वस्त्रोद्योगातील प्रत्येक टप्प्यावर लागू करण्यात आलेल्या वस्तू व सेवा करामुळे निर्माण झालेल्या संभ्रमातून विटय़ातील ६ हजार ५०० यंत्रमागाची चाके थांबली असून रोज निर्माण होणारी ५ लाख २० हजार मीटरची कापड निर्मिती पूर्ण ठप्प झाली आहे. जोपर्यंत ही अनिश्चितता संपत नाही तोपर्यंत कापड निर्मिती थांबविण्याचा निर्णय यंत्रमागधारकांनी मंगळवारी घेतला.

विटा शहरात इचलकरंजी प्रमाणेच यंत्रमागाचा व्यवसाय केला जात आहे. शहरात सुमारे १ हजार १०० मागधारकांची ६ हजार ५०० यंत्रमाग आहेत. या मागावर रोज ५ लाख २० हजार कापड निर्मिती होते. यातून सुमारे अडीच हजार घरातील चुली चालत आहेत. यंत्रमागावर काम करणाऱ्या मजुरांचा रोजचा पगारच ५ लाख रूपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.

वस्त्रोद्योगामध्ये कापड निर्मिती, खरेदी करणारे अडत व्यापारी,  रंगकाम करून परत कापडाची ठोक विक्री करणारे रंगारी, ठोक खरेदी करून किरकोळ विक्री करणारे दुकानदार अशा प्रत्येक टप्प्यावर वस्तू व सेवा कर भरावा लागणार असल्याने प्रत्येक जण यातील आपल्या वाटय़ाला किती कर द्यावा लागणार आणि नफा किती असणार या विवंचनेत असल्याने मोठय़ा प्रमाणावर कापड साठा तयार होऊन विक्रीअभावी तसाच राहिला तर दर पडण्याचा धोका दिसत असल्याने कापड उत्पादनच थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विटा यंत्रमाग असोसिएशनचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी सांगितले, की आमचा वस्तू व सेवा कराला विरोध नाही, मात्र या साखळीतील प्रत्येक टप्प्यावर असलेल्या कराच्या रचनेत सुसुत्रता यावी अशी आमची भूमिका आहे. कापड उत्पादन सुरूच ठेवले तर दर पडल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठीच यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येथील कापड उद्योगातील संभ्रमावस्था दूर होईपर्यंत उत्पादन आठ दिवसासाठी थांबविण्याचा निर्णय ४ जुल रोजी घेण्यात आला होता. मात्र अद्याप संभ्रम दूर होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने अनिश्चित काळासाठी कापड उत्पादन ठप्प ठेवण्याचे आम्ही ठरविले आहे.  किरण तारळेकर, अध्यक्ष, विटा यंत्रमाग असोसिएशन