सुप्रीम पेट्रोकेमिकल्स म्हणजे सुप्रीम इंडस्ट्रीज आणि राजन रहेजा यांनी सुरू केलेला संयुक्त प्रकल्प. १९८९ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली ही कंपनी स्टिरीन मोनोमर आणि पॉलिस्टिरीनचे उत्पादन करते. पॉलिस्टिरीन उत्पादनाचा प्रकल्प एबीबी लुमस क्रेस्ट या अमेरिकन कंपनीच्या साहाय्याने उभारला आहे. वार्षिक २,०४,००० टन उत्पादन क्षमता असलेल्या पॉलिस्टिरीनचा उपयोग अनेक क्षेत्रांना आणि उत्पादनांमध्ये होतो. यात प्रामुख्याने प्लॅस्टिक, पॉलिमर, वाहन उद्योग, एफएमसीजी, इलेक्ट्रॉनिक्स तसेच व्हाइट गुड्सचा समावेश होतो. कंपनीचे भारतात दोन मोठे प्रकल्प असून पैकी पहिला प्रकल्प महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्य़ात तर दुसरा प्रकल्प तामिळनाडूमध्ये चेन्नईजवळ आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ९६ टक्के उत्पन्न पॉलिस्टिरीनचे आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) तसेच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती यांचा परिणाम कंपनीच्या उलाढालीवर तसेच नफ्यावर होऊनही सप्टेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठी कंपनीने ७०३.७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३६.७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. आगामी काळात कच्च्या मालाच्या किमती स्थिर राहतील तसेच ‘जीएसटी’चा परिणाम दीर्घ काळात चांगलाच ठरेल, अशी अपेक्षा आहे. सध्या अनेक कंपन्या शेअर बाजारात अवाच्या सवा अधिमूल्याने आपली भागविक्री करीत आहेत. ‘आयपीओ’लादेखील गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद लाभून, ते यशस्वी होत आहेत; परंतु याच वेळी अनेक जुन्या कंपन्यांचे शेअर्स मुंबई शेअर बाजारात आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. सुप्रीम पेट्रोकेमसारखी कंपनी म्हणूनच आकर्षक वाटते. उत्तम प्रवर्तक, उपयुक्त उत्पादने तसेच कुठलेही कर्ज नसलेली आणि दमदार ३६ टक्के रिटर्न ऑन नेट्वर्थ असलेली सुप्रीम पेट्रोकेम एक मध्यम ते दीर्घकालीन उत्तम गुंतवणूक ठरू शकते.

सूचना :

१. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.