थकबाकीपोटी तेल कंपन्यांनी इंधन पुरवठय़ास नकार दिल्याने स्पाईसजेटची हवाई उड्डाण सेवा बुधवारी दुपापर्यंत ठप्पच होती. हवाई सेवा कंपनीने अखेर सार्वजनिकतेल कंपन्यांचे १४ कोटी रुपये मोजल्यानंतर उड्डाण पूर्ववत केले. दरम्यान कंपनीला ७५ उड्डाणे रद्द करावी लागली.
वित्तीय संकटातील स्पाईसजेटला इंधन देण्यास तेल कंपन्यांनी नकार दिला. थकित रकमेपोटी कंपनीला आपली ७५ हून अधिक उड्डाणे ऐन सकाळच्या वेळी रद्द करावी लागली. दुपारनंतर कंपनीने १४ कोटी रुपये दिल्यानंतर स्पाईसजेटच्या विमानांना पूर्ववत इंधन पुरवठा करण्यात आला. मंगळवार सायंकाळपासूनच स्पाईसजेटची विमाने इंधन भरण्यासाठी तेल साठय़ावर आली नाहीत, असे तेल कंपन्यांचे म्हणणे होते. तर इंधन दरापोटीची थकित रक्कम अदा करण्यात आली असून बुधवार दुपारनंतर हवाई सेवा नियमित झाली आहे, असे स्पाईसजेटने स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांपासून स्पाईसजेट सार्वजनिक कंपन्यांच्या ऐवजी रिलायन्ससारख्या खासगी तेल कंपन्यांचे इंधन घेत असल्याचेही समजते.
विमानतळाचे थकित २०० कोटी रुपये भाडेप्रकरणीदेखील कंपनीवर भारतीय विमान प्राधिकरणाने र्निबध लादले होते. ते अखेर कंपनी प्रवर्तक सन समुहाने वैयक्तिक बँक हमीनंतर मागे घेण्यात आले.