सार्वजनिक पोलाद क्षेत्रातील सेल (स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया) कंपनीतील १० टक्के हिस्सा सरकार विकणार आहे. यासाठीच्या खुल्या भागविक्री प्रक्रियेकरिता प्रति समभाग ६४ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठीची प्रक्रिया गुरुवारी होत आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांना शुक्रवारी या प्रक्रियेत भाग घेता येईल. सरकार खुल्या भागविक्री प्रक्रियेसाठी २०.६५ कोटी समभाग उपलब्ध करून देणार आहे. तेवढेच समभागही अन्य प्रक्रियेसाठी असतील. १२.५ टक्के समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

म्युच्युअल फंड व्यतिरिक्त अन्य कोणाही एका गुंतवणूकदाराला २५ टक्क्य़ांपेक्षा अधिक समभाग मिळू शकतील. फंड तसेच विमा कंपन्यांसाठी किमान २५ टक्के समभाग राखीव आहेत.

सरकारने चालू आर्थिक वर्षांसाठीचे निर्गुतवणुकीचे लक्ष्य विस्तारत २.१० लाख कोटी रुपये केले. पैकी १.२० लाख कोटी रुपये सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विकून तर ९०,००० कोटी रुपये वित्त संस्थांमार्फत उभे होणार आहेत.

‘आयआरएफसी’चा ‘आयपीओ’

भारतीय रेल्वेची वित्त उपकंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (आयआरएफसी) ची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. यासाठी प्रति समभागाकरिता २५ ते २६ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. याद्वारे सरकार ४६०० कोटी रुपये उभे करणार आहे. प्रत्येकी १० रुपये दर्शनीमूल्याचे १७८.२० कोटी समभाग याकरिता उपलब्ध केले जाणार आहेत. पैकी ११८.८० कोटी समभाग नव्याने उपलब्ध होतील. १८ ते २० जानेवारी दरम्यान होणाऱ्या या भागविक्री प्रक्रियेकरिता किमान ५७५ समभाग आणि याच प्रमाणात पुढे नोंदणी करता येणार आहे.