देशात दुसऱ्या क्रमांकावर आयसीआयसीआय बँकेची धुरा सशक्तपणे सांभाळत असलेल्या चंदा कोचर यांनी महिलांचे आर्थिक सबलीकरण ही काळाची गरज असून, कामाच्या ठिकाणी लिंगनिरपेक्ष वातावरण तयार करणे खूप गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. यासाठी आवश्यक पूर्वअट म्हणजे उद्योग क्षेत्राने घरापासूनच लिंग-समानतेचे धडे गिरविण्याचा पायंडा घालून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महिलांना त्यांच्या क्षमतेनुरूप आणि त्या करीत असलेल्या कामगिरीच्या आधारे, समर्पक जबाबदाऱ्या, पदे व नोकऱ्या सोपविल्या जातील, याची आपण खातरजमा केली पाहिजे. घर आणि काम दोन्ही त्या सांभाळू शकणार नाहीत, हा पूर्वग्रह दूर ठेवून गुणवत्तेला प्रधान महत्त्व देताना स्त्री-पुरुष भेद असू नये, असे चंदा कोचर यांनी उपस्थिती कॉर्पोरेट जगतातील उच्चाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या श्रोतृवर्गाला उद्देशून आवाहन केले. भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयच्या पश्चिम विभागाद्वारे आयोजित मनुष्यबळ विकास परिषदेच्या उद्घाटन सत्रात त्या बोलत होत्या. याप्रसंगी त्यांनी आयसीआयसीआय बँकेने विकसित केलेल्या महिलांना घर ते कार्यालय अथवा अन्यत्र सुरक्षितपणे प्रवास घडेल याची काळजी वाहणाऱ्या ‘आय-ट्रॅव्हलसेफ’ या मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले. सीआयआयचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष तसेच किलरेस्कर ब्रदर्सचे अध्यक्ष संजय किलरेस्कर यांनीही सर्वसमावेशी अर्थव्यवस्थेची कास धरताना, सांस्कृतिक-भाषिक नानारूपी विविधता जपत आणि सर्वाना सारखी संधी देणारी समावेशकता साधणे सध्या आव्हानात्मक असले तरी उद्योग क्षेत्राची याबाबत कटिबद्धता गरजेची बनली असल्याचे सांगितले.