आधार तपशिलावर बेतलेल्या ऑनलाइन ‘पॅन’च्या (कायम खाते क्रमांक) त्वरित वितरणाच्या सुविधेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते गुरुवारी सुरुवात झाली. पॅन वितरणाची प्रक्रिया सोपी करण्याच्या दिशेने अशा सुविधेची घोषणा सीतारामन यांनी फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करताना केली होती.

ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक अशा मंडळींना कोणताही लांबलचक अर्ज न भरता, कोणताही दस्तऐवज न भरता अगदी विनामूल्य स्वरूपात ‘ई-पॅन’ विनाविलंब मिळविता येईल. केवळ १० मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.

अर्थसंकल्पातील प्रस्तावानुरूप, १२ फेब्रुवारी २०२० पासून ही ई-पॅन सुविधा प्रयोगरूपात सुरू करण्यात आली आणि त्या पश्चात आजवर ६,७७,६८० ई-पॅनचे वितरणही झाले असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले आहे. २५ मे २०२० अखेर देशातील पॅनधारकांची एकूण संख्या ५०.५२ कोटी इतकी आहे. त्यापैकी व्यक्तिगत पॅनची संख्या ४९.३९ कोटी इतकी आहे.

सरकारने पॅन आणि आधार संलग्नताही सक्तीची केली असून, अनेकवेळा दिल्या गेलेल्या मुदतवाढीनंतर ३० जून २०२० ही त्यासाठी निर्धारीत केलेली अंतिम तारीख आहे. आधारशी संलग्न असलेल्या पॅनची संख्या ३२.१७ कोटी इतकी आहे.