चालू संपूर्ण वित्त वर्षांत दर उणेच राहण्याचा अंदाज

चालू वित्त वर्ष आरंभीच्या करोना-टाळेबंदीमुळे सलग दोन तिमाही उणे विकास दर नोंदवल्यानंतर भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर शून्यवर आला आहे. आर्थिक वर्षांच्या मध्याला टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर निर्मिती क्षेत्र रुळावर येऊ लागल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या विकास दर आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

चालू वित्त वर्ष २०२०-२१ मधील ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत विकास दर ०.४ टक्के नोंदला गेला आहे. दर उणे स्थितीतून वर आला असला तरी महिन्याने संपणाऱ्या वित्त वर्षांत तो उणेच, -८ टक्के राहण्याची शक्यता सरकारने शुक्रवारी ताजा दर जाहीर करताना व्यक्त केली.

वित्त वर्ष २०२०-२१ च्या सुरुवातीच्या टप्प्यात ४ टक्के अंदाजित करण्यात आलेला विकास दर उणे ७.७ टक्के असेल, असे जानेवारी २०२१ मध्ये नमूद करण्यात आले होते, तर आता हा दर अधिक विस्तारत, उणे ८ टक्के असेल, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.

शेजारच्या चीनने मात्र गेल्या तिमाहीत ६.५ टक्के विकास दर नोंदवला आहे. जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील ४.९ टक्के तुलनेत चीनला लक्षणीय वाढ नोंदवता आली आहे. भारत, चीनसह सध्या तुर्की सकारात्मक अर्थव्यवस्था स्थितीत आहे. तुलनेत अर्जेटिना, ब्रिटन तसेच अमेरिका अधिक प्रमाणातील उणे स्थितीत आहेत.

काही महिन्यांपासून अर्थव्यवस्था सावरत असल्याचे चित्र आहे. भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक चालू महिन्यात त्यांच्या विक्रमी टप्प्याला पोहोचून परतले असतानाच महागाईतही उतार नोंदला जात आहे.

वित्तीय तुटीचा विस्तार

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांत, जानेवारीपर्यंत सरकारची वित्तीय तूट विस्तारून १२.३४ लाख कोटी रुपये झाली आहे. सरकारने सुधारणा केलेल्या अंदाज तुलनेत हे प्रमाण ६६.८ टक्के आहे.

गेल्या वर्षीच्या जानेवारीपर्यंत वित्तीय तुटीचे प्रमाण १२८.५ टक्के होते. चालू आर्थिक वर्षअखेपर्यंत देशाची वित्तीय तूट १८.४८ लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.

वित्त वर्ष २०२१-२२चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी मार्च २०२१ अखेर वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ९.५ टक्क्य़ांवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला होता.

प्रमुख क्षेत्राची जानेवारीत वाढ

नवी दिल्ली : देशातील प्रमुख आठ क्षेत्राने वर्षांरंभीच माफक वाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्यात प्रमुख पायाभूत क्षेत्र ०.१ टक्क्य़ाने वाढले आहे.

वर्षभरापूर्वी, जानेवारी २०२० मध्ये या क्षेत्राची वाढ २.२ टक्के होती. वाणिज्य व उद्योग खात्याने जाहीर केल्यानुसार, प्रमुख क्षेत्रात खते, स्टील, ऊर्जा निर्मिती वाढली आहे. प्रमुख आठमधील अन्य क्षेत्राची वाढ २.५ ते ५ टक्क्य़ांपर्यंत झाली आहे. तर कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, इंधन शुद्धीकरण उत्पादने तसेच सिमेंटचे उत्पादन वाढले आहे.

सकल राष्ट्रीय उत्पादन

ऑक्टोबर-डिसेंबर २०२०

०.४%

ऑक्टोबर-डिसेंबर २०१९ ३.३%

जुलै-सप्टेंबर २०२०

-७.७%

(दुसरी तिमाही)

एप्रिल-जून २०२०

-२३.९%

(पहिली तिमाही)