देशाची निर्यात सलग तिसऱ्या महिन्यात रोडावली आहे. ऑक्टोबरमध्ये भारताची निर्यात १.११ टक्क्यांनी घसरून २६.३८ अब्ज डॉलर झाली आहे. पेट्रेलियम पदार्थ, गालिचा, चामडय़ाच्या वस्तू, बरोबरीने तांदूळ, चहा या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मागणी कमी राहिल्याचा हा परिणाम आहे.

ऑक्टोबरमध्ये देशाची आयातही १६.३१ टक्क्यांनी घसरून ३७.३९ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. परिणामी, निर्यात-आयातीतील दरी ११ अब्ज डॉलरवर स्थिरावली आहे. या महिन्यात सोने आयात ५ टक्क्यांनी वाढून १.८४ अब्ज डॉलर झाली. तर तेल आयात ३१.७४ टक्क्यांनी कमी होऊन ९.६३ अब्ज डॉलपर्यंत आली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार होत असलेल्या ३० क्षेत्रांपैकी १८ क्षेत्रांतील वस्तूंच्या निर्यातीबाबत भारताचा प्रवास यंदा नकारात्मक राहिला.

एप्रिल ते ऑक्टोबर या आर्थिक वर्षांच्या सात महिन्यांत देशाची निर्यात २.२१ टक्क्यांनी घसरून १८५.९५ अब्ज डॉलर, तर आयात ८.३७ टक्क्यांनी कमी होत २८०.६७ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. या सात महिन्यात व्यापार तूट ९४.७२ अब्ज डॉलर राहिली आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीत ती ११६.१५ अब्ज डॉलर होती. दरम्यान, सेवा क्षेत्रातील निर्यात ऑक्टोबरमध्ये १७.२२ अब्ज, तर आयात १०.९२ अब्ज राहिल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.