तांत्रिक बिघाडामुळे मुंबई शेअर बाजारातील सर्व व्यवहार गुरुवारी सकाळी सुमारे तीन तास ठप्प झाले होते. तांत्रिक बिघाड दूर करण्यात आल्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा नव्याने दिवसाच्या व्यवहारांना सुरुवात झाली. सकाळी ९ वाजता बाजार सुरू झाल्यानतंर अवघ्या पंधरा मिनिटांनी म्हणजेच सव्वा नऊ वाजताच ‘नेटवर्क आऊटेज’ झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. विशेष म्हणजे पहिल्या पंधरा मिनिटांत जवळपास ५१ कोटी रूपयांचे झालेले सर्व सौदे रद्द करण्यात आले असल्याची माहिती बीएसईने दिली. तसेच हा तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरूस्त करून व्यवहार सुरू होतील, असेही सांगण्यात आले. अशा प्रकारचा तांत्रिक बिघाड होण्याची गेल्या महिनाभरातील ही दुसरी वेळ आहे. सकाळी व्यवहार सुरू झाला तेव्हा बाजार बुधवारपेक्षा ८० ते ८५ अंकांनी पुढे २५,९२४.२५ वर गेला होता.