कामगार संघटनेच्या निलंबित अध्यक्षास बिनशर्त कामावर घेण्याची मागणी व्यवस्थापनाने धुडकावून लावल्याने महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीच्या इगतपुरी प्रकल्पातील कामगारांचा संप सोमवारी पाचव्या दिवशीही सुरूच राहिला. कंपनी व्यवस्थापनाने अध्यक्षास कामावर घेण्याची तयारी दर्शविताना त्यांची चौकशीही करण्यात येईल, अशी भूमिका घेतल्याने भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापन यांच्यातील चर्चा फिस्कटली. या प्रकल्पात दररोज सुमारे ११०० इंजिनांची निर्मिती करण्यात येत असल्याने आतापर्यंत कंपनीचे कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रच्या या प्रकल्पातील संपाविषयी सोमवारी तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. दुपारी भारतीय कामगार सेनेचे नेते सूर्यकांत महाडिक, सचिव गुरूनाथ खोत, पप्पू नाईक, नंदू जगताप हे आणि कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने   हिरामण आहेर, विजय नायर यांनी चर्चेत सहभाग घेतला. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निलंबित अध्यक्ष सुनील यादव यांना त्वरीत बिनशर्त कामावर घेण्याचा आग्रह धरला. कंपनी व्यवस्थापनाने यादव यांना कामावर घेण्याची तयारी दर्शविली. परंतु त्यांची चौकशी सुरूच राहील, अशी भूमिका घेतली. दोन्ही बाजू आपआपल्या भूमिकेवर अडून बसल्याने कोणताही निर्णय न निघता बैठक आटोपली. या बैठकीनंतर कामगारांची सभा होऊन यादव यांना जोपर्यंत बिनशर्त कामावर घेतले जात नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. संपामुळे कंपनीचे कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीच्या प्रवेशव्दारासमोर तंबू ठोकून कामगार बसले आहेत.