विजेच्या वापरात मोठी बचत करणाऱ्या एलईडी दिव्यांचे वितरण हा केंद्र आणि राज्य सरकारांनी गेल्या काही वर्षांत राबविलेला यशस्वी व परिणामकारक कार्यक्रम ठरला आहे. तीच परिणामकारकता साधणारा कार्यक्रम सर्वाधिक वीज खर्च होणाऱ्या वातानुकूलन यंत्रांबाबतही लवकरच हाती घेतला जाण्याचे संकेत आहेत. प्रारंभिक सोपस्कार पूर्ण करून चालू वर्षांअखेरपासून त्याची सुरुवात होणे अपेक्षित आहे.

एलईडी दिव्यांसाठी स्थापित ‘ईईएसएल’ या कंपनीच्या धर्तीवर किफायतशीर वातानुकूलन यंत्रांसाठी विशेष सरकारी उपक्रम स्थापण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आजवर ‘उजाला’ योजनेअंतर्गत देशभरात ३० कोटी स्वस्त एलईडी दिव्यांचे वितरण केले गेले असून सरकारच्या अंदाजाप्रमाणे विजेच्या खर्चावर वार्षिक १५ हजार कोटींची बचत करता आली आहे. याचीच पुनरावृत्ती वातानुकूलन यंत्रांबाबतही होऊ शकेल, असा सरकारचा विचार आहे.

विजेच्या वापरात कपात, पर्यायाने वीजनिर्मिती खर्च आणि त्या अनुषंगाने मोजावी लागणारी पर्यावरणीय किंमत वाचविल्याचा लाभ अंतिमत: ग्राहकांना दिला जाईल. यातून ग्राहक बाजारात प्रचलित किमतीपेक्षा १५ ते २० टक्के स्वस्त किमतीत वातानुकूलन यंत्र मिळवू शकणार आहेत. ‘इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर इंजिनीयर्स’ अर्थात ‘इशरे’ या अभियंत्यांच्या संघटनेकडून या संबंधाने सरकारला शिफारस केली गेली असून, आजवर तिने याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

इशरेचे मुंबई विभागाचे अध्यक्ष मिहिर संघवी यांच्या मते, सरकारी उपक्रमातून वितरित वातानुकूलन यंत्रे २४ अंश सेल्सियसवर स्थापित तापमानासह बाजारात येतील. किंबहुना, कोणत्याही नवीन वातानुकूलन यंत्रात किमान तापमान हे २४ अंश सेल्सियसखाली नसेल, म्हणजेच वीज वाचविणारे असेल, असे मानक निर्धारित करणारा निर्णयही लवकरच सरकारकडून घेतला जाईल. पर्यावरणाबाबत दक्ष जपानमध्ये २००६ सालापासूनच या दंडकाची सुरुवात केली गेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय परिस्थितीला अनुसरून २४ अंश ते २७ अंश सेल्सियसवर वातानुकूल यंत्राचे तापमानही अपेक्षित सुखदपणा प्रदान करते. इतके तापमान राखले गेल्यास, जवळपास ३० टक्के विजेचा वापर कमी केला जाऊ शकतो. कारण प्रत्येक एक अंश सेल्सियसने वातानुकूल यंत्राचे तापमान वाढविले तर विजेचा वापर सहा टक्क्यांनी कमी होतो, असे दीक्षित कन्सल्टंट्स अँड इंजिनीयरिंगचे आमोद दीक्षित यांनी सांगितले.

नवीन शीत उपकरणे ही विजेबाबत किफायती व पर्यावरणस्नेही असणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यात उपकरण निर्माते आणि ग्राहकांकडून हातभार आवश्यक ठरेल. या दिशेने जाणीवजागृतीचे काम ‘इशरे’कडून निरंतर सुरू आहे. याच विषयावर मुंबईत शुक्रवारी संघटनेतर्फे ‘सिम्पोसिया २०१९’ चर्चासत्र योजण्यात आले होते, त्याला उद्योगक्षेत्रातील ७०० हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती होती.