मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सेन्सेक्स नवीन उच्चांक नोंदवत आहे. अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे हे संकेत आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवडयातील सोमवारी मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स ४८ हजाराच्या पुढे गेला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी सुद्धा १४ हजारच्या पुढे आहे.

जीएसटी करातून जमा होणाऱ्या महसूलात झालेली वाढ, औषध नियंत्रक डीसीजीआयने लसीच्या वापराला दिलेली मान्यता आणि डिसेंबर महिन्यात कार विक्रीमध्ये झालेली उत्साहवर्धन वाढ, या सगळयाचा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स उसळी घेत आहे.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींना दिलेली मान्यता यामुळे आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने झेप घेतली. भारताच्या उत्पादन क्षेत्रातील कामगिरीत झालेली सुधारणा यामुळे सुद्धा गुंतवणूकदारांमध्ये एका उत्साह पाहायला मिळत आहे. वाहन निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांचा डिसेंबरमधील विक्रीचा आकडा अपेक्षेपेक्षा खूपच चांगला आहे. एकूणच या सगळयाचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे.