगळे पत्र द्यावे लागते.

३. नवीन युनिट्स घेण्यासाठी आपण आपल्या ब्रोकरला फोन करून ती खरेदी करू शकता आणि जसे शेअर्स जमा होतात, त्याचप्रमाणे ही युनिट्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा होतील.

४. सिस्टीमेटिक इन्वेस्टमेंट प्लान (एसआयपी ) डिमॅट स्वरूपात चालू करू शकता.

५. म्युच्युअल फंडाच्या नवीन योजनेमध्ये (एनएफंो)आपले डिमॅट खाते क्रमांक घालून सहभागी होऊ शकता.

६. आपल्या खात्यातील डिमॅट स्वरूपातील सर्व युनिट्स विकण्याची किंवा थोडी युनिट्स विकण्याची सोय.

७. आपल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा लाभांश इच्छित बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट मिळण्याची सोय.

८. डिमॅट स्वरूपातील एकत्रित युनिट्सवर कर्ज घेण्याची सुविधा

९. डिपॉझिटरीकडून म्युच्युअल फंड युनिट्स घेतले किंवा विकले यासंबंधी पावती मिळण्याची सुविधा.

म्युच्युअल फंडाची युनिट्स डिमॅट स्वरूपात ठेवण्यासंबंधी असलेले गैरसमज –

१. डिमॅट खात्याचे चार्जेस (वार्षिक खाते शुल्क) भरावे लागतील

२. युनिट्स विकताना गुंतवणूकदारांना ब्रोकरेज द्यावे लागेल. परंतु बरेचसे डिपी अशा प्रकारचे शुल्क आकारत नसून गुंतवणूकदारांनी या प्रक्रियेचा फायदा घ्यायला हवा.

हल्लीच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने २० लाख कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती आपण वाचली असेलच. या गुंतवणुकीमधील किरकोळ गुंतवणूकदारांचे प्रमाण हे मोठय़ा वेगाने वाढत आहे. आणि ही गुंतवणूक जर डिमॅट स्वरूपात झाल्यास गुंतवणूकदारांना उपरोक्त फायदे घेता येतील तसेच आगामी काळात बरेचसे ब्रोकर्स /डिपी या सुविधा डिमॅट स्वरूपातच द्यायची योजना आखत आहेत तेव्हा काळाप्रमाणे बदल करणे सर्वानाच सोयीस्कर होणार आहे.

अजित प्रभाकर मंजुरे AjitM@cdslindia.com

लेखक सीडीएसएलच्या गुंतवणूक साक्षरता विभागाचे प्रमुख आहेत.

इक्विटी फंडात १२,०३७ कोटींचा सार्वकालिक उच्चांकी ओघ

जुलैअखेर म्युच्युअल फंडाची एकत्रित मालमत्ता १९.९६ लाख कोटींवर पोहोचली आहे. एकूण ४२ फंड घराणी असलेल्या या उद्योगाने मे २०१४ अखेर पहिल्यांदा १० लाख कोटींचा टप्पा गाठला होता आणि तीन वर्षांत मालमत्ता जवळपास दुप्पट झाली आहे.

म्युच्युअल फंडाच्या वेगवेगळ्या फंड गटांपैकी मागील तीन वर्षांत सर्वाधिक गुंतवणूक बॅलन्स्ड फंडात झाली असून त्या खालोखाल इन्कम फंडांचा क्रमांक लागतो. जुलै महिन्यांत ६३,५०४ कोटी म्युच्युअल फंडात नव्याने गुंतविल्याचे म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीत दिसून आले आहे. शेअर बाजार निर्देशांक रोज नवीन सार्वकालिक उच्चांक स्थापित करत असल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह द्विगुणित झाल्याचा परिणाम या आकडेवारीत दिसून येत आहे. जुलै महिन्यांत समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात एकूण १२,०३७ कोटींची गुंतवणूक झाली असून हा सार्वकालिक उच्चांक आहे. या गुंतवणुकीपैकी निम्मी रक्कम नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या (एसआयपी) माध्यमातून आली असून दरमहा  एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात होणाऱ्या गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे.

निर्देशांक रोज नवीन नवीन उच्चांक प्रस्थापित करीत असतांना गुंतवणूकदारांच्या मनात आपल्या गुंतवणुकीच्या सुरक्षिततेविषयी थोडी भीतीसुद्धा जाणवली. गुंतवणूकदाराच्या मनातील हा भीतीचा धागा पकडून, म्युच्युअल फंड उद्योगातील द्वितीय क्रमांकाची मालमत्ता कंपनी असलेल्या एचडीएफसी म्यच्युअल फंडाच्या उत्पादने व प्रशिक्षण विभागाचे उपाध्यक्ष असलेल्या अशोक कानावाला यांना विचारले असता ते म्हणाले, ‘शेअर बाजारात पहिल्यांदाच परकीय वित्तसंस्थांपेक्षा भारतीय अर्थसंस्था अधिक गुंतवणूक करीत आहेत. या गुंतवणुकीत म्युच्युअल फंडाचा मोठा वाटा आहे. गुंतवणूकदारांना ‘एसआयपी’चे महत्त्व दिवसेंदिवस पटत असून दिवसागणिक ‘एसआयपी’च्या संख्येतील वाढीतून हे दिसून येते. परिणामी मागील संपूर्ण आर्थिक वर्षांत जितकी रक्कम एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवली गेली त्याच्या निम्म्याहून अधिक रक्कम या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून आली आहे.’ म्युच्युअल फंडात दरमहा सरासरी साडेचार हजार कोटी रक्कम एसआयपीच्या माध्यमातून गुंतविली जात असून जुलै महिन्यात या रक्कमेत १०० कोटींनी वृद्धी झाली आहे.

‘गुंतवणूकदारांना एसआयपीचे महत्त्व पटले असून गुंतवणूकदार स्वयंप्रेरणेने एसआयपी करण्यास पुढे येत आहेत. हे जाणून आम्ही ऑगस्ट महिन्यासाठी ४५ हजार नव्या एसआयपींची नोंदणी करण्याची लक्ष्य निश्चित केले आहे. या आधी मागील वर्षी जुलै २०१६ मध्ये २० हजार एसआयपींची नोंदणी करण्याचे लक्ष्य आम्ही यशस्वीपणे पार पाडले होते. असे प्रुडंट कॉर्पोरेट सव्‍‌र्हिसेसचे साहिल शेख यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

 

First Published on August 28, 2017 1:10 am

Web Title: mutual funds units now in demat form