* मकरंद जोशी

नुकत्याच जाहीर केलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयानुसार, सहकारी बँकांना वित्त वर्ष २०१९-२० साठी त्यांच्या भागधारकांना लाभांश वितरित करता येणार नाही. या निर्णयाचा खूप मोठा फटका सामान्यांना, निवृत्त नागरिकांना बसणार आहे. इतकेच नव्हे तर यामुळे सहकारी बँकेकडे येणाऱ्या निधी ओघावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवडय़ात फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडने त्यांच्या ६ गुंतवणूक योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. या म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांचे पैसे काही कंपन्यांच्या अपरिवर्तनीय रोख्यांमध्ये गुंतवले होते आणि सध्याच्या कोविड-१९ संकटात या रोख्यांची विक्री होऊ  शकत नसल्यामुळे फ्रँकलिन टेम्पल्टनला हा निर्णय घ्यावा लागला, असं सांगितलं गेलं. या दोन घटनांआधी आपण शेअर बाजारातील प्रचंड पडझड अनुभवली. या दरम्यान ३५ लाख कोटी रुपयांची संपत्ती कमी झाली. म्युच्युअल फंडामधून २.२० लाख रक्कम बाहेर पडली. अशा वेळी निवृत्त नागरिकांना आणि मध्यम व निम्न मध्यम वर्गाला खूप मोठा प्रश्न पडला आहे.

सहकारी बँक लाभांश देऊ  शकत नाहीत. म्युच्युअल फंडातील पैसे सुरक्षित नाहीत. अशा वेळी सामान्य माणसाच्या मनात भीती, संभ्रम, उद्विग्नता उत्पन्न होत आहे. लाभांशाच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयामुळे एकंदर सहकारी बँकेच्या भवितव्याविषयी शंका उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात काहीही बदल न करता फक्त भागधारकांना वेठीला धरल्याची भावनादेखील व्यक्त होत आहे. या परिस्थितीत माझी काही मतं इथं मांडण्याचा मी प्रयत्न करतो.

१) कोरोना हे अभूतपूर्व संकट आहे

असं संकट अखिल मानवजातीवर या आधी कधीही आलं नाही. अख्ख्या जगात टाळेबंदी (लॉकडाऊन) येईल/जवळपास सर्व देशांत आर्थिक व्यवहार ठप्प होतील असं कधीही झालं नाही. त्यामुळे नेहमीच्या जगण्यात आपण जे नियम वापरतो किंवा अपेक्षा ठेवतो तसं वागून चालणार नाही. आपल्या अपेक्षांना मुरड घालावी लागेल. हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, हे संकट आज ना उद्या ओसरणार आहे. अशा वेळेला आपण सर्वानी याचं भान ठेवून आजपर्यंत आपल्याला साथ देणाऱ्या माणसांचे, संस्थांचे आभार मानून कृतज्ञ राहून एकमेकांचे संरक्षण करायला हवे. सहकारी बँकांचा इतिहास मोठा आहे आणि चांगल्या संस्था अशा संपणार नाहीत. त्या परत लाभांश देतील.

२) हे संकट नव्या नेतृत्वाला जन्म देईल

या संकटाने प्रचंड आर्थिक संहार केला आहे. या संकटकाळी कोण कसं वागेल त्याप्रमाणे नवे मित्र/शत्रू/आघाडी निर्माण होईल. या संकट काळात ज्या सहकारी संस्था, मालक, सरकार आपल्या वैयक्तिक खर्चात कपात करतील, भत्त्यात कपात करतील किंबहुना वैयक्तिक आर्थिक मदत करतील अशा व्यक्ती/संस्था/पक्ष लोकांच्या मनात स्थान निर्माण करतील. लाभांश देण्यास मनाई असली तरी भागधारकांना मदत करणाऱ्या (लाभांशाव्यतिरिक्त) सहकारी संस्थांची विश्वासार्हता वाढेल. ज्या संस्था तंत्रस्नेही माध्यमांचा वापर करतील त्या अधिक प्रभावी होतील. त्याच कर्मचारी, ठेवीदारांना सक्षम करतील.

३) आर्थिक सुरक्षिततेची नवीन परिमाणे

करोना संकटाने आपल्या अनेक जाणिवा बदलल्या आहेत किंवा त्या अधिक प्रगल्भ तरी केल्या आहेत. गुंतवलेला पैसा सुरक्षित राहाणे किंवा त्यावर परताव्याची सुरक्षितता कायद्याने द्यावी अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा असते. ती सुरक्षितता देणारे कायदे हे आर्थिक सुरक्षितेतचे एक माध्यम आहे; मात्र ते गंतव्य नाही, याची जाणीव आपल्याला आली आहे. आपण अधिक सजग होणे हेदेखील सुरक्षितता मिळण्याचं एक माध्यम आहे. अधिकाराबद्दल उदासीन नसणे हेदेखील एक माध्यम आहे. गमावलेले पैसे परत मिळवू शकण्याचा आत्मविश्वास हेदेखील आर्थिक सुरक्षिततेचे एक महत्त्वाचं माध्यम आहे. कोणी दिलेल्या आश्वासनाला आर्थिक सुरक्षितता समजणं एवढं आता पुरेसं नाही. करोनामुळे गेलेलं वैभव परत मिळवण्याची धमक आणि हिरावलेले वैभव परत मिळवण्यासाठीची विजिगीषू वृत्ती ही खरी आर्थिक सुरक्षितता आहे.

४) नवनिर्माणाचा काळ

आपण एक विद्यार्थी, गृहिणी, निवृत्त नागरिक, नोकरदार वर्ग, लघू व मध्यम उद्योजक की राजकीय व्यक्ती असू देत, आपणा सर्वासाठीच हे सत्य आहे. हा नवनिर्माणाचा काळ आहे. त्या नवनिर्माणासाठी सज्ज आणि तत्पर होऊ  या. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान ज्या पद्धतीने जगात एक आर्थिक महासत्ता म्हणून नावारूपाला आला त्याचप्रमाणे करोना उत्तरकाळात नवीन व्यवस्था जन्माला येईल. त्या नवव्यवस्थेत आपण महत्त्वाचे घटक असण्यासाठी प्रयत्नशील हवे.

(लेखक कंपनी सचिव आहेत.)

makarandjoshi@mmjc.in