मागील ११ वर्षांत देशाच्या बँकिंग विश्वात तब्बल ५०,००० हून अधिक घोटाळे व गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये २.०५ लाख कोटी रुपये फस्त केले गेले असून, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक अशा बडय़ा बँकांबाबत अशी प्रकरणे सर्वाधिक आढळून आल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेकडून उपलब्ध अधिकृत माहितीतून पुढे आले आहे.

हिरे व्यापारी नीरव मोदी-मेहुल चोक्सी घोटाळ्याचा डाग लागलेल्या पंजाब नॅशनल बँकेबाबत लुटीची रक्कम सर्वाधिक २८,७०० कोटी रुपयांची आहे.

आर्थिक वर्ष २००८-०९ ते २०१८-१९ अशा ११ वर्षांमध्ये बँक घोटाळ्यांची ५३,३३४ छोटी-मोठी प्रकरणे घडून आली. ज्यामध्ये सर्वाधिक ६,८११ प्रकरणे ही आयसीआयसीआय बँकेशी संलग्न असून, या बँकेतून घोटाळेबाजांकडून ५,०३३.८१ कोटी रुपये लांबविले गेले आहेत, असे रिझव्‍‌र्ह बँकेने माहिती अधिकारात विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेत ११ वर्षांत २३,७३४.७४ कोटी रुपयांची ६,७९२ आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे, एचडीएफसी बँकेत १,२००.७९ कोटी रुपयांची २,४९७ प्रकरणे आढळून आल्याचे ही माहिती सांगते. त्याखालोखाल बँक ऑफ बडोदा २,१६० प्रकरणे (१२,९६३ कोटी रु.), पंजाब नॅशनल बँक २,०४७ प्रकरणे (२८,७०१ कोटी रु.) आणि अ‍ॅक्सिस बँकेत १,९४४ घोटाळ्याच्या प्रकरणात ५,३०१.६९ कोटी रुपयांच्या जनतेच्या पैशाची लूट केली गेली आहे.