नैसर्गिक वायूच्या वाटपासंदर्भातील धोरणात केंद्र सरकार क्रांतिकारी बदल करणार आहे. युरिया खताची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडे नैसर्गिक वायू वितरणाची असलेली मक्तेदारी मोडून संपृक्त नैसर्गिक वायू (सीएनजी) व वायुवाहिनीद्वारे स्वयंपाकाच्या गॅसचे (पाइप्ड कुकिंग गॅस) वितरण करणाऱ्या संस्थांकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे सामान्यांना स्वयंपाकाचा गॅस स्वस्तात उपलब्ध होऊ शकणार आहे.
नैसर्गिक वायूची निर्मिती करून त्याचे वितरण करण्याची जबाबदारी आतापर्यंत युरिया खत उत्पादित करणाऱ्या कारखान्यांकडे होती. त्याखालोखाल स्वयंपाकाच्या गॅसची (एलपीजी) निर्मिती करणाऱ्या कंपन्या व ऊर्जानिर्मिती कारखाने यांच्याकडे प्रामुख्याने या वायूच्या वितरणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर नगर वायू वितरण प्रकल्पांद्वारे (सीजीडी) वाहने व घरगुती ग्राहकांना अनुक्रमे सीएनजी व पाइप्ड कुकिंग गॅसचे वितरण केले जाते, मात्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने आता या क्रमवारीत बदल करण्याचे ठरवले असून, सीजीडीचे वितरण करणाऱ्या केंद्रांकडेच सीएनजी व पाइप्ड कुकिंग गॅसच्या वितरणाची जबाबदारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. लवकरच हा क्रांतिकारी धोरणात्मक निर्णय घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळापुढे त्याबाबत प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसचे वितरण वाढल्यास स्वस्तातील स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध होणार असून त्याचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. सीजीडींनंतर अणुऊर्जा प्रकल्पांना पुरवठा करणाऱ्या केंद्रांना, अवकाश संशोधन करणाऱ्या प्रकल्पांना हा पुरवठा केला जाईल. त्यानंतर वायूआधारित युरिया उत्पादकांना नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जाईल, तसेच ऊर्जानिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना माफक प्रमाणात वीजविक्री करण्याच्या पूर्वअटीनंतर हा वायुपुरवठा केला जाईल.

सीएनजी आणि पाइप्ड नैसर्गिक वायू हे दोन्ही स्वच्छ इंधने आहेत. ऑटोमोबाइल क्षेत्राला केला जाणारा डिझेलपुरवठा व घरगुती ग्राहकांना दिला जाणारा एलपीजी यांची जागा घेण्यासाठी ही इंधने उत्तम पर्याय आहेत. भविष्यात ते स्वस्तात मिळेल.
 -पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांनी दिलेली माहिती.

क्रमवारी बदलली..
-सीएनजी व पाइप्ड कुकिंग गॅस
-अणुऊर्जा प्रकल्प
-अवकाश संशोधन प्रकल्प
-वायूआधारित युरिया उत्पादक
-ऊर्जानिर्मिती प्रकल्प