सलग चौथ्या महिन्यात वधारणारा किरकोळ महागाईचा दर जानेवारीतही दुहेरी आकडय़ात कायम राहिला आहे. यापूर्वी डिसेंबरमध्येही जवळपास याच स्तरावर होता. यंदा तो किरकोळ वधारला आहे.
डिसेंबर २०१२ मध्ये किरकोळ महागाई दर १०.५६ टक्के होता. तर जानेवारी २०१३ मध्ये तो किंचित वधारून १०.७९ टक्के झाला आहे. त्या आधी नोव्हेंबर आणि ऑक्टोबरपासून  अनुक्रमे ९.९० आणि ९.७५ टक्के असा तो निरंतर वाढत आला आहे.
किरकोळ महागाईची मोजपट्टी असणाऱ्या ग्राहक किंमत निर्देशांकात यंदाच्या जानेवारीमध्ये सर्वाधिक दरवाढ ही भाज्यांच्या किंमतीत झाली आहे. त्या २६.११ टक्क्यांनी तर तेल १४.९८ टक्क्यांनी वधारले आहे. याचबरोबर मासांहारी पदार्थ (१३.७३%), मसाले व डाळी (१४.९०% व १२.७६%), साखर (१२.९५%), वस्त्र व पादत्राणे (११%) यांच्याही किंमती वधारल्या आहेत.
रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर निश्चितीसाठी महत्त्वाचा ठरणारा घाऊक किंमत निर्देशांकही येत्या गुरुवारी जाहीर होणार आहे. डिसेंबरमध्ये ७ टक्क्यांच्या वर राहिलेला हा दर सध्या गेल्या तीन वर्षांच्या नीचांकावर आहे. याला अनुसरूनच बँकेने नऊ महिन्यांनंतर प्रथमच रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली होती. मार्च २०१३ अखेर हा दर रिझव्‍‌र्ह बँकेने ६.८ टक्के अंदाजित केला आहे.