18 January 2019

News Flash

फंड विश्लेषण : चीअर्स..नववर्षांच्या स्वागताच्या उत्पादनांचा लाभार्थी

एसबीआय एफएमसीजी फंड हा समभागकेंद्रित धोका पत्करून परतावा मिळविणारा फंड आहे.

एसबीआय एफएमसीजी फंड

जगातील एकूण व्हिस्की उत्पादनापैकी निम्म्या उत्पादनाचा उपभोग भारतीय घेतात. मुंबईतील एखाद्या गेला बाजार बारमध्ये ६० मिलीच्या व्हिस्कीसाठी ४५-५० रुपयांपासून ते पंचतारांकित हॉटेलमध्ये ६० मिलीच्या जॉनी वॉकरच्या ब्लॅक लेबलसाठी ३,००० रुपये मोजणारे ग्राहकही आहेत. मागील दशकात अल्कोहोल असलेल्या पेयांची बाजारपेठ दुपटीने वाढली आहे. भारतीयांच्या मद्य सेवनाच्या बाबतच्या मानसिकतेत बदल झाल्यामुळे मद्य सेवनाला मिळणारी सामाजिक मान्यता आणि मद्यपानास अडथळा असलेले १८ वर्षे वयाच्या किमान अटीची पूर्तता करणारी दरवर्षी १ कोटी लोकसंख्या या मद्य बाजारपेठेच्या विस्तारास कारण ठरली आहे. कॅलेंडर वर्ष २०१६ मध्ये भारतात विकल्या गेलेल्या आयएमएफएल (इंडियन मेड फॉरीन लिकर) जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांत एकत्रित विकल्या गेलेल्या आयएमएफएलपेक्षा अधिक आहे. एका बॉक्समध्ये ७५० मिलीच्या १२ बाटल्या असतात. अर्थात एका बॉक्समध्ये नऊ लिटर व्हिस्की असते. २००७ मध्ये भारतात व्हिस्कीचे ८०.२ दशलक्ष बॉक्सेस विकले गेले. २०१६ मध्ये १९३.१ दशलक्ष बॉक्स विकले गेले आहेत. भारतातील व्हिस्कीच्या बाजारपेठेची झालेली वाढ ही अन्य देशांच्या याच काळातील सरसरी वाढीच्या पाच पट आहे. जगातील सर्वाधिक संख्येने विकल्या जाणाऱ्या पहिल्या दहा व्हिस्कीच्या नाममुद्रांमध्ये ‘ऑफिसर्स चॉइस’ आणि ‘मॅकडॉवेल्स नंबर वन’ या दोन नाममुद्रांचा समावेश आहे. ही गोष्ट केवळ दारूच्या बाबतीत घडली नसून अनेक स्थायी आणि अस्थायी ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाबतीत हे घडले आहे. परिणामी ज्या कोणी २ जानेवारी २०१३ रोजी ‘एसबीआय एफएमसीजी फंडा’च्या प्रारंभापासून १ लाख रुपये गुंतविले असतील त्या गुंतवणुकीचे २२ डिसेंबर २०१७ रोजी २.३० लाख रुपये झाले आहेत. पाच वर्षांच्या परताव्याचा वार्षिक दर १८.४१ टक्के आहे. याच कालावधीत १००० रुपयांची नियोजनबद्ध ‘सिप’ गुंतवणूक केली असल्यास ६० हजारांच्या गुंतवणुकीचे २२ डिसेंबर २०१७ रोजी १.०३ लाख रुपये झाले असून परताव्याचा दर २१.४५ टक्के आहे. याच कालावधीदरम्यान आयसीआयसी प्रु. एफएमसीजी फंडात केलेल्या १.००० रुपयांच्या ‘सिप’ पद्धतीच्या ६० हजारांच्या गुंतवणुकीचे २२ डिसेंबर २०१७ रोजी ०.९० लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १६.५१ टक्के आहे.

एसबीआय एफएमसीजी फंड हा समभागकेंद्रित धोका पत्करून परतावा मिळविणारा फंड आहे. मागील सहा महिन्यांत फंडाच्या गुंतवणुकीत १८ ते २० दरम्यान समभागांचा समावेश होता. मागील पाचही वर्षे एका कॅलेंडर वर्षांचा (जानेवारी-डिसेंबर) परतावा संदर्भ निर्देशांकाच्या कॅलेंडर वर्षांच्या परताव्याहून अधिक आहे. या फंडाचा परतावा गुंतवणुकीस आकर्षक वाटण्याचे मुख्य कारण फंडाची सुरुवात झाल्यापासून एफएमसीजी सेक्टरमधील कंपन्यांची नफाक्षमता वर्षांगणिक सुधारत आहे. एफएमसीजीमधील कंपन्यांचे मूल्यांकन विक्रीच्या वाढीवर न ठरता नफ्यातील वाढीवर ठरते. या कंपन्यांच्या पाच वर्षांतील नफ्यातील वाढ मागील २५ वर्षांतील सर्वाधिक आहे. याचा फायदा या फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या कंपन्यांच्या मूल्यांकनाला मिळाला आहे. या फंडात गुंतवणूक करताना ‘गुंतवणुकीवरील मागील परतावा भविष्यातील परताव्याची खात्री देत नसतो’ या सेबीच्या वैधानिक इशाऱ्याचे स्मरण ठेऊनच करायची आहे. फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या मद्यनिर्मात्या कंपन्यांची नोंद घेणे गरजेचे आहे. मद्याचा समावेश ‘जीएसटी’मध्ये नाही. परंतु मद्य निर्मिती आणि पॅकेजिंग वितरणासाठी लागणाऱ्या घटकांचा समावेश ‘जीएसटी’मध्ये असल्याने हा उद्योग एका संक्रमणातून जात आहे. मद्याच्या किमती स्थिरावण्यास वेळ लागणार असल्याने या उद्योगाच्या नफाक्षमतेत चढ-उतार संभवतात. एफएमसीजी कंपन्यांचे सध्याचे मूल्यांकन ऐतिहासिक उच्चांकावर असल्याने या फंडातील गुंतवणूक निर्धोक मुळीच नाही. गुंतवणुकीतील जोखीम आणि परतावा यांचा समतोल साधू इच्छिणाऱ्या आणि किमान १० वर्षे गुंतवणूक तशीच ठेवण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांना हा फंड खात्रीने निराश करणार नाही.

समभाग गुंतवणुकीत तंत्रज्ञान, औषध निर्माण आणि ग्राहकोपयोगी वस्तू ही उद्योग क्षेत्रे गुंतवणुकीसाठी सुरक्षित समजली जातात. मागील वर्षभरात औषध निर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या क्षेत्रीय फंडाचा आढावा घेण्यात आला. नाताळ आणि नववर्षांच्या स्वागताला उत्सुक बाजारपेठा या फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांनी सजलेल्या आहेत. या फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या कंपन्यांच्या उत्पादनाची (मद्य, सुवर्ण आभूषणे, नाममुद्रांकित पेये इत्यादी) खरेदी नाताळच्या निमित्ताने होत असल्याने ‘फंड विश्लेषणा’साठी आजच्यापेक्षा अधिक चांगला दिवस मिळाला नसता. नववर्षांच्या स्वागताच्या लाभार्थी असलेल्या कंपन्यांतून गुंतवणूक करणाऱ्या फंडात कोणाला गुंतवणूक करावीशी वाटली तर आनंदच वाटेल.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on December 25, 2017 12:33 am

Web Title: sbi fmcg fund fund analysis