सध्या शेअर बाजारात विचित्र परिस्थिती आहे. म्हणजे शेअर बाजार निर्देशांकात वाढ होताना दिसते, परंतु आपले शेअर्स मात्र वर जात नाहीत अशी काहीशी स्थिती आहे. याचे कारण सध्याची तेजी ही सर्वंकष नसून केवळ काही मोठय़ा शेअर्सशी संबंधित आहे ज्यांचे निर्देशांकात वजन आहे. रिलायन्स, टीसीएस, एचयूएल, एचडीएफसी यांसारख्या कंपन्यांची नावे या संबंधात घेता येतील. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजी यायला काही वेळ द्यावा लागेल. म्हणूनच या स्तंभातून सुचवलेले शेअर्स, तुम्हाला कमी भावातदेखील मिळू शकतात. प्रत्येक मंदीच्या दिवसाला थोडी थोडी खरेदी अशा वेळी फायद्याची ठरू शकते.

श्रीराम पिस्टन अँड रिंग्स ही १९७२ मध्ये श्रीराम समूहाने स्थापन केलेली कंपनी. कोल्बेनश्मित जीएमबीएच या जर्मन कंपनीच्या तांत्रिक साहाय्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे पिस्तन बनवण्याकरिता या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. गेल्या ४० वर्षांत श्रीराम पिस्टन पिस्टन उत्पादनात एक आघाडीची कंपनी बनली असून ती केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतदेखील आपली विविध उत्पादने पुरवत आहे. पिस्टन, पिस्टन रिंग्स, पिस्टन पिन्स आणि इंजिन वॉल्व्ह बनवणारी ही कंपनी वाहन क्षेत्रातील सर्व प्रकारच्या वाहनांना म्हणजे दुचाकी, तीन चाकी, पॅसेंजर कार, वाणिज्य वाहने आणि ट्रॅक्टर इ. आपली उत्पादने पुरवते. कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलात जर्मन सहकारी कंपनी कोल्बेनश्मित जीएमबीएचचा २० टक्के वाटा असून रिकेन कॉर्पोरेशन या जपानी कंपनीचा २०.९७ टक्के वाटा आहे. या भागीदारीमुळे तसेच आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनीच्या प्रमुख ग्राहकांत बीएमडब्ल्यू, मेर्सिडिज बेंझ, फोक्सवॅगन, फोर्ड, वॉल्वो, प्युजो इ. नामांकित कंपन्यांचा समावेश होतो. या खेरीज होंडा आणि मारुतीसाठी आपली उत्पादने पुरवण्यासाठी श्रीराम पिस्टनचा विशेष उत्पादन विभाग आहे. कंपनीची भारतात राजस्थानमधील अल्वर तर उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे उत्पादन केंद्रे आहेत. पिस्टन आणि रिंग्सची सर्वात मोठी निर्यातदार असलेली ही कंपनी जर्मनी, ब्रिटन, हॉलंड, ग्रीस, बेल्जियम, इजिप्त, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ. अनेक देशांत निर्यात करते. गेली अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या या कंपनीने मार्च २०१८ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता अपेक्षित कामगिरी करून दाखविली आहे. या वर्षांत कंपनीने १,७२९.४१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १३८.८८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो १९ टक्क्य़ांनी अधिक आहे. यंदा रस्ते बांधणीवर दिलेला भर तसेच चांगला पाऊस यामुळे वाहनांना चांगली मागणी अपेक्षित आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांंत कंपनीकडून २,००० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. सध्या वर्षभराच्या नीचांक पातळीवर असलेला हा शेअर तुमच्या पोर्टफोलियोला बळकटी देऊ शकतो.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

श्रीराम पिस्टन अँड रिंग्स लि.         

(एनएसई सूचिबद्ध)

मिड कॅप समभाग

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

भारतीय प्रवर्तक                                ४७.७८

परदेशी प्रवर्तक                                   ४०.९७

बँक/ म्यु. फंड / सरकार                      —

इतर                                                    —

बाजारभाव (रु.)                                   १३५३.३५

उत्पादन/ व्यवसाय                              वाहन पूरक

भरणा झालेले भागभांडवल                   २२.३७ कोटी रु.

पुस्तकी मूल्य (रु.)                                ४०८.३०

दर्शनी मूल्य (रु.)                                   १०/-

लाभांश (%)                                           १००%

प्रति समभाग उत्पन्न (रु.)                     ६२.१०

पी/ई गुणोत्तर                                        २२

समग्र पी/ई गुणोत्तर                              ४१

डेट/इक्विटी गुणोत्तर                             ०.२९

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर                       १३.८४

रिटर्न ऑन नेटवर्थ (%)                           १६.०७

बीटा                                                        —

बाजार भांडवल (कोटी रु.)                        ३,२२२

५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.)    २,४९८/१,३७२

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.