गेल्या वर्षी उच्च धनसंपदाप्राप्त तसेच संस्थागत गुंतवणूकदारांसाठी पर्यायी गुंतवणुकीचा मार्ग म्हणून ‘सेबी’ने विशेष मार्गदर्शक तत्त्वांद्वारे मंजुरी दिलेल्या ‘अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड- एआयएफ’ धाटणीच्या   पहिल्या फंडाची घोषणा मंगळवारी काव्र्ही कॅपिटलने केली.
किमान व्यक्तिगत गुंतवणूक एक कोटी रुपयांपासून सुरू होणारा ‘सिस्टेमॅटिक हेज फंड’ नामक हा फंड असून तो भारतात प्रस्तुत झालेला पहिला मुदतमुक्त (ओपन एंडेड) हेज फंडदेखील आहे. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत हेज फंडाच्या तुलनेत हा एक ‘सेबी’द्वारे नियंत्रित हेज फंड असेल, असे काव्र्ही कॅपिटलचे मुख्य गुंतवणूक अधिकारी स्वप्निल पवार यांनी सांगितले.
पवार हेच या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. म्युच्युअल फंडाप्रमाणेच या फंडातील गंगाजळीचे व्यवस्थापन आणि प्रतिदिन दिवसाअखेरीस मालमत्ता मूल्य जाहीर केले जाईल.
आगामी दोन महिन्यांत या फंडातून १०० कोटी रुपये गंगाजळी उभी राहणे अपेक्षित आहे, असा विश्वास काव्र्ही समूहाचे मुख्याधिकारी हृषिकेश परांडेकर यांनी व्यक्त केला.