सणोत्सवात नवनवीन वाहनांची प्रस्तुती
घटलेल्या व्याजदराचीही जोड
दहा दिवसांवर आलेल्या दसऱ्यासाठी वाहन क्षेत्राकरिता गेल्या महिन्याने पोषक वातावरण तयार केले आहे. सलग ११व्या महिन्यात तेजी नोंदविताना देशातील प्रवासी कार विक्री बाजारपेठ ९.४८ टक्क्यांपर्यंत विस्तारली आहे.
वाहन खरेदीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा एक मुहूर्त येत्या २२ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या रूपात येऊ घातला आहे. या पाश्र्वभूमीवर सप्टेंबरमधील वाहन विक्रीचे आकडे बाजारात चैतन्य निर्माण करणारे आहे. वाहन खरेदीसाठी सध्या कंपन्यांच्या नव्या वाहनांची तसेच वित्त कंपन्या, बँकांच्या कमी व्याजदरावरील कर्जाची जोड उपलब्ध आहे. तेव्हा या महिन्यातही विक्री वाढती राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. वाहन कर्ज व्याजदर १० ते १४ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
सिआम (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स) या वाहन उत्पादक कंपन्यांच्या संघटनेने शुक्रवारी स्पष्ट केलेल्या आकडेवारीनुसार, मोटारसायकलची विक्री मात्र गेल्या महिन्यात २.८७ टक्क्यांनी घसरली आहे. तर प्रवासी कारची विक्री वाढून १,६९,५९० झाली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मारुती सुझुकी (एस-क्रॉस), ह्य़ुंदाई (क्रेटा), होन्डा (नवी जॅझ), महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र (टीयूव्ही३००), रेनो (क्विड) आदी कंपन्यांनी त्यांची नवी वाहने बाजारपेठेत उतरविली आहेत. पहिल्याच महिन्यात या वाहनांना प्रतिसादही मिळाला आहे.