आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात म्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणुकीवर मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर १० टक्के कर आकारणी प्रस्तावित केलेली आहे. समभागसंलग्न म्युच्युअल फंडांसा लाभांश वितरण करही प्रस्तावित आहे. हा बदल अर्थसंकल्पाच्या मंजुरीच्या आधीन असून अर्थ विधेयकाचे संसदेतील मंजुरीनंतर कायद्यात रुपांतर झाल्यावर त्यांची अंमलबजावणी होईल. म्युच्युअल फंडांच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर आकारणीबाबत सध्या असलेली संदिग्धता दूर झाल्यावर पुन्हा या विषयावर वाचकांशी संवाद साधता येईल. भांडवली नफ्यावर कर लागू झाला तरी ‘ईएलएसएस’ करबचतीसाठी सर्वोत्तम पर्याय निश्चितच..

आपण कष्टाने कमावलेल्या पैशाचा उत्तम प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी, आपल्यापैकी प्रत्येक जण जानेवारी ते मार्च महिन्यात आपल्या करपात्र मिळकतीचे नियोजन करण्यात व्यग्र असतो.

तुम्ही कर बचत करणाऱ्या पर्यायांच्या शोधात आहात का? बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी, समभाग संलग्न बचत योजना (इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स -ईएलएसएस) सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. तेव्हा आज आपण ईएलएसएस म्युच्युअल फंडांची माहिती करून घेऊ या.

ईएलएसएस म्युच्युअल फंड म्हणजे काय?

ईएलएसएस ही नावाप्रमाणे भांडवली बाजाराशी निगडित म्युच्युअल फंड योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीतून आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर वजावटीचा लाभ मिळविला जाऊ शकतो. ईएलएसएस फंडातून समभागांमध्ये अधिक प्रमाणात गुंतवणूक केली जात असल्यामुळे ती इतर सर्व करबचत करणाऱ्या पर्यायांपेक्षा वेगळी आणि कर बचतीव्यतिरिक्त संपत्ती निर्मितीची क्षमता देखील अधिक असते.

मी किती बचत करू शकतो?

तुम्ही खालील अटींच्या आधीन राहून दर वर्षी ईएलएसएस फंडात गुंतवणूक करून जास्तीत जास्त ४६,३५० रुपयांपर्यंत करबचत करू शकता. करपात्र मिळकत ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा व्यक्ती आणि अविभक्त हिंदू कुटुंब (एचयूएफ) आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ‘कलम ८० सी’मधील तरतुदीं अंतर्गत ईएलएसएस योजनांमध्ये कमाल दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. करपात्र मिळकत आणि गुंतवणूक यानुसार करबचत त्याप्रमाणात कमी होऊ  शकते.

त्याचप्रमाणे, ईएलएसएस योजनांमधील गुंतवणूक युनिटसच्या वाटपाच्या तारखेपासून तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीच्या आधीन असते. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी गुंतवणूकदारांना त्यांच्या कर सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा.

कर नियोजन ही कठिण प्रक्रिया असली तरी म्युच्युअल फंडांनी ही करलाभ मिळविण्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत दिली आहे आणि त्याचबरोबर भांडवली बाजाराचा सर्वाधिक संभाव्य फायदा करून घेणे हा तिचा उद्देश आहे.

  • भांडवल वृद्धी : गुंतवणूक करणारी व्यक्ती आपली दीर्घ मुदतीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ईएलएसएस फंडांचा उपयोग करून घेऊ शकते. वृद्धी (ग्रोथ) पर्यायाची निवड करून, आपण चक्रवाढीचा लाभ करून घेऊ  शकतो आणि आवश्यक निधी जमा करू शकतो.
  • करबचत : दीड लाखापर्यंत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्यातील कलम ८० सी अंतर्गत करबचत करता येते. ३० टक्के कराच्या चौकटीत येत असल्यास अशा प्रकारे जास्तीत जास्त ४६,३५० रुपयांपर्यंत करबचत करता येते. एखादी व्यक्ती २० टक्के कराच्या चौकटीत येत असल्यास त्या व्यक्तीची ३०,९०० रुपयांपर्यंत करबचत होऊ शकते.
  • किमान लॉक-इन कालावधी : ईएलएसएसचा किमान लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा असतो.
  • ‘एसआयपी’ पर्यायाची उपलब्धता : एकदम मोठय़ा रकमेची गुंतवणूक करू शकत नसल्यास, तुम्ही ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लान’ (एसआयपी) द्वारे मासिक पद्धतीने गुंतवणूक करू शकता. या पद्धतीमुळे एखाद्या महिन्यात मोठय़ा रकमेची गुंतवणूक करण्यामुळे पडणारा ताण कमी करता येतो आणि त्याचप्रमाणे त्यामुळे तुम्हाला कालांतराने ‘रूपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’चा लाभ मिळतो.
  • उच्च परताव्याची शक्यता : हा परतावा बाजारपेठेशी निगडित असतो आणि त्याची खात्री नसते. तरीसुद्धा कमीत कमी पाच ते सात वर्षांच्या कालावधीसाठी या फंडांमध्ये गुंतवणूक करावी आणि गुंतवणुकीवर चक्रवाढ दराने उच्च परतावा मिळवावा. परंतु गुंतवणूक करण्यापुर्वी आर्थिक सल्?लागाराची मदत घ्यावी.

– भालचंद्र जोशी

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)