रिझव्‍‌र्ह बँकेने मासिक कर्जाचे हप्ते लांबणीवर टाकण्याच्या विस्तारित सवलतीसह व्याजदर कपातही टाळली असली तरी व्यापारी बँकांनी मात्र विविध कर्जाचे व्याज कमी करण्याचे धोरण अनुसरले आहे.

सण हंगाम दरम्यान बँकिंग व्यवस्थेतील पतपुरवठा ओघ राखण्याचा प्रयत्न बँकांनी केला आहे. व्याजदर कमी करण्याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेचे थेट आवाहन नसताना अन्य बँकांनी कर्जे स्वस्त केली आहेत.

रेपो, रिव्हर्स रेपो आदी कोणत्याही व्याजदरात कपात करण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारच्या पतधोरणाद्वारे टाळले. त्याचबरोबर येत्या ३१ ऑगस्टला संपत असलेली मासिक कर्जाचे हप्ते लांबणीवर टाकणाऱ्या सुविधेचा विस्तार करण्याकडेही मध्यवर्ती बँके ने दुर्लक्ष केले. विकासदर, महागाईबाबतची चिंता व्यक्त करत केवळ कर्ज पुनर्रचना, सोन्याच्या तारणावर अधिक प्रमाणात कर्ज आदी उपाय योजले. असे असले तरी शुक्रवारी, दुसऱ्या दिवशी सार्वजनिक क्षेत्रासह अनेक खासगी बँकांनी त्यांच्या कर्जाच्या व्याजाचे दर काही प्रमाणात कमी केले.

बँक ऑफ महाराष्ट्रने निधी आधारीत कर्ज व्याजदर (एमसीएलआर) कमी केला. सलग पाचव्या महिन्यात बँकेने निधी आधारीत कर्ज व्याजदर (एमसीएलआर) कमी केला. एक दिवसाच्या मुदतीसाठी ६.८०%, एक महिन्यासाठी ६.९०% आणि एक वर्षांसाठी ७.४०% याप्रमाणे व्याजदर कमी स्तरावर आणून ठेवले.  तसेच कृषि सुवर्ण कर्ज १ वर्ष मुदतीच्या एमसीएलआर दराने – ७.४०% ने उपलब्ध केला.  किरकोळ सुवर्ण कर्जावरील व्याजदर ७.५०% पर्यंत कमी केला.

एचडीएफसी बँके ने सर्व प्रकारचे व सर्व मुदतीवरील कर्ज व्याजदरात ०.१० टक्यांपर्यंत कपात केली. खासगी क्षेत्रातील बँकेच्या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासूनच लागू झाली. बँके ने गेल्याच महिन्यात ०.२० टक्याने दर कमी केले होते. बँकेचा नवा एमसीएलआर वार्षिक ७ टक्के असेल.

सार्वजनिक क्षेत्रातील यूको बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक यांनीही कर्ज व्याजदर कमी केले आहेत.