तेजीचा क्रम मोडून प्रमुख निर्देशांकांत टक्क्य़ाची घसरण

नोटाबंदीने अनेक ग्राहकोपयोगी कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीला फटका बसल्याचे प्रत्यंतर डिसेंबरअखेर तिमाहीच्या निकालांमध्ये स्पष्टपणे उमटले असताना, सरकारच्या या निर्णयाचे लाभार्थी समजल्या जाणाऱ्या बँकांकडून तिमाही निकालात दिसलेल्या दु:स्थितीने तेजीत असलेल्या भांडवली बाजाराचा शुक्रवारी हिरमोड केला. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात अनुक्रमे २७४ आणि ८६ अंश अशी तब्बल एका टक्क्य़ाची मोठी घसरण दिसून आली. यातून निफ्टीने भावनिक व तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाची ८४०० च्या पातळीखाली बुडी घेतली.

जगात अन्य बाजारातही अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियोजित राज्यरोहणासंबंधाने धडकीमुळे दिसलेल्या नरमाईसह, बँकांच्या खराब तिमाही कामगिरीच्या प्रतिकूलतेने आपल्या बाजाराला शुक्रवारी घेरलेले दिसले. त्यामुळे सेन्सेक्सने खालच्या स्तरावर नकारात्मक सुरुवात करीत, दिवसभर घसरण वाढवत नेत शेवटही मोठय़ा घसरगुंडीसहच केला. आधीच्या सलग दोन सत्रात या निर्देशांकाने ७३ अंशांची कमाई केली आहे. शुक्रवारच्या घसरणीत सर्वाधिक योगदान हे बँकिंग समभागांचे राहिले. गुरुवारी निकाल जाहीर करणाऱ्या येस बँकेसह, अ‍ॅक्सिस बँकेचा समभाग तब्बल सात टक्क्य़ांनी गडगडला. या नकारार्थी परिणाम अन्य समभागांवरही दिसून आला. अद्याप तिमाही निकाल प्रतीक्षेत असलेल्या स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँक या बडय़ा बँकांचे समभागही अनुक्रमे २.८३ टक्के व २.३४ टक्क्य़ांनी गडगडले.

बँकांव्यतिरिक्त धातू समभाग, त्याचप्रमाणे ट्रम्पप्रणीत अमेरिकेच्या संभाव्य धोरणात्मक वाटचालीने धास्तावलेल्या आयटी आणि औषध निर्मिती समभागांमध्ये शुक्रवारच्या व्यवहारात नरमाई दिसून आली.

शुक्रवारच्या बाजारातील विक्रीला सर्वव्यापी रूप होते. आघाडीच्या समभागांपेक्षा जास्त मधल्या व शेवटच्या फळीतील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमधील घसरण ही दीड व पावणेदोन टक्क्य़ांहून अधिक असल्याचे आढळून आले. सेन्सेक्समधील ३० पैकी २४ समभाग घसरणीच्या यादीत होते.