डॉ. ऊर्जित पटेल यांचे उद्या सादर होणारे पहिले पतधोरण आहे. याव्यतिरिक्त व्याज दर ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीचेसुद्धा हे पहिले पतधोरण आहे. या कारणांनी उद्याचे पतधोरण वैशिष्टय़पूर्ण म्हणावे लागेल.

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधल्या वेताळाला प्रश्न विचारू लागला. ‘राजा, उद्या रिझव्‍‌र्ह बँक आपले द्विमाही पतधोरण जाहीर करणार आहे. उद्याच्या पतधोरणात रेपो दरात कपात करून रिझव्‍‌र्ह बँक व्याज दर कपातीचे संकेत देईल काय? प्रश्नाचे उत्तर ते तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील.’ वेताळाने राजाला सांगितले.

‘उद्याचे पतधोरण ऐतिहासिक पतधोरण आहे. डॉ. ऊर्जित पटेल हे भारताबाहेर जन्मलेले पहिले व डेप्युटी गव्हर्नरपदावरून गव्हर्नरपदी बढती मिळालेले आठवे गव्हर्नर आहेत. ४ सप्टेंबर रोजी नवनियुक्त गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका महिन्याने हे पतधोरण जाहीर होत आहे. डॉ. ऊर्जित पटेल यांचे हे पहिले पतधोरण आहे. याव्यतिरिक्त व्याज दर ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीचेसुद्धा हे पहिले पतधोरण आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात रिझव्‍‌र्ह बँक कायदा १९३५ मध्ये सुधारणा सुचविणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर सरकारने आपल्या कोटय़ातील तीन सदस्यांची नियुक्ती केल्यानंतरचे हे पहिले पतधोरण आहे. या कारणांनी उद्याचे पतधोरण वैशिष्टय़पूर्ण म्हणावे लागेल,’ राजा म्हणाला.

‘रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर व व्याज दर यांचे नाते ‘लव्ह-हेट रिलेशन’सारखे असते. व्याजदरात कपात केली तर महागाई वाढण्याचा धोका असतो व व्याजदरात कपात केली नाही तर सरकारची नाराजी पत्करावी लागते. कात्रीत सापडलेले नवीन गव्हर्नर व नव्याने स्थापलेली पतधोरण ठरविणारी समिती यांच्यासमोर महागाई आटोक्याबाहेर न जाऊ  देता अर्थव्यवस्थेला चालना देणारे पतधोरण आखण्याचे आव्हान आहे.’

‘माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा ते दर कपात करतील,’ अशी अपेक्षा असतानासुद्धा प्रत्यक्षात राजन यांनी दोन वेळा दरवाढ केल्यानंतर आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात जानेवारी २०१५ पासून व्याजदर कपातीला सुरुवात केली. राजन यांच्या काळात शेवटची रेपो दर कपात एप्रिलच्या पतधोरणात झाली. या आर्थिक वर्षांत एप्रिल महिन्यात पाव टक्क्य़ांची कपात केल्यानंतर जून व ऑगस्टच्या दोन पतधोरणांत रेपो दर कपात झालेली नाही. साहजिकच उद्याच्या पतधोरणात किमान पाव टक्क्यांची कपात होणे अर्थजगताला अपेक्षित आहे. खरिपाचा हंगाम उत्तम झाला असला तरी परतीच्या मान्सूनने अनेक ठिकाणी ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण केले आहे. त्यामुळे नक्की कृषी उत्पादनाच्या आकडेवारीचा अंदाज येण्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. रब्बी हंगामातसुद्धा सुगीचा अंदाज असला तरी महागाई मर्यादेबाहेर जाण्याची काळजी घ्यावी लागणार आहे. जुलै महिन्याच्या औद्योगिक उत्पादनात ४% घट होऊन औद्योगिक उत्पादन ८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर स्थिरावले आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा भाग असलेल्या २२ पैकी १२ उद्योगक्षेत्रांनी घट नोंदिवली आहे. भांडवली वस्तू (यंत्र सामग्री) क्षेत्राने सर्वाधिक घट (२९%) नोंदविली आहे. सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे सर्व प्रयत्न करीत असले तरी सरकारच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश आलेले नाही. रिझव्‍‌र्ह बँकेने मार्च २०२१ पर्यंत महागाईचा दर ४% राखण्याचे ठरविले असून, त्यात २% कमी-अधिक राहण्याची मुभा मिळाली आहे. जुलै महिन्यांत महागाई दराने सहा टक्क्य़ांची वेस ओलांडल्याने तो सर्वाचाच चिंतेचा विषय होता. सप्टेंबर महिन्यात जाहीर झालेला ऑगस्ट महिन्याचा महागाईचा दर कमी होऊन ५.०५ टक्के झालेला असला तरी व्याज दर कपातीला पतधोरण समितीचे सदस्य लगेचच तयार होतील असे नाही.’

‘चालू आर्थिक वर्षांतील या नंतरची पतधोरणे अनुक्रमे ७ डिसेंबर व ४ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असल्याने पुढील बैठकीपर्यंत धोरण ‘जैसे थे‘ राहण्याची शक्यता वाटते,’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

पुंगीवाला – gajrachipungi@gmail.com