जगभरातून होत असलेल्या अमेरिकेतील सत्तांतराच्या स्वागताच्या हर्षांचे प्रतिबिंब भारतीय भांडवली बाजारातही सोमवारी उमटले. सप्ताहारंभीच सलग सहाव्या सत्रात तेजी नोंदविताना सेन्सेक्स आणि  निफ्टी निर्देशांकांनी सार्वकालिक उच्चांकी शिखराला गवसणी घातली.

दिवसभराच्या व्यवहारात तेजीत राहिलेल्या सेन्सेक्सने सत्रअखेर तब्बल ७०४.३७ अंश झेप घेत ४२,५९७.४३ ला गाठले. १.६८ टक्के वाढीमुळे मुंबई निर्देशांक त्याच्या यापूर्वीच्या, १४ जानेवारी २०२०च्या ४१,९५३.६३ च्या उच्चांकी शिखराच्या खूपच पुढे गेला. व्यवहारात त्याने ४२,६४५.३३ उच्चांकही दाखविला.

बाजारातील उत्सवी आतषबाजीला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख  निर्देशांक -निफ्टीने सोमवारी १.६१ टक्के वाढीची साथ दिली. निफ्टी आठवडय़ाच्या पहिल्या सत्रात १२,४७४.०५ पर्यंत उंचावल्यानंतर व्यवहारअखेर शुक्रवारच्या तुलनेत १९७.५० अंश उसळीने १२,४६१.०५ वर स्थिरावला. त्याचाही हा सार्वकालिक उच्चांकी स्तर ठरला.

शनिवारच्या सुटीच्या दिवशी दीपावली येत असताना भांडवली बाजाराने सोमवारीच निर्देशांक उसळीच्या बरोबरीने विक्रमी उच्चांर गाठत दिवाळी साजरी केली. गेल्या अनेक महिन्यांमध्ये ४० हजारांच्या आसपास रेंगाळणाऱ्या मुंबई निर्देशांकाने ४२ हजारांचा टप्पा मागे टाकतानाच आजवरचे सर्वोच्च शिखरही गाठले आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन निवडून आल्याचे भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी स्पष्ट झाल्यानंतर त्याची पहिली निर्देशांक प्रतिक्रिया सोमवारी भांडवली बाजारात व्यवहारादरम्यान पडणे स्वाभाविक होते. नव्या आठवडय़ाच्या व्यवहारांनी आशियातील प्रमुख निर्देशांकांच्या जवळपास २ टक्के वाढीने स्वागत केले होते. तर युरोपीय बाजारही सुरुवातीच्या टप्प्यात तेजीत होते.

भारतीय भांडवली बाजाराची सुरुवातही याच लाटेवर स्वार होत झाली. दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स ४२,३०० च्या खाली उतरल्यानंतर पुन्हा तेजीच्या वाटेने निघाला. परकीय चलन विनिमय मंचावरील डॉलरच्या तुलनेतील रुपयाकडेही प्रसंगी दुर्लक्ष झाले. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या खनिज तेलाच्या किमतीचाही विपरीत परिणाम झाला नाही.

अमेरिकेच्या राजकारणात सर्वात तरुण सिनेटर ते वयोवृद्ध अध्यक्ष असा राजकीय प्रवास करणारे जो बायडेन सत्तेवर येताच करोना-टाळेबंदीग्रस्त महासत्तेला अर्थसाहाय्याद्वारे बाहेर काढतील, या आशेवर देशी-विदेशीचे प्रमुख निर्देशांक सोमवारी मोठय़ा फरकाने वाढले.

मुंबई निर्देशांकातील ३० पैकी केवळ तीन समभागांचे मूल्य घसरणीच्या यादीत राहिले. आरोग्यनिगा क्षेत्रीय निर्देशांकावर सोमवारी विक्रीदबाव राहिला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्य़ापर्यंत वाढले.

‘सेन्सेक्स’चे ४३,००० लक्ष्य हाकेच्या अंतरावर

गेल्या आठवडय़ात वॉल स्ट्रीटने आपल्या सर्वोत्कृष्ट साप्ताहिक कामगिरीची नोंद केली आणि तोच कित्ता जगभरातील प्रमुख भांडवली बाजारांनी गिरवला. त्यामुळे स्थानिक बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग सहाव्या सत्रात घोडदौड कायम ठेवत, विक्रमी उच्चांकालाही गाठणे नवलाचे नाही. इतकेच नव्हे सेन्सेक्सवर ४३,००० आणि निफ्टीवर १२,६०० ही नवीन शिखरे आता हाकेच्या अंतरावर आहेत, असे प्रतिपादन तांत्रिक विश्लेषक आणि ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’चे स्तंभलेखक आशीष ठाकूर यांनी केले.

सेन्सेक्सच्या ४३,००० आणि निफ्टीच्या  १२,६०० या उच्चांकी लक्ष्यांचा पूर्वअंदाज दोन महिन्यांपूर्वीच  ठाकूर यांनी त्यांच्या स्तंभातून व्यक्त केला आहे. जेव्हा जेव्हा बाजारात मंदीचे घातक उतार येत होते, तेव्हा गुंतवणूकदारांना त्यांनी धीर दिला आहे. प्रत्येक घसरणीत मंदी क्षणिक असून बाजारात पुन्हा सुधारणा होऊन, तेजीचे वरचे लक्ष्य साध्य होईल, असे त्यांच्या स्तंभातील गेल्या दोन महिन्यांतील प्रत्येक लेखाचे सूत्र होते.

तथापि अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांना सावध होण्याचा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे. डिसेंबर ते जानेवारीमध्ये बाजारात घातक उतार संभवतात. निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,३०० ते ३६,५०० आणि निफ्टीवर ११,००० ते १०,८०० असे असेल, असा त्यांचा कयास आहे.

सतरा हजार अंशांची उलटफेर

*  वर्षांरंभी १ जानेवारी २०२० ला सेन्सेक्स ४१,३०६.०२ वर होता.  १४ जानेवारीचा त्याचा ४१,९५३.६३ सार्वकालिक उच्चांकी बंद स्तर होता. निफ्टीही त्या दिवसअखेरीस १२,३६३ उच्चांकपदाला होता. २० जानेवारीला सेन्सेक्सने व्यवहारात ४२,२७३.८७ हा उच्चांक गाठला. तर करोनाचे थैमान सुरू होऊन, भारतात टाळेबंदी सुरू झाली तेव्हा म्हणजे २३ मार्चला सेन्सेक्सने २५,६३८.९० हा वर्षांतील तळ दाखविला. जानेवारीतील उच्चांकावरून तब्बल ३८ टक्क्य़ांचे ते नुकसान होते. नंतर साडेसात महिन्यांत  निरंतर घोडदौडीतून सेन्सेक्सने तब्बल १७ हजार अंश मजल मारली आहे.

गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा ‘बोनस

*  विक्रमी टप्प्याला पोहोचलेल्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता सोमवारी २ लाख कोटी रुपयांनी वाढली. बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल सोमवारअखेर १६५.६७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.