नवी दिल्ली : भारताच्या परकीय चलन गंगाजळीत सलग पाचव्या आठवडय़ात घसरण कायम आहे. सरलेल्या आठवडय़ात गंगाजळी २.४७ अब्ज डॉलरने आटत ६०४.००४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या पाच आठवडय़ांच्या कालावधीत परकीय गंगाजळी २८.५ अब्ज डॉलरने आटली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर (२०२१) महिन्यात परकीय चलन गंगाजळीने ६४२.४५३ अब्ज डॉलर अशी उच्चांकी पातळी गाठल्यानंतर भांडवली बाजारात नवीन वर्षांत आलेली घसरण, खनिज तेलाच्या दराने गाठलेला उच्चांक आणि परदेशी संस्थामक गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन यामुळे त्यात घसरण कायम आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील मूल्य घसरण रोखण्यासाठी डॉलरची विक्री करत असल्याने  परकीय चलन गंगाजळीत उतार कायम आहे.